प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २१ वें.
मुसुलमानांची हिंदुस्थानावर सत्ता.

हिंदुस्थानावर स्वा-या करणारे मोंगलः तैमूरलंग व बाबर.- १३९८ मध्यें तैमूरलंगानें हिंदुस्थानावर स्वारी केली. त्यानें दिल्ली लुटली व मोठ्या वावटळीप्रमाणें हिंदुस्थानांत थोडावेळ धुमाकूळ घालून परत स्वदेशाची वाट धरली. या धामधुमीच्या काळांत दिल्लीच्या बादशहाचें प्रांतोप्रांतीचे सुभेदार स्वतंत्र राजे बनले. तैमूरलंग गेल्यावर दिल्ली येथें सय्यद घराण्यानें १४१४-१४५० पर्यंत व लोदी घराण्यानें १४५०-१५२६ पर्यंत राज्य केलें. लोदी घराण्याचा इब्राहिम राज्य करीत असतां लाहोरचा सुभेदार दौलतखान लोदी यानें काबुलचा मोंगल राजा बाबर याच्या मदतीनें दिल्लीवर चाल केली. त्यांत बाबरला जय मिळून त्यानेंच दिल्लीची गादी बळकावली. हा हिंदुस्थानांतला पहिला मोंगल बादशहा होय.