चिरस्मरणीय ज्ञानकोश
लेखक - प्रा. श्री. के. क्षीरसागर
(समीक्षक, टीकाकार व डॉ. केतकर साहित्याचे अभ्यासक).
केतकरांनी महाराष्ट्रात कोशयुग सुरू केले असे म्हणतात. एका अर्थाने ते खरेही आहे. केतकरांच्या ज्ञानकोशानंतर महाराष्ट्रात अनेक प्रकारचे कोश निघाले व त्या कार्यात ज्ञानकोशाच्या आखाडय़ात तयार झालेलीच मंडळी प्रामुख्याने पुढे होती.
ज्ञानकोशानंतरच्या कोशवाङ्मयात चित्रावशास्त्रींचे चरित्रकोश त्यातल्या त्यात नाव घेण्यासारखे म्हणून सांगता येतील. केतकरांचा ज्ञानकोश अपुरा आहे किंवा जुना झाला म्हणून ज्ञानकोशासारख्या आणखीही काही रचना गेल्या काही वर्षांत झाल्या. नवा ज्ञानकोश किंवा विश्वकोश तयार करण्याचे कार्य आता आणखी काही मातब्बर मंडळींनी अंगावर घेतले आहे. या सुमारास नव्या ज्ञानकोशाचे जुन्या ज्ञानकोशाशी कोणते नाते असावे, हा प्रश्न सोडविणे जरूर आहे.
साहित्य संस्कृती महामंडळाच्या विद्यमाने नवा ज्ञानकोश तयार करण्यास सुरुवात झाली आहे असे समजते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यासारख्या विख्यात पंडिताच्या व समाजशास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले हे कार्य नाव घेण्यासारखे होईल याविषयी शंका नाही. शिवाय ज्ञानकोशाला जे लाभले नव्हते व ज्ञानकोशाने जे स्वीकारलेही नसते, ते बळ- म्हणजे सरकारी द्रव्याचे बळही- स्वातंत्र्यकाळातील या ज्ञानकोशाच्या पाठीशी भरपूर असणार. वाईच्या प्राज्ञ-पाठशाळेच्या निरलस ज्ञानसेवेची परंपराही या नव्या ज्ञानकोशाच्या पाठीमागे उभी आहे. अशा स्थितीत या कार्याला अत्यंत सुयोग्य नेतृत्व आणि वातावरण लाभले आहे, असेच कोणीही म्हणेल. तथापि या महत्कार्याला सुरुवात होत आहे, अशावेळी ज्ञानकोशाच्या वारशाची आठवण करून देण्याची आवश्यकता मात्र मजसारख्याला अधिकच वाटते.
‘ज्ञानकोश’ शब्दात वाईट ते काय? पहिली गोष्ट म्हणजे मराठीमध्ये ‘एन्सायक्लोपीडिया’ या अर्थाने डॉ. केतकर यांनी चालू केलेला ‘ज्ञानकोश’ हा सुंदर शब्द बदलण्याची गरज कोणती, हे मला तरी समजत नाही. ज्ञानकोश आणि विश्वकोश यांचे कार्य एकच असल्यावर एकाने ‘ज्ञानकोश’ म्हणावे, दुसऱ्याने ‘विश्वकोश’ म्हणावे, तिसऱ्याने ‘ब्रह्मांडकोश’ म्हणावे, असे करण्याने साधत तर काहीच नाही; उलट मराठीत विशिष्ट संज्ञा रूढ होण्याला अडचण मात्र होते. ज्ञानकोश शब्दात ‘एन्सायक्लोपीडिया’ची कल्पना जितकी यथार्थतेने प्रकट होते, तितकी ‘विश्वकोश’ या शब्दात होत नाही असे म्हणता येईल. ‘सायक्लोपीडिया’ या शब्दात ज्या दोन ग्रीक शब्दांचा समास आहे त्यांचे अनुक्रमे इंग्रजीत भाषांतर उ्र आणि छीं१ल्ल्रल्लॠ असे होते. म्हणजे ज्ञानाचे वर्तुळ किंवा ‘ज्ञानचक्र’असा ‘एन्सायक्लोपीडिया’ या शब्दाचा अर्थ होतो. यादृष्टीने महाराष्ट्रात जेवढे म्हणून ज्ञानकोशसदृश ग्रंथ होतील तेवढय़ांना ‘ज्ञानकोश’ हा एकच शब्द चालू करणे अधिक योग्य होईल. कारण त्यात योग्य शब्द वापरल्यासारखेही होईल आणि एकाच कल्पनेला प्रत्येकाने वेगळा शब्द वापरण्याची महाराष्ट्रातील प्रवृत्तीही टाळल्यासारखे होईल.
हा झाला केवळ नावाचा विचार. आता प्रत्यक्ष कार्यातही केतकरांच्या ज्ञानकोशाचे कार्य दृष्टीआड करणे कसे चुकीचे होईल, ते पाहिले पाहिजे. ‘ज्ञानकोश’ शब्दाचा अर्थ जरी यच्चयावत ज्ञानाचा संग्रह करणे व शक्यतो ते ज्ञान अकारविल्हे उपलब्ध करून देणे- हा असला तरी तो ज्ञानसंग्रह निर्लेप आणि निरपेक्ष असू शकत नाही, असे युरोपमधील ज्ञानकोशांच्या इतिहासावरून दिसते. फ्रान्समधील ज्ञानकोशाने फ्रेंच राज्यक्रांतीची बीजे पेरली, हा इतिहास मशहूरच आहे. अशाच प्रकारची ज्ञानमूल क्रांती स्वराज्योन्मुख महाराष्ट्रात व्हावी, अशी केतकरांची महत्त्वाकांक्षा होती. पण प्रत्येक देशातील क्रांतीचे स्वरूप सारखेच असेल असे नव्हे. ज्या कारणाने दास्य आणि कुचंबणा निर्माण झाली असेल, त्या कारणाचे निर्मूलन हे क्रांतीचे स्वरूप राहील. डीदेरोच्या काळातील फ्रान्सची बौद्धिक कुचंबणा ज्या कारणाने झाली असेल, त्याच कारणाने टिळक-आगरकरांच्या काळातील महाराष्ट्राची कुचंबणा झाली असेल असे नव्हे. केतकरांनी ज्ञानकोशाला जेव्हा हात घातला, तेव्हा त्यांना हिंदुस्थानात जुन्या युरोपसारखे धर्मगुरूंचे साम्राज्य आढळले नाही, तर गोऱ्या गुरूंचे दास्य आढळले. हिंदुस्थानच्या प्राचीन तत्त्वज्ञानासंबंधी, धर्मासंबंधी व सामाजिक संस्थांसंबंधी युरोपीयन पंडित जे निष्कर्ष काढतील, ते डोक्यावर घेण्याची प्रवृत्ती इकडच्या पंडितांत वाढली होती. इतकेच नव्हे, तर हिंदुस्थानातील परंपरेशी सर्वस्वी अपरिचित असलेल्या पाश्चात्त्य पंडितांनी अशा विषयांत निष्कर्ष काढण्याची जी अशास्त्रीय पद्धत चालू केली होती, तेवढी एकच काय ती पद्धत आहे, असेही आमच्याकडील नवे पंडित समजू लागले होते. या सर्व प्रकारांमुळेच विवेकानंदांसारख्या स्वतंत्र प्रज्ञेच्या धर्मोद्धारकास- ‘‘धर्माचे रहस्य ‘फायलॉलॉजिस्ट’ लोकांना सापडणे कठीण आहे!,’’ असे उद्गार काढावे लागले होते. अशा स्थितीत आपल्या प्राचीन ज्ञानाची संगती आधुनिक पद्धतीने तर लावायची; पण ‘आधुनिक पद्धती म्हणजे पाश्चात्त्य पद्धती’ हे गुलामी समीकरण मात्र पत्करायचे नाही, असे डॉ. केतकर यांनी ठरविले.
राष्ट्रीय दृष्टीचे महत्त्व
केतकरांच्या या भूमिकेलाच मी ज्ञानाच्या क्षेत्रातली राष्ट्रवादी भूमिका असे नाव देतो. ज्ञानाच्या क्षेत्रात ‘राष्ट्रवाद’ हा शब्द वापरला की कित्येकांना त्यात वस्तुनिष्ठ म्हणजे सायंटिफिक भूमिका सुटल्यासारखी वाटते. पण शास्त्रीय पद्धत म्हणत पाश्चात्त्यांना धर्मगुरू करण्यापेक्षा ही राष्ट्रीय भूमिका केतकरांच्या काळात तरी (आणि मला वाटते, आजच्या काळातदेखील) शास्त्रीय दृष्टीला अधिक जवळची होती. आणि म्हणून विज्ञानाचे महत्त्व केवढेही असले तरी स्वातंत्र्यकाळात निर्माण होणाऱ्या ज्ञानकोशातही विज्ञानाइतकेच राष्ट्रीय दृष्टीला महत्त्व देणे जरूर आहे. राष्ट्राच्या आजच्या गरजा जमेस धरून पूर्वपरंपरांची आणि जागतिक ज्ञानाची संगती लावणे आणि ते सर्व ज्ञान सुगम, चैतन्ययुक्त, जातिवंत मराठी भाषेत सर्वसामान्य वाचकांकरिता उपलब्ध करून देणे, हे आजच्या ज्ञानकोशाचे स्वरूप असावयास हवे.
यादृष्टीने केतकरांच्या ज्ञानकोशाचे स्वरूप फार चिंतनीय आहे. केतकरांच्या ज्ञानकोशाचे जगावेगळे वैशिष्टय़ म्हणजे अकारविल्हे, लेखांना सुरुवात होण्यापूर्वी त्या ज्ञानकोशात आढळणारे विद्वत्ताप्रचूर आणि स्फूर्तिदायक प्रस्तावनाखंड. या चार खंडांचे महत्त्व उरलेल्या सर्व खंडांच्या बेरजेइतके आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. केतकरांचा ज्ञानकोश आता जुना-‘आऊट ऑफ डेट’- झाला, असे म्हणणारे विद्वान, त्यांच्या प्रस्तावनाखंडाचे काय करू इच्छितात, हे मला माहीत नाही. त्यांच्या प्रस्तावनाखंडातीलही काही विधानांत बदल करावा लागेल, अशी ऐतिहासिक किंवा समाजशास्त्रीय माहिती नंतर उपलब्ध झाली नसेल असे नाही. त्यादृष्टीने त्या खंडांना पानोपानी टीपा जोडल्या तरी चालण्यासारखे आहे. (पण अशा टीपा गिबनच्या प्रख्यात इतिहासाला आणि कार्ल मार्क्सच्या ‘कॅपिटल’ ग्रंथालाही जोडाव्या लागतीलच.) परंतु ‘अप-टू-डेट’पणाच्या नावाखाली ज्ञानकोशाच्या पहिल्या चार खंडांना जुन्या दप्तरात दाखल करण्याचे जर कोणी समर्थन करीत असेल, तर ते योग्य होणार नाही.
आधुनिक म्हणजे पाश्चात्त्य नव्हे!
तीच स्थिती ज्ञानकोशातील विविध विषयांवरील निबंधांची आणि प्रबंधांची. हे सर्वच निबंध केतकरांनी स्वत: लिहिले आहेत असे नाही. हे सर्वच पूर्णपणे स्वतंत्र आहेत असेही नव्हे. तथापि भाषांतरित माहितीतही जी केतकरी मेख असे, तिचे महत्त्व कोणत्याच काळी कमी होणार नाही. मूळ लेखकासंबंधी केलेल्या एखाद्या विधानात, एखाद्या दुरुस्तीत व एकंदरच निवडीत त्यांची जी स्वतंत्र दृष्टी असे, तिचे महत्त्व फार मोठे आहे. पाश्चात्त्य शरणतेसंबंधी किंवा केतकरांच्या भाषेत म्हणजे ‘आंग्लशूद्रत्वा’संबंधी केतकर जी जागरूकता, नव्हे- जो कडक सोहळेपणा पाळीत, तो आजही पाळण्याची आवश्यकता आहे. त्याकाळचे पंडित पाश्चात्त्य फायलॉलॉजिस्टना शरण जात, तर आजचे पंडित अर्थशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि विज्ञानपूजक यांना शरण जातात, एवढाच काय तो फरक. परंतु आधुनिक बनणे म्हणजे पाश्चात्त्य बनणे व पाश्चात्त्य बनणे म्हणजे इंग्रजसदृश बनणे, हा आगरकरांच्या काळचा मंत्र आजच्या काळातही बदललेला नाही.
यादृष्टीने पाहता आज नवीन ‘विश्वकोश’ लिहिण्याची जेवढी आवश्यकता आहे, त्याहूनही केतकरांचा ज्ञानकोश पुनर्मुद्रित करण्याची आवश्यकता अधिक आहे. कारण केतकरांचा ज्ञानकोश म्हणजे केवळ १९२० च्या सुमारास उपलब्ध असलेले ज्ञान मराठीत उपलब्ध करून देणारा ग्रंथ नव्हे, तर एक विशिष्ट भारतीय आणि महाराष्ट्रीय दृष्टी देणारा ग्रंथ होय.
केतकरांच्यासारख्या असामान्य प्रतिभेच्या व अस्सल महाराष्ट्रीय बाण्याच्या पंडिताने अनेक विषयांसंबंधी जी स्वतंत्र दृष्टी आपल्या चिरस्मरणीय ज्ञानकोशात दिली आहे, ती दृष्टी जुनी किंवा ‘आऊट ऑफ डेट’ कशी होऊ शकेल, हे मला तरी समजत नाही. यादृष्टीने केतकरांच्या ज्ञानकोशात काही विषयांची भर घालणे, त्या ज्ञानकोशातील मूळच्या कित्येक लेखांत अवश्य त्या माहितीची भर घालणे व अशा प्रकारे तो ज्ञानकोश वाढविणे- हा एक मार्ग होय. तर उलट, केतकरांचा ज्ञानकोश आहे तसा पुनर्मुद्रित करणे व तो जमेस धरून पूरक म्हणून आणखी एक ज्ञानकोश काढणे, हा दुसरा मार्ग आहे. केतकरांचा संपूर्ण ज्ञानकोश पुनर्मुद्रित करण्याची कल्पना ज्यांना अवघड आणि अवास्तव वाटेल त्यांच्या दृष्टीने मी एक तडजोडीचीही कल्पना सुचवू शकेन. केतकरांचे प्रस्तावनाखंड संपूर्ण पुनर्मुद्रित करावेत व त्यांच्या ज्ञानकोशांतील निवडक लेखांचा एक खंड व उरलेल्या लेखांतील महत्त्वाच्या माहितीचा व मतांचा परामर्श घेणारा दुसरा खंड- असे दोन खंड काढावेत व अशा प्रकारे केतकरी ज्ञानकोशाची सप्तखंडात्मक नवी आवृत्ती काढावी.
माझ्या या तडजोडीच्या सूचनेमागची भूमिका उघड आहे. ज्या ग्रंथाचे महत्त्व नव्या विचारसंप्रदायात व नव्या अशा वादांत होते, त्या ग्रंथाला केवळ माहितीचा ग्रंथ समजणे म्हणजे बायबल, कुराण किंवा महाभारत या ग्रंथांतील वैज्ञानिक माहिती जुनी किंवा चुकीची ठरल्यामुळे नवी वैज्ञानिक कुराणे किंवा पुराणे लिहिणे होय!
माझ्या या मताचे प्रत्यंतर केवळ प्रस्तावनाखंड चाळल्यानेच येईल असे नव्हे, तर कोणत्याही खंडातील महत्त्वाचे लेख चाळल्याने येईल. यादृष्टीने ‘हिंदुस्थान आणि जग’ हा एक खंड जरी चाळला तरी केतकरांचा ज्ञानकोश म्हणजे केवळ माहितीची जंत्री नव्हे, तर भारतीय पुनरुत्थानाचा धर्मग्रंथ आहे, हे लक्षात आल्याखेरीज राहणार नाही. या पहिल्याच खंडातील ‘इतिकर्तव्यता’ या भागातील विवेचन आजच्याही काळात स्फूर्तिदायक आणि विचारप्रवर्तक ठरेल. नव्हे, आजच्या काळातील नेत्यांनी ज्ञानकोशातील या भागासारखे भाग वाचणे किती जरूर आहे, हे कोणाच्याही सहज लक्षात येईल. अशा तऱ्हेचे राजकीय मार्गदर्शनाचे भाग ज्ञानकोशाच्या फक्त प्रस्तावनाखंडातच आहेत असे नव्हे, तर जागोजागी आहेत. उदा. विज्ञानेतिहास या खंडाचा उपसंहार यादृष्टीने पहाण्यासारखा आहे. हा उपसंहार केतकरांनी ‘महाराष्ट्रीय महत्त्वाकांक्षा आणि तन्मूलक वैज्ञानिक व इतर कर्तव्ये’ या नावाच्या प्रकरणाने केला आहे. या नावावरूनच विज्ञानाचा विचार करतानाही केतकरांच्या डोळ्यांपुढे राष्ट्रीय व महाराष्ट्रीय महत्त्वाकांक्षा कशी उभी होती, हे दिसून येईल.
समारोपात सहज जाता जाता केतकरांनी प्रकट केलेले विचार इतके मार्मिक आणि स्फोटक आहेत, की ते विज्ञानेतिहास या खंडात सापडतील अशी कोणाला कल्पनाही होणार नाही. एके ठिकाणी केतकर म्हणतात- ‘आपल्या विकासासाठी आणि उन्नतीसाठी जी एक महत्त्वाची गोष्ट पाहिजे- ती धाडशी कारभाराची सवय ही होय. शासनसंस्था फाजील काटकसर करण्यासाठी नाहीत. महत्त्वाची कामे टाकून देण्याची आणि काटकसर करण्याची प्रवृत्ती जे सरकारे आणि लोकांचे जे प्रतिनिधी दाखवतील, त्यांनी आपले पद सोडून देऊन स्वयंपाक्याच्या जागेकरता अर्ज करावा हे योग्य होय.’
आजच्या ‘सेकण्ड फाइव्ह इयर्स प्लॅन’, ‘थर्ड फाइव्ह इयर्स प्लॅन’ यांसारख्या योजनांच्या काळात केतकरांचे हे शब्द भविष्यवाणीसारखे वाटल्यास नवल नाही!
पण माझा मुख्य प्रश्न वेगळाच आहे. केवळ अद्ययावत माहितीच्या नावाखाली आपण हे स्फूर्तिदायक माहितीने व विश्लेषणाने भरलेले एकवीस खंड बाजूला फेकून देणार आहोत की काय?
('लोकसत्ता' १९६२ मधील लेख साभार)