विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका

अलताई पर्वत - याचें मोंगोलियन नांव अलतइन-उला (सुवर्णगिरी) आशिया खंडांत हें नांव निरनिराळ्या अर्थी वापरतात. पश्चिम सैबिरिया व मोंगोलिया या देशांतला हा पर्वतप्रदेश स्वित्झर्लेंडाप्रमाणें असून त्याचें क्षेत्र मात्र बरेंच विस्तृत आहे.

“सायलुघेम अथवा कोलिव्हन अलताई पर्वत” हा या प्रदेशाचा जणुं काय कणा असून उत्तर अ. ५१०  ६०’ व पूर्व रे. ९८०  यांच्या दरम्यान असलेल्या (सायन) पश्चिम टोंकाकडे उत्तर अ. ४९०  व पूर्व रे. ८६०  अंश या भागांपासून ईसान्येस हा पर्वत पसरलेला आहे. शिखरांची उंची ९-१० हजार फुटांपर्यंत आहे. ६७०० फुटांवरचा भाग बहुतेक बर्फाच्छदित असतो. पर्वतावर थोडे घांट आहेत. दक्षिणेकडील उलन-दाबन घांट व उत्तरेकडील चपचन-दबन घांट हे दोन नमूद करण्यासारखे आहेत. या भागांत कांहीं सरोवरें आहेत, त्यांपैकीं उबसानोर, किरगिझ-नोर, दुर्गा-नोर, कोबदो-नोर वगैरे महत्त्वाचीं आहेत.

खास अलताई पर्वत. - याला “एकटाघ” “मंगोली अलताई” असेंहि म्हणतात. हा दोन जोडींनीं समांतर रेषेंत असणार्‍या डोंगरओळींनीं झालेला असून त्या ओळी ९९०  अंशांपर्यत पसरलेल्या आहेत. ९४ अंशांपासून पर्वताचे निरनिराळ्या दिशेस पसरणारे असे फांटे आहेत. यांनां विवक्षित स्तानिक नांवेंहि देण्यांत आलेलीं आहेत. यांवर ‘किरगिझ नांवाच्या भटक्या रानटी लोकांची वस्ती आहे.

सायलुघेम पर्वताच्या वायव्येकडील भागांत अति उंच असें एक दुशिंगी शिखर (उंची १४८९० व १४५६० फूट) आहे. येथून बर्‍याच बर्फवाहिनी नद्या उगम पावतात. पर्वतभाग असंख्य दर्‍यांनीं व कड्यांनीं भरलेला आहे. बर्‍याच खोर्‍यांतून लोकवस्ती आढळते. मुख्यत: “यूबा” “युलमा” “भुक्तर्मा” वगैरे खोर्‍यांत वस्ती बरीच आहे. दुसर्‍या कांहीं दरीखोर्‍यांत उदाहरणार्थ, बशकाऊस, चलाइमन, चलचा वगैरेंत भ्रमणवृत्ति करणारे टेलेनधीट अथवा टेलूत नांवाचे रानटी लोक वस्ती करून आहेत. लगतच टेलेटस्काय नांवाचें एक सरोवर आहे. याची लांबी ४८ मैल, रूंदी ३ मैल व एकंदर क्षेत्रफळ ८७ चौ. मैल असून हें १७०० फूट उंचीवर आहे. सुपीक खोर्‍यांतून रशियनांची वस्ती दिवसेंदिवस वाढत आहे. इ.स. १९०८ सालीं ना. बायस्क ननौंल, कझनेटरक या खोर्‍यांत एकंदर लोकवस्ती ८,००,००० वर आढळून आली. या लोकांचा मुख्य व्यवसाय शेतकी” व हा आहे. याशिवाय या पर्वतावर रूपें, तांबें, शिसें वगैरेंच्या खाणी असल्यामुळें बरेच लोक खोदकाम वगैरे करतात. अलताई प्रदेशाची राजधानी अगर मुख्य ठिकाण बनौंल हें असून येथील व्यापारहि बराच आहे. याशिवाय दुसरें मोठें व्यापारी शहर बिस्क हें आहे. खाणींमुळें कोलीव्हन, मेनोगोरस्क, रिडर व सैलारस्क वगैरें गांवेंहि प्रसिध्दीस आलीं आहेत.