प्रस्तावनाखंड : विभाग दुसरा – वेदविद्या.

परिशिष्ट
 (अ)

वेदकालनिर्णयार्थ ज्योतिषाचा उपयोग.
वेदकालनिर्णयार्थ झालेल्या संशोधनाचा इत्यर्थ पूर्वीं (पृ. १८६-९३ पहा) दिलाच आहे. त्याच विषयासंबंधीं पूर्वीं केसरींत पत्रव्यवहार झाला होता तो व 'इंडियन अँटिक्वरि' या मासिकांत एक लेख आला होता त्याचा सारांश येथें देतों. 

- केसरींतील पत्रव्यवहार -
रा. रा. केसरीकर्ते यांस:-
सा. न. वि. वि. रा. रा. शंकर बाळकृष्ण दीक्षितकृत भारतीय ज्योति:शास्त्र हें पुस्तक वाचीत असतां त्यांत ६५ पानावर तैत्तिरीय ब्राह्मणांतील एक उतारा माझे पाहण्यांत आला, तो इतका महत्त्वाचा आहे कीं, त्याचेविषयीं जास्त चौकशी रा. दीक्षित यांनीं कशी केली नाहीं याचें आश्चर्य वाटतें. तें वाक्य असें आहे.

बृहस्पति: प्रथमं जायमान: ॥ तिष्यं नक्षत्रमभिसंबभूव तै. ब्रा. ३.१,१.
यांत ''बृहस्पति जो प्रथम उत्पन्न झाला तो पुष्य नक्षत्राजवळ झाला.'' याचा अर्थ गुरू व पुष्य नक्षत्रांची युति पहिल्यानें झाली असा घेतला पाहिजे. व त्यांतील 'अभि' या उपसर्गाचा अर्थ बृहस्पति तिष्य नक्षत्रासमोर पहिल्यानें आला; अर्थात् त्याच्या अंगावरून बृहस्पति गेला असें निर्विवाद ठरतें. या वेळेपूर्वींहि गुरु पुष्याजवळून जात असे पण त्यावेळीं त्याचा शर दक्षिण व पुष्याचा शर उत्तर यामुळें भेदयुति होत नसे. पण ती झालेली जेव्हां तैत्तिरीय ब्राह्मणकालच्या ऋषींनीं प्रथम पाहिली, त्या वेळेस त्यांस मोठें आश्चर्य वाटून वरील वाक्याची रचना झाली. यावरून दुसरी अशी एक गोष्ट सिद्ध होते कीं, त्या वेळचे व तत्पूर्वींचे आर्यलोक तेज:पुंज खस्थांकडे फार बारकाईनें पहात असत. आतां या वाक्यावरून तैत्तिरीय ब्राह्मणकाल कसा निघतो तें सांगतों.

गुरूचा परम शर १ अंश १९ कला आहे व पुष्याचा शर उत्तर ४ कला आहे. तेव्हां अगदीं पहिल्यानें युति होण्यास गुरुकक्षेचा ऊर्ध्व संपात तिष्य नक्षत्राच्या मागें (पश्चिमेस) ३ अंश या स्थानीं आला पाहिजे. वरील वाक्यरचनेपूर्वीं तो पात या बिंदूच्या पूर्वेस असल्यामुळें गुरुपुष्याची भेदयुति अशक्य असे. व पृथ्वीपासून गुरूपर्यंत युतिसमयीं जें अंतर त्यांतील फेरफारामुळें गुरूचा शर भूस्थ द्रष्टयास कमजास्त दिसला तरी दक्षिणेचा शर उत्तर शर कधींहि होणार नाहीं ही गोष्ट ज्योतिष्यांस माहित आहे. पुष्याच्या थेट दक्षिणेस पात आल्यावर गुरूच्या युतिकालीं उत्तर शर होण्यास सुरवात झाली. तरी पुष्याचा शर ४ कला असल्यामुळें गुरूचा शर फार तर एक कला कमजास्त होईल. म्हणून या युतीवरून गुरुकक्षापातांचें स्थान आम्हांस एक अंशाचे आंत ठरवितां येतें, व पातगति १ अंश होण्यास २५० वर्षें लागतात. म्हणून या युतीचा काल आम्हांस २००।२५० वर्षांच्या चुकीनें ठरवितां येतो. पण याच्या साहाय्यानें आम्हांस ६६०० वर्षें मागें जाता येतें त्यापुढें हें अंतर कांहींच नव्हे. 

 ग्रहसाधन कोष्टकें.
 पुष्याचा सायन भाग, पान  ३२४
 ( इ. स. १८५० )  १२६  ३७
 गुरूच्या पाताचा भोग पान     २५० 
 ( इ. स. १८५० )   ९८  ५४
 हल्लींचें अंतर ( इ. स. १८५० )  २७  ४३
 तैत्तिरीय ब्राह्मणकालीं  ३  ०
 ब्राह्मणकालापासून आजपर्यंत गुरुपातगति  २४  ४३

अर्वाचीन यूरोपीय ज्योतिष्यांचा मुकुटमणि जो फ्रेंच ज्योतिषी लीवेरीअर त्यानें गुरूच्या पाताची गति दर वर्षीं- १३.८६२ विकला ठरविली आहे. तेव्हां या मानानें गुरुपाताची २४ अंश ४३ कला पिछेहाट होण्यास २४ अं. ४३ क. ÷  - १३.८३२ वि. म्हणजे सुमारें - ६४२० वर्षें लागलीं. इतक्या अवधींत लीवेरीअरच्या मताप्रमाणें गुरुपाताच्या कालांतर संस्काराची नाक्षत्रगति ६ कला धन येते. ती मागच्या कालांसाठीं ऋण होऊन हा अवधि सुमारें २५ वर्षांनीं वाढतो. सारांश तैत्तिरीयब्राह्मणोक्त गुरुपुष्यभेदयोग हल्लींच्या कालापूर्वीं सुमारें ६५०० वर्षें झाला; अथवा विशेष बारकाईनें सांगावयाचें तर इ. स.  पूर्वीं (१८५०-६५००) ४६५० वर्षें झाला. म्हणून पूर्वोक्त तैत्तिरीय वाक्य ६००० वर्षांचें जुनें आहे हें सिद्ध होतें व ऋग्वेद तर याहून बरींच वर्षें प्राचीन असला पाहिजे.

नामदार बाळ गंगाधर टिळक यांनीं विपुवसंपाताच्या वैदिककालीन स्थितीवरून तो काल निदान ६००० वर्षांपूर्वींचा आहे, असें अनेक रीतीनें सिद्ध केलें आहे. पण या युतीनें एक अंशाच्या आंत संपातस्थान ठरवितां येतें. त्यांनां एक समग्र पुस्तक लिहून जी गोष्ट ठरवितां आली ती आयती एक्या त्रैराशिकानें एका ओळींतच सिद्ध होते. असो आमच्या वेदासारख्या ग्रंथांचा अति जुनाट काल ठरविण्यास पात हे आकाशरूपी तबकडीवर शतकें दाखविणाऱ्या कांट्यांप्रमाणें आहेत. ना. टिळकांनीं विषुवसंपात घेतला व मी गुरूचा संपात घेतला व या दोनहि स्वतंत्र मार्गांनीं गणित करून अखेर एकच गोष्ट ठरणें यासारखा दुसरा आनंद नाहीं. कळावें लोभ असावा हे विनंति.

बागलकोट ता. २२-३-९७ }     व्यंकटेश बापुजी केतकर.

ता. क. गुरूच्या परमशरांत कालांतरानें थोडासा फेरफार झाला तरी त्याचा परिणाम पाताच्याच आसपासच्या शरावर होत नाहीं असें म्हणण्यास हरकत नाहीं. म्हणून मीं वर सिद्ध केलेल्या प्रमेयास कोणत्याहि दिशेनें बाध येत नाहीं.      -  वें. बा. केतकर.

वे. शा. सं. रा. रा. व्यंकटेश बापुजी केतकर यांचें वरील पत्र पाहून आम्हांस फार समाधान होतें. त्यांनीं केलेलें गणित बरोबर आहे. मात्र या एकाच वाक्यावरून वैदिक ग्रंथांचा काल कायमचा ठरला असता असें त्यांनीं मानूं नये. ''बृहस्पति पहिल्यानें तिष्य नक्षत्राजवळ उत्पन्न झाला'' याचा अर्थ कांहीं गृहस्थ ''सदर नक्षत्राजवळ तो असतां त्याची ग्रहत्वानें ओळख झाली'' असाहि करितील. या अर्थापेक्षां रा. रा. केतकर यांनीं केलेला अर्थ अधिक ग्राह्य आहे हें आम्हांस मान्य आहे. तथापि शंकेखोर मंडळीचें दुसऱ्या पुराव्यावांचून पूर्ण समाधान व्हावयाचें नाहीं एवढें रा. रा. केतकर यांनीं लक्षांत ठेविलें पाहिजे. रा. रा. केतकर यांच्या लेखांत दुसरी एक छोटीशी दुरुस्ती करावयास पाहिजे होती ती ही कीं, त्यांनीं काढिलेला काळ तैत्तिरीय ब्राह्मणांचा नाहीं. तर तैत्तिरींय ब्राह्मणोक्त गुरुपुष्ययोगाचा आहे. तैत्तिरीय ब्राह्मणांत कृत्तिका ह्या नक्षत्रांचें मुख आहेत इत्यादि जीं वाक्यें आहेत त्यांवरून ब्राह्मणकालीं कृत्तिकांत संपात होतात हें उघड आहे. रा. रा. शंकर बाळकृष्ण दीक्षित यांनीं शतपथ ब्राह्मणांतील जें एक वाक्य प्रसिद्ध केलें आहे. त्यावरून कृत्तिका त्या कालीं पूर्वदिशा कधींहि सोडीत नसत, म्हणजे अर्थात् त्या वासंतिक संपातस्थानीं होत्या हें उघड होतें. या वाक्यांतील क्रियापद वर्तमानकालीं (एता ह प्राच्यै दिशो न चलंते) व गुरुपुष्ययोगाच्या वाक्यांत 'बभूव' असा भूतभूत काळ आहे. भूमभूत काळ जुनी गोष्ट सांगत असतां उपयोगांत आणितात. करितां कृत्तिकांच्या संबंधानें आणि गुरुपुष्ययोगासंबंधानें मिळून जीं दोन्ही वाक्यें तैत्तिरीय ब्राह्मणांत आढळतात त्यांची संगति  लावतां तैत्तिरीय ब्राह्मणकालीं कृत्तिका संपातस्थानीं होत्या (इ. स. पूर्वीं २५०० वर्षे) त्यावेळीं, त्याच्याहि पूर्वीं म्हणजे रा. रा. केतकर म्हणतात त्याप्रमाणें इ. स. पूर्वीं ४६०० वर्षें झालेली गुरुपुष्ययुति ब्राह्मणकारांस माहित होती असा अर्थ करावा लागतो. एवढा बारीक भेद लक्षांत ठेवला म्हणजे मग वर रा. रा. केतकर यांनीं केलेलें अनुमान कबूल करण्यास हरकत नाहीं. रा. रा. केतकर यांनीं हें गणित करून वेदाच्या प्राचीनत्वाबद्दल जीं कांहीं प्रमाणें उपलब्ध आहेत त्यांतच एका चांगल्या प्रमाणाची भर घातली याबद्दल आम्ही त्यांचें अभिनंदन करितों.- के. क.- ता. ३० मार्च १८९७.

- इंडियन अँटिक्वरीमधील लेख -  

शतपथ ब्राह्मणांत एके ठिकाणीं (११.१,२ पहा.) असा उल्लेख आला आहे कीं, सत्तावीस नक्षत्रांपैकीं फक्त कृत्तिका नक्षत्रच नेहमीं पूर्वबिंदूवर उगवतें. यावरून हें उघड होतें कीं, शतपथ ब्राह्मणाचा हा भाग लिहिला गेला तेव्हां संपातबिंदु कृत्तिकानक्षत्रांत असला पाहिजे. संपातबिंदु दर वर्षीं क्रांतिवृत्तांत ५० सेकंद मागें सरकतो असें जरी गृहीत धरलें तरी शतपथ ब्राह्मणाचा काळ ख्रिस्ती शकापूर्वीं सुमारें ३००० वर्षें निघतो !