प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण १५ वें
जीविशास्त्रें  

अतिभौतिक, मानसिक, आत्मिक इत्यादि व्यापारांचे संशोधन.- आत्मा, मन किंवा चैतन्य म्हणून ज्यांनां म्हणतात तीं इंद्रियगोचर नाहींत म्हणून तीं व त्यांचे व्यापार भौतिकशास्त्रांच्या कक्षेंत येत नाहींत. तशीं तीं कधींच येणार नाहींत असें मात्र अद्याप भौतिेक शास्त्रज्ञ कबूल करण्यास तयार नाहींत इतकेच नव्हें तर सदरहू प्रकारचे व्यापार भौतिक ज्ञान संपादण्याच्या कसोटया लावून तपासण्याकरितां व त्यांची तितकी अधिक माहिती मिळविण्याकरितां 'सायकिकल रिसर्च सोसायटी' (१८८२) नावांची संस्था स्थापून मोठमोठे भौतिक शास्त्रज्ञ प्रयत्न करीत आहेत. अशा व्यापारांवर विश्वास न ठेवतां त्यांची सत्यासत्यता ठरविण्याचे प्रयत्न करणारे विद्वान् प्राचीन काळांतहि आढळतात. प्राचीन ग्रीसमध्यें डेल्फी येथील देवालयांत अंगात देव येऊन भविष्य सांगतो असें म्हणणा-या देवळांतील पुजा-यांचें अनेक शतकें स्तोम माजलें होते. पण हे दैविक चमत्कार मूरर्च्छूच्छनाशास्त्रांतील अदृश्यवलोकनशक्तीनेनें (क्लेअरव्हायन्सनें) घडतात असें क्रोएससनें सिद्ध केलें. नवप्लेटोमतवादी तत्त्ववेत्ता पॉर्फिरी यानें भविष्य सांगणा-या, अग्नीमधूंन कांही एक अपाय न होतां चालत जाणा-या, निर्जीव पदार्थ स्पर्श न करतां चालवून दाखविणा-या माणसांचे चमत्कार व भुतांखेतांचे चमत्कार यांत तथ्य काय आहे तें पाहून त्यांतील लबाडया चव्हाटयावर आणण्याचा प्रयत्न केला. अशा त-हेचे चमत्कार दाखविणारे लोक व त्यांत भ्रम, भामटेगिरी आहे असें म्हणणारे लोक हिंदू, चिनी, जपानी वगैरे पौरस्त्य देशांतहि प्राचीन काळापासून आढळतात. यांपैकीं कांहीं चमत्कार प्रत्यक्ष करून दाख्विणारें व त्यांचा मानसशास्त्रदृष्टया उलगडा सांगणारें मूरर्च्छनाशास्त्र १८ व्या शतकांत जन्मास आलें. अलीकडे १८८२ मध्यें सायकिकल रिसर्च सोसायटी स्थापन झाली असून इंग्रज, फ्रेंच, जर्मन इटालियन वगैरे अनेक शास्त्रज्ञ अनेक प्रकारच्या चमत्कारांची शहानिशा करीत असतात. या सोसायटीच्या कामकाजासंबंधाचे अनेक अहवाल ग्रंथ (प्रोसीडिंग्ज) प्रसिद्ध झालेले आहेंत. या प्रयत्नांतूनच विविध चमत्कारांचा उलगडा करणारें समभावनोत्पादन (टेलेपथी) नांवाचें शास्त्र जन्मास आलें आहे. उलटपक्षीं, प्लँचेट नांवाचें मृतात्म्यांचे संदेश लिहून दाखविणारें यंत्र निघून अशा प्रकारच्या चमत्कारांत भरच पडत आहें.