प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.
सैबीरिया (आशिया)
सैबीरिया.- यूरोपीयांच्या राजयसत्तेखालीं व संस्कृतीखालीं पूर्णपणें सापडलेला आशियाखंडाचा मोठा भाग म्हटला म्हणजे सैबीरिया हा प्रांत होय. हा प्रांत बळकाविण्याकरितां धडपड चीन, जपान व रशिया यांच्यामध्यें पूर्वीं चालू होती व हल्लींहि चालू आहे.
प्राचीन वसाहती.- सैबीरियांतील सरोवरांच्या कांठी प्राचीन नवपाषाण युगांतील अनेक अवशेष सांपडतात. त्यांवरून व इतर कांहीं पुराव्यांवरून येथें प्राचीन काळी हल्लींपेक्षां फार दाट वस्ती असावी असें अनुमान निघतें. आशियांत पूर्वेकडून पश्चिमेकडे लोकांच्या मोठाल्या झुंडी पसरल्या त्यावेळीं कांहीं उत्तरेकडे वळून सैबीरियांत शिरल्या व मागून आलेल्या लाटेमुळें त्या अधिकाधिक उत्तरेकडे सरकल्या. राडलॉव्हचें म्हणणें असें आहे कीं, सैबीरियांतील अगदीं आद्य रहिवाशी येनिसीयन लोक होते व त्यांची भाषा उरल आल्ताइक भाषेपेक्षां निराळी होती. त्यांचे थोडे अवशेष सयन पर्वतांत सापडतात. येनिसीयनांनंतर उग्रोसामोयिडी लोक आले व ख्रि. पू. ३ -या शतकांत हूण लोकांच्या मोठ्या लाटेमुळें ते आलताई व सयन पर्वत ओलांडून सैबिरियांत शिरले. दक्षिण सैबिरियांत सर्वत्र आढळून येणारे कांस्ययुगांतले अवशेष या उग्रो- सामोयिडी लोकांच्या वेळच्या वस्तूंचे असले पाहिजेत. त्यांनां लोखंड माहीत नव्हते परंतु ब्राँझ अथवा कांसें, रूपें व सोनें या धातूंच्या कामांत ते निष्णात होते. त्यांचे ब्राँझचे दागिने व हत्यारें हीं बहुधा चांगलीं गुळगूळीत जिल्हई केलेली व मोठ्या कुशलतेने बनविलेलीं दिसतात. पुष्कळ जमीन भिजेल इतके पाटबंधारे त्यांनीं बांधले होते. एकंदरीनें पाहतां हे लोक त्यांच्या मागून आलेल्या इतर लोकांपेक्षां पुष्कळ अधिक सुधारलेले होते. त्यानंतर आठ शहतकांनीं चीनांतील तुर्की वंशांतल्या खगसी व यिगुर नांवाच्या लोकांनीं उग्रो-सामोजिडी लोकांनां जिंकलें. या नव्या जेत्यांचेहि अवशेष पुष्कळ सापडतात. त्यांनां लोखंड धातूची माहिती होती व ब्राँझची माहिती त्यांनीं जित लोकांपासून मिळविली. या लोकांचें भांडी करण्यांतील कौशल्य कांस्ययुगांतल्या कामापेक्षां फार अधिक सुधारलेलें आहे. या खगसी लोकांचें तुर्की साम्राज्य १३ व्या शतकापर्यंत टिकलें असावें व नंतर चेंगिझखान याच्या नेतृत्वाखालीं मोंगल लोकांनीं तें जिकून त्यांची संस्कृति नष्ट केली. त्या वेळचीं जीं थडगीं सापडलीं आहेत त्यांवरून हा काळ अवनतीचा गेला असें खास दिसतें.