विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

रड्डी - ही जात शेतकी करणारी असून मुंबई इलाख्यांत विजापूर, धारवाड व बेळगांव जिल्ह्यांत मुख्यत्वेंकरून आढळते. लोकसंख्या सुमारें ५०००० आहे. म्हैसूर संस्थानांत या जातीचा विशेष भरणा असून या जातींत ८ भेद आहेत; त्यांपैकीं पाकनक जात मुंबई इलाख्यांत आढळतें. राष्ट्रकूट अथवा रट्ट घराण्याचा या जातीशीं एकप्रकारचा संबंध आहे असें दिसतें. व्यंकटगिरि हें त्यांचें मूळ स्थान होय. हे लग्नप्रसंगीं रवीची पूजा करतात. यांच्या आठ भेदांपैकीं फक्त एक नामद वर्ग हिंदु असून बाकी सर्व लिंगायत आहेत. जरी लिंगायताची मुलगी नामद वर्गांत करीत नाहींत तरी नामदाची मुलगी लिंगायत करतात. त्यांचा पिढीजात धंदा शेतकीचा आहे. तथापि कांहीं व्यापार व सावकारी करतात. हे लोक मांस खात नाहींत आणि दारूहि पीत नाहींत.