प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण १० वें.
वैदिक वाङ्मय, ब्राह्मण जाति आणि यज्ञसंस्था.

अथर्ववेदावरील सायणभाष्याच्या प्रस्तावनेचें सार.- 'ॠचः सामानि जज्ञिरे यजुस्तस्मादजायत' (ॠः १०.९०,९) यद्वै यज्ञस्य साम्ना यजुषा क्रियते शिथिलं यद् ॠचा तद्दृढम् (तै.सं.६.५. १०,३) (ऐ. ब्रा.५.३२; तै.ब्रा. ३.१२.९, १;१. २.१, २६) इत्यादि वाक्यांवरून यज्ञामध्यें अथर्ववेदाचा कांहीं संबंध नाहीं व याचा त्रयी वेदामध्यें उल्लेखहि नाहीं म्हणून त्याच्या व्याख्येची जरूरी नाहीं.

वरील आक्षेपावर सायणाचार्यांचें उत्तर.- ब्रह्म्याचें काम अथर्ववेदाशिवाय करतां येत नाहीं. इतर वेदांत 'ब्रह्मा' याच्या कर्माची माहिती आहे परंतु ती अपूर्ण आहे. 'हौत्रामर्शाः समान्माताः न तान् कुर्यात्' (आश्व ८.१३) या सूत्रावरून अपूर्ण माहिती घ्यावयाची नाहीं व अपूर्ण माहितीवरून कर्महि करावयाचें नाहीं. त्याप्रमाणें यज्ञाचे अर्ध शरीर त्रयीवेदानें सिद्ध होतें व दुसरा अर्धा भाग 'अथर्वाङिगरोमिर्ब्रह्मत्वं (गो.ब्र.३.२) अर्थववेदानें सिद्ध होतो, असें म्हटलें आहे. पहा (गो.ब्रा. २.२४; २.२४; ३,२). ''स त्रिभिर्वेदैर्विधीयते'' या स्मृतीची व्यवस्था त्रयीवेदांत जें 'ब्रम्हत्व' प्रतीपादित आहे त्यानेंहि अथर्ववेदाशिवाय काम केलें तरी चालेल अशा अभिप्रायानें हें स्मृतिवचन लावलें असतां लागते. 'त्रय्या विद्ययेति ब्रूयात्' (ऐ.बा.५.३३) हेंहि वचन वरील प्रमाणेंच आहे.
 
पुढील स्थलीं अथर्ववेदाचा उल्लेख आहे. (बृ.आ.४.४.१०; नृसिंहपूर्वता. १; मुण्डक. १.१.)
 
'यम् ॠषयस्त्रयीविदा विदुः । ॠचः सामानि यजूंषि' (तै.ब्रा. १.२.१.२६) वगैरे ठिकाणीं जे भेद केले गेले आहेत ते वेदगत मंत्राभिप्राय आहेत. म्हणजे वेदांचे भेद नसून ते वेदगत मंत्राचे भेद आहेत. यावरून अथर्ववेदाचेंहि नांव ॠग्, यजुस किंवा साम यांपैकी एक असावयास पाहिजे परंतु अथर्वा नांवाच्या महर्षीनें हा वेद पाहिला असल्यामुळें अथर्ववेद असें त्यास नांव पडलें. आख्यायिका (गो.ब्रा.१.४) पहा. हा वेद ब्रह्मकर्तव्यपर असल्यानें 'ब्रह्मदेव' असेंहि यास म्हणतात. (गो.ब्रा. १.९; ३.४;२.१४)
 
अथर्ववेद सिद्धमंत्र आहे. (प.२.५)
 
अथर्ववेदाचे पांच उपदेव आहेत. सर्पदेव, पिशाचवेद, असुरवेद, इतिहासवेद, पुराणदेव (गो.ब्रा.१.१०).
 
यज्ञांतील ब्रह्म्याचें काम ज्याप्रमाणें अथर्ववेदांत आहे त्याप्रमाणेंच शान्तिकपौष्टिक, राजकर्म, तुलापुरूषमहादानादि कर्मे अथर्ववेदांतीलच आहेत.
 
पौरोहित्य तर अथर्ववेदांतच विशेष रीतीनें आहे.
 
यानंतर सायणाचार्यांनीं भावनाविचार म्हणजे 'स्वाध्यायोऽध्येतव्यः' या वाक्याच्या अर्थासंबंधी वगैरे विचार केला आहे, त्यांत अध्ययनविधि अर्थज्ञानाकरितां कीं स्वर्गाकरितां आहे इत्यादि विवरण केलें आहे, व अर्थाकरितां आचार्यकरणविधि कोठेंहि नाही. असें म्हटलें आहे.
 
उपनयन आणि आचार्यक यांचा अङ्गाङ्गिभाव नाहीं 'अष्टवर्षं ब्राम्हणं उपनयीत' या वाक्यांतील 'उपनयीत' येथील आत्मनेपदावरून स्वात्मसमीहितसाधनाची प्रतीति होते. उपनयन अध्ययनाङ्ग आहे. अध्यापनाचा विधि नाहीं. अध्ययनाचा विधि आहे.
 
यानंतर वेदांचें प्रामाण्य व अपौरूषेत्व यासंबंधीं विवेचन करून सायणाचार्य म्हणतात कीं एकंदरींत वेद स्वतःप्रमाण व अपौरूषेय आहेत म्हणून त्यांची व्याख्या करणें उचित आहे.
 
स्वतःप्रामाण्यवाद, त्यावरील आक्षेप व त्यांचें खंडन.
 
वेदापौरूषेयत्ववाद. 'भारताप्रमाणे वेद पौरूषेय असवयास पाहिजेत.' 'कर्ता उपलब्ध नाही, म्हणून वेदास कर्ता नाहीं.' तस्माद् यज्ञात्सर्वहुतः (ॠ. १०.९०,९), अनन्तरं च वक्रेभ्यः (ऐ.ब्रा. ५.३६) इत्यादि ॠचा अर्थवादरूप आहेत. वेद अपौरूषेय आहेत म्हणूनच ते नित्य आहेत. शब्द (स्फोट) नित्यवाद, वेद हा अपौरूषेय, नित्य व विवक्षित. अर्थप्रतिपादक असल्यामुळें त्याचें व्याख्यान करणें उचित आहे.
 
सर्वत्र अथर्ववेदाचा निर्देश शेवटीं असल्यामुळे सर्व वेदाच्या शेवटीं याची व्याख्या केली आहे. (गो.ब्रा.१.१६; १७;२०; तै.आ. २.१०)
 
अथर्ववेदाचे नऊ भेद आहेतः-
 
पैप्पलादाः, २ तौदाः, ३ मौदाः, ४ शौनकीयाः, ५ जाजलाः, ६ जलदाः, ७ ब्रह्मवदाः, ८ देवदर्शाः, ९ चारणवैद्याः इति.
 
यांपैकी शौनकीय, जाजल, जलद व ब्रह्मवद या चार शाखांतील सूक्त, अनुवाक, ॠचा यांचा विनियोग गोपथब्राह्मणाला अनुसरून कौशिक, वैतान, नक्षत्रकल्प, आङ्गिरसकल्प व शान्तिकल्प या पांच सूत्रांनी सांगितला आहे. 'कौशिक' सूत्राचें नांव 'संहिताविधि' असेहि असावें असें उपवर्षाचार्याच्या कल्पसूत्राधिकरणामध्यें लिहिल्यावरून दिसतें
 
वरील पांच सूत्रांत भिन्न भिन्न त-हेनें संगृहीत झालेलीं कर्मे कळण्यास कठिण आहेत म्हणून त्यांची यादी सायणाचार्यांनीं दिलेली आहे त्यांतील तात्पर्य.

कौशिकसूत्रांत.- दर्श-पूर्णमासविधि, कांहीं संस्कार, अभिचार, जादुटोणा, कांहीं काभ्ययाग, रोगनाशकमन्त्र, पिण्डपितृयज्ञ वैगरे.
 
वैतानसूत्रांत.- यागविषयाला प्राधान्य असून तदनुरोधानेंच दर्शपूर्णमासापासून राजसूय, अश्वमेधापर्यंत अथर्ववेदाचा संबंध दाखविला आहे.
 
नक्षत्रकल्पांत.- कृत्तिका नक्षत्राच्या पूजेपासून आरंभ करून अनेक शान्तीच सांगितल्या आहेत.
 
आङ्गिरसकल्पांत.- अभिचारकर्माला प्राधान्य असून अभिचारकर्म करणारांचें संरक्षण. अभिचाराला उपयुक्त देश, काल, मण्डप, दीक्षा वगैरे संभारांचें निरूपण. परकृत अभिचारनिवारण.
 
शान्तिकल्पांत.- वैनायकग्रहगृहीतांचीं लक्षणें. शान्ति वगैरे. नवग्रहयज्ञादिक.
 
परिशिष्टांत.- राज्याभिषेक, राजचिन्हप्रदान वगैरे राजासंबंधी कर्मे. कपिला, तिलधेनु भूमिदान वगैरे. अनेक होम, व्रतें वगैरे. नित्य नैमित्तिक, काम्य वगैरे भेद.
 
कौशिकसूत्रांत आङ्गिरसकल्पाचा उल्लेख आला आहे. 'आहृत्य आङ्गिरसम्' (कौ.६.१) 'आङ्गिरसकल्पोक्तभित्यर्थः' असा सायणाचार्य अर्थ करितात.
 
पाकयज्ञ शब्दानें 'आथर्वण' कर्माचा उल्लेख होत असतो त्याचे दोन प्रकार आहेत. आज्यतन्त्र व पाकतन्त्र.
 
आज्यतन्त्र व पाकतन्त्र यांतील भेद व अनुष्ठानक्रम वगैरे सायणाचार्यांनी दिले आहेत.