प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.

प्रकरण ३ रें.
वेदप्रवेश – अथर्ववेद.

अथर्ववेदाचें स्थान.- पुष्कळ दिवसपर्यंत भारतीय लोक अथर्ववेदाला पूज्य व पवित्र मानित नव्हते, व अजून सुद्धां ह्याविषयीं अनेक वेळां लढा पडतो, म्हणून हा वेद मागाहूनचा आहे, असें कांहीं निश्चित म्हणतां येणार नाहीं. ह्या वरील गोष्टीला कारण म्हणजे अथर्ववेदांतील विषयच आहे. ह्या वेदाचा हेतु (शांतिपौष्टिकाभिचार कर्म) अनिष्टशांति, इष्टपूर्ति व शुत्रपीडा हे आहेत. अभिशाप व भूतापसारण यांसंबंधीं मंत्रविधी अपवित्र मंत्रवर्गांत येत असल्यानें ब्राह्मणांनीं आपल्या ब्रह्मणधर्मापासून त्यांनां दूर ठेवण्याचा प्रयत्‍न केला. एकंदरींत पाहूं जातां, परमार्थसाधन व जादूविद्या ह्यांत तत्त्वतः मुळींच फरक नाहीं. दोन्ही अतींद्रिय सूष्टीवर तावा चालवूं पाहतात. शिवाय आचार्य  जादूगार मूळांत एकच आहेत. परंतु प्रत्येक देशांतील लोकांच्या इतिहासांत असा एक काल येतो कीं, त्या वेळेस परमार्थसंप्रदाय व मंत्रविद्या एकमेकांपासून विमक्त होऊं पाहतात. त्यांत सर्वस्वी यश येत नाहीं ही गोष्ट निराळी. देवांशीं सख्य ठेवणारा पुरोहित, पिशाच्यांशीं संबंध ठेवणार्‍या जादूगाराचा अनादर करितो आणि त्याला आपल्यापेक्षां कमी प्रतीचा लेखतो. हिंदुस्थानांत सुद्धां हें दोघांतील अंतर वाढत गेलें आहे. अथर्ववेदांतील अभिचारांपासून व मंत्रविद्येपासून अलिप्त राहण्याविषयीं बौद्ध व जैन भिक्षूंनां सक्त ताकीद असते इतकेंच नव्हे, तर ब्राह्मणी धर्मशास्त्रांतून सुद्धां चेटूक हें पाप  मानिलें आहे, व चेटूक करणाराला दगलबाज व पाखंडी ह्यांच्या पंक्तीला बसवून त्यांनां शिक्षा करणयाची या शास्त्रानें राजाला आज्ञा केली आहे. उलटपक्षीं, ब्राह्मणांच्या धर्मशास्त्रांतून कांहीं ठिकाणीं, शत्रूविरूद्ध अथर्ववेदांतील अभिचारमंत्रांचा उपयोग करण्यविषयीं स्पष्ट परवानगी दिली आहे; आणि मोठमोठ्या यज्ञांचें वर्णन असलेल्या सूत्रग्रंथांतून पुष्कळसे भूतापसारणमंत्र आणि शत्रूंचा (योऽस्मान् द्वेष्टि यं च वयं द्विष्मः) नायनाट करण्यास समर्थ अशा मंत्रविधींचीं वर्णनें आढळतात. तरीपण ह्या अभिचारवेदाविषयीं त्रैविद्य पुरोहितवर्गामध्यें एक प्रकारचा तिटकारा उत्पन्न झाला; हा वर्ग अथर्ववेदाला सत्य व प्राचीनत्व या दृष्टींनीं कमी प्रतीचा लेखीत असें म्हणून पवित्र धर्मग्रंथांत त्याचा समावेश करण्याचें पुष्कळ वेळां टाळलेलें आढळतें. मुळापासूनच पवित्र धार्मिक वाङ्मयांत ह्याचें स्थान अनिश्चित असून त्यासंबंधाच्या कल्पना कांहींशा चमत्कारिक दिसतात. जेथें जेथें म्हणून जुन्या ग्रंथांतून पवित्र धार्मिक विद्या म्हणून उल्लेख आला आहे, त्या त्या ठिकाणीं ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद ह्या “त्रयी विद्ये” चा पहिल्यानें नामनिर्देश केलेला आढळतो; या त्रयी विद्येंनंतर अथर्ववेदाचा उल्लेख सांपडला तर सांपडतो. कधीं कधीं असेंहि होतें कीं, वेदांगें व इतिहासपुराणें हीं सुद्धां धर्मिक ग्रंथमालिकेंत दृष्टीस पडतात, पण अथर्ववेद मात्र वगळला जातो. शांखायनाच्या गृह्यसूत्रामध्यें (१.२,४,८) एक संस्कार वर्णन केला आहे; तो नवीन जन्म पावलेल्या मुलांच्या ठायीं वेदाधिक्षेपण करण्याचा होय. हें अधिक्षेपण विधियुक्त करण्यांत येतें व त्या वेळीं मंत्र म्हणवयाचा तो असा– “मी तुझ्या ठिकाणीं ऋग्वेदाधिक्षेपण करतों, मी तुझ्या ठिकाणीं यजुर्वेपाधिक्षेपण करतों, मी तुझ्या ठिकाणीं सामवेदाधिक्षेपण करतों, मी तुझ्या ठिकाणीं कथापुराणाधिक्षेपण करतों, मी तुझ्या ठिकाणीं सर्व वेदाधिक्षेपण करतों.” या ठिकाणीं तर अथर्ववेदाला  मुद्दाम वगळलेलें दिसतें. जुन्या बोद्ध ग्रंथांतून सुद्धां विद्वान् ब्राह्मणांविषयीं उल्लेंख करितांना ते तीन वेदांत पारंगत आहेत असें म्हटलें आहे. आतां अथर्ववेदाचा वरील सर्व ठिकाणीं उल्लेख केलेला नाहीं म्हणून अथर्ववेदासंहिता या सर्वांच्या मागाहूनची आहे असें म्हणणें निखालस चुकीचें ठरेल; कारण कृष्णयजुर्वेदाच्या एका संहितेंत, आणि कोठें कोठें ब्राह्मणें, उपनिषदें वगैरे ग्रंथांतून अथर्व वेदाचा इतर तीन वेदांबरोबर उल्लेख केलेला आढळतो.

अथर्ववेदसंहितेची उपलब्ध प्रत ऋग्वेदसंहितेच्या मागाहूनची आहे हें जरीं खरें आहे, तथापि ह्यावरून असें कांहीं निघत नाहीं कीं, त्यांतील सर्वच सूक्तें ऋग्वेदसूक्तांनंतरचीं आहेत. फक्त एवढें सिद्ध होतें कीं, अथर्ववेदांतील सर्वांत मागाहूनचीं सूक्तें हीं ऋग्वेदांतील सर्वांत मागाहूनच्या सूक्तांनंतरचीं आहेत. ज्याप्रमाणें अथर्ववेदांतील बरींचशीं सूक्तें पुष्कळशा ऋग्वेदसूक्तांनंतरचीं आहेत, त्याचप्रमाणें अथर्ववेदांतील अमिचारऋचा या ऋग्वेदांतील यज्ञसंबंधीं ऋचांपेक्षां जरी जास्त जुन्या नसल्या तरी त्यांच्या इतक्याच जुन्या आहेत हेंहि निश्चत आहे व अथर्ववेदांतील अनेक सूक्तें ऋग्वेदांतील जुन्यांत जुन्या सूक्तांइतकींच  प्राचीन, त्याच अज्ञात प्रागैतिहासिक कालांतील, आहेत. ‘अथर्ववेदाकाल’ म्हणून ठराविक मर्यांदित काल असा नाहीं. ऋग्वेदसंहितेप्रमाणें अथर्ववेदांतील कांहीं कांहीं सूक्तांच्या रचनाकालामध्यें कित्येक शतकांचें अंतर आहे. आणि म्हणून अथर्ववेदाच्या शेवटचीं शेवटचीं सूक्तेंच काय तीं ऋग्वेदसूक्तेंच्या धर्तींवर रचलीं आहेत, असें म्हणतां येईल. हिंदुस्थानांतील अतिशय जुने अभिचार गद्यात्मक होते आणि पद्यमय ऋचा व सूक्तें हीं सर्व ऋग्वेदांतील यज्ञविषयक सूक्तांच्या धर्तीवर रचलीं आहेत” हें ओल्डनबर्गचें मत डॉ. विटरनिट्झला चुकीचें वाटतें. ऋग्वेदांतील विषय व कल्पना हीं अथर्ववेदाहून अगदीं निराळीं आहेत. ऋग्वेदांतील सृष्टि निराळी व अथर्ववेदांतील निराळीं. एकांत पंचमहाभूतात्मक मोठमोठे देव आहेत, गायक त्यांचा जयजयकार व स्तुति करीत आहे, त्यांच्या प्रीत्यर्थ यज्ञ करीत आहे; ते फार बलाढ्य संकटसमयीं धांवून येणारे कांहींसे उदार मनाचे, बहुतांशीं आनंद व प्रकाशदायी असे आहेत; तर इकडे दुसर्‍या सृष्टींत, मनुष्य जातीवर संकटें व पीडा आणणार्‍या दुष्ट आसुरी शक्ती, भयप्रद पिशाच्चें, त्यांच्यावर उग्र शाप सोडणारे किंवा त्यांची मिथ्या प्रशंसा करून त्यांचें शमन व निराकरण करूं पाहणारे मंत्रिक इत्यादि आढळतात. या वेदांतील पुष्कळशीं सूक्तें व तत्संबंधीं तंत्रविधी या गोष्टी अशा प्रकारच्या कल्पनांच्या वर्गांत मोडतात कीं त्या कल्पना पृथ्वीवरील अगदीं मिन्न संस्कृतीच्या लोकांत आढळत असून त्यांजमध्यें विलक्षण सादृश्य असतें. उदाहरणार्थ, उत्तर अमेरिकेंतील इंडियन, आफ्रिकेंतील नीग्रो, मलायी व मोंगल, पुरातन ग्रीक व रोमन, आणि यूरोपखंडांतील आजकालचे कृषीवल या सर्व लोकांच्या जारणमारणविषयक कल्पना, व मंत्रतंत्र आणि त्यांमधील विचारांच्या विलक्षण उड्या ह्या सर्व गोष्टी पुरातन हिंदू लोकांच्या अथर्ववेदांतल्याप्रमाणेंच दिसततात. तेव्हां, अथर्ववेदांतील पुष्कळशा ऋचांचे विषय व त्यांचें स्वरूप अमेरिकन इंडियन वैदूलोक व तार्तरशामन ह्यांचे मंत्र, व अति प्राचीन जर्मन काव्यावशेषांत आढळणारे मर्सेबर्ग मंत्र, यांच्याशीं बहुतेक जुळतें, उदाहरणार्थ, मर्सेबर्ग मंत्रसंग्रहांत एक मंत्र असा आहे कीं, वोडन (Woden) या मांत्रिकानें बाल्डर (Balder) याच्या शिंगराचा मुरगळलेला पाय खलील मंत्रानें बरा केला. ‘हाडाशीं हाड, रक्ताशीं रक्त, अवयवाशीं अवयव अगदीं चिकटविल्याप्रमाणें (एकजीव होवो)’ अगदीं ह्यासारखाच मंत्र अथर्ववेदांत (४.१२), पाय मोडलेल्यावर आहे.

सं ते मज्जा मज्ज्ञा भवतु समु ते परूषा परूः।
सं ते मांसस्य विस्त्रस्तं समस्थपि रोहतु।।३।।

मज्जा मज्ज्ञा संधीयतां चर्मणा चर्म रोहतु।
असृक् ते अस्थि रोहतु मांसं मांसेन रोहतु।।४।।

लोम लोम्ना सं कल्पया त्वचा सं कल्पया त्वचम्।
असृक् ते अस्थि रोहतु च्छिन्नं सं घेह्योषधे।।५।। अथर्व.४.१२.

तुझ्या शरिरांतील मज्जांशीं ह्या तुटलेल्या मज्जा, व अवयवांशीं तुटलेला अवयव जोडला जावो. शरिरांतील नाहींसें झालेलें मांस व मोडलेलें हाड पुन्हां वाढो.३.

मज्जांत मज्जा मिळून जावोत. फाटलेलें कातडें पुन्हां एक होवो. तुझ्या शरिरांतील नाहींसें झालेलें रक्त व मोडलेलें हाड पुन्हां उत्पन्न होवो आणि मांसांची वाढ होवो. ४.

हे वनस्पतें, नाहींसे झालेले केस तुझ्यामुळें पुन्हां येवोत, कातड्याशीं कातडें मिळून जावो. रक्त व हाड वाढो; आणि याप्रमाणें झालेली जखम पूर्ण बरी होवो. ५.

अथर्ववेदसंहितेला जें विशेष महत्त्व प्राप्त झालें आहे तें खालील गोष्टीमुळें होय भूतपिशांच्चें, मुंजे, राक्षस वगैरे पुष्कळ निरनिराळ्या योनींसंबंधानें आणि यज्ञसंस्था तसेंच तत्त्वज्ञानयुक्त विचार यांपासून पृथक्त्वानें वागत असलेल्या लोकांच्या निरनिराळ्या काय समजुती होत्या याबद्दलचें यथार्य ज्ञान मिळण्यास हें अमूल्य साधन आहे. हें ज्ञान मानववंशशास्त्र व देवविषयक कल्पनांचा इतिहास यांच्या अभ्यासकांस अत्यंत महत्त्वाचें आहे हें उघड आहे. मनुष्य जातीचा बौद्धिक इतिहास जाणूं इच्छिणार्‍या शास्त्राज्ञाला अथर्ववेदाचें ज्ञान किती आवश्यक आहे हें त्यांतील कांहीं निरनिराळ्या प्रकारच्या सूक्तांचा विचार केला असतां दिसून येईल.