प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २६ वें.
यूरोपीय इतिहास व जागतिक इतिहास.

शांतता परिषद.- १८७०-७१ मधील युद्धानंतर यूरोपच्या इतिहासांत एक विशेष गोष्ट दिसून येते. ती म्हणजे मोठाल्या राष्ट्रांत चालू असलेली युद्धसामुग्रीची व शस्त्रास्त्रांची वाढ व करांचा वाढता बोजा. या गोष्टींचा रशियाचा तरूण बादशहा दुसरा निकोलस याच्या मनावर इतका परिणाम झाला कीं, ही अनर्थावह वाढ थांबविण्याकरितां राष्ट्रांनीं एकत्र जमून करारमदार करावे असें त्यानें सुचविलें. त्याप्रमाणें १८ मे १८९९ ते २९ जुलै पर्यंत हेग येथें बैठकीहि झाल्या पण उद्दिष्ट हेतु साधला नाहीं.

हेग येथे भरलेली ही पहिली परिषद व १९०७ मध्यें झालेली दुसरी परिषद यांनीं जगाला युद्धापासून होणारे अनर्थ टाळण्याची हमी दिली नाहीं तरी अंतर्राष्ट्रीय भानगडीच्या प्रश्नांत शांततेच्या मार्गानें निकाल लावण्यास तयार असें लोकमत मात्र बरेंच उत्पन्न केलें. १९ व्या शतकाप्रमाणेंच २० व्या शतकांत यूरोपीय राष्ट्रांतील चुरस कायम असल्यामुळें त्यांच्यात ऐक्यभाव नांदणें अशक्य होतें. १९०१ मध्यें हेंग येथें स्थापन झालेल्या न्याय कोर्टानें व इंग्लंडचा राजा सातवा एडवर्ड या शांततावादी राजाच्या प्रयत्नांनी यूरोपमधील राष्ट्रांतले बरेच प्रश्न आपसांतील तडजोडीनें मिटले हें खरें आहे तथापि कित्येक पिढीजात वैरी असलेल्या राष्ट्राराष्ट्रांतील भानगडी 'बळी तो कान पिळी' या न्यायानें शस्त्रास्त्रांच्या जोरावरच अखेर मिटणार हें उघड दिसत होतें. क्रीट, आर्मेनिया व आफ्रिका येथील भांडणासंबंधाचा उल्लेख वर आलेलाच आहे. १९०५ आक्टोबरमध्यें स्वीडन व नार्वे यांचें भांडण शांततेनें मिटून नार्वेचें स्वतंत्र अस्तित्व मान्य करण्यांत आलें. ग्रेटब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, डेन्मार्क, स्वीडन व हॉलंड यांच्यामध्यें उत्तरसमुद्रावरील हक्कासंबंधाचा प्रश्नहि शांततेनेंच मिटला. त्याचप्रमाणें फ्रान्स व स्पेन आणि स्पेन व ग्रेटब्रिटन यांमधील भूमध्यसमुद्रावरील हक्कासंबंधाच्या तडजोडी शांततेनें पार पडल्या. इराणावरील वर्चस्व व हिंदी साम्राज्याची उत्तरेकडील सरहद्द यांविषयीं रशिया व ग्रेटब्रिटन यांचे करार १९०७ मध्यें शांततेनेंच झाले व त्यामुळें रूसो-जपानी युद्धानें कमी झालेलें रशियाचें वजन थोडेंफार वाढण्यास मदत झाली. १९०८ जूनमध्यें रेव्हल येथे रशियाच्या व इंग्लंडच्या बादशहांनीं मोठ्या सौजन्यानें एकमेकांच्या भेटी घेतल्या.