www.ketkardnyankosh.in
निर्मितीमागील भूमिका

‘कोश’ ह्या शब्दाचा अर्थ १८५७ साली प्रकाशित झालेल्या मोल्सवर्थ शब्दकोशात पाहिला की ‘The treasury’ असा अर्थ दिसतो. Treasury ह्या शब्दाचे मराठी भाषांतर ‘खजिना’ असे केले जाते. त्या अर्थाने कोणताही ज्ञानकोश (Encyclopedia) हा ज्ञानाचा खजिनाच असतो. १९२० ते १९२९ ह्या काळात प्रकाशित झालेले डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर संपादित महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे २३ खंड हा पहिला मराठी ज्ञानकोश. ज्ञानाचा खजिना मराठी भाषेत कोशाच्या स्वरूपात पहिल्यांदा उलगडला त्याला आता ९० वर्षे उलटली. हे २३ खंड नंतर कधीच पुनर्मुद्रित झाले नाहीत. ९० वर्षांचे उन्हाळे-पावसाळे, पूर-पाणी सोसत टिकलेली, ९० वर्षांपूर्वीच्या कागदावर छापली गेलेली, दोऱ्याने बांधली गेलेली पुस्तके आणखी किती उन्हाळे-पावसाळे पाहतील?  उगवत्या पिढ्यांसाठी मराठी भाषेतील तो ज्ञानाचा खजिना जपून ठेवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. त्यात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई ही संस्थाही अर्थातच समाविष्ट आहे.

गेल्या वर्षी धर्मानंद कोसंबी यांचे समग्र वाङ्मय यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ने dharmanandkosambi.com ह्या संकेतस्थळावर उपलब्ध केले. त्या पाठोपाठ यशवंतराव चव्हाण यांचे समग्र वाङ्मय आणि १९५० पासूनची त्यांची सुमारे ८० भाषणे श्राव्य स्वरूपात ybchavan.in ह्या संकेतस्थळावर प्रकाशित केली. ह्या संकेतस्थळाचा गौरव महाराष्ट्र शासनाने ह्या वर्षी पुरस्कार देऊन केला हे सांगतानाही आनंद वाटतो. यंदा २०१३ मध्ये त्यात ketkardnyankosh.in ची भर पडत आहे. अतिशय दुर्मिळ झालेले मराठी साहित्य व मराठी ज्ञान यांची जपणूक व्हावी यासाठी जमेल ते सारे काही करावे असे प्रतिष्ठानचे धोरण आहे. त्यातूनच मराठीतला पहिला ज्ञानकोश १२ मार्च २०१३ ह्या यशवंतरावांच्या १०० व्या जन्मदिनी इंटरनेटवर लोकार्पण करण्यात येत आहे.

संपूर्ण ज्ञानकोशाचे मजकुराने भरगच्च असे २३ खंड एका संकेतस्थळात बसविण्याचे काम हे जगन्नाथाचा रथ ओढण्यासारखेच होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने ते काम पुजासॉफ्ट संस्थेच्या माधव शिरवळकर यांच्याकडे सोपवले. आज ते आपल्यापुढे सादर होत असताना आनंद वाटतो. मराठी भाषेसाठी असे कार्य आणि प्रकल्प हाती घेण्याचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे व्रत यापुढेही असेच अखंड चालत राहणार आहे.

धन्यवाद.

आपला,


   शरद पवार
   अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई.