प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १२ वें.
अशोक ते अराजक-शकयवनांचा धुमाकूळ.
सिथियन लोक - सिथियन हें नांव बरेंच अस्पष्टार्थानें वापरण्यांत येतें. त्यामध्यें मध्य आशियांतील आणि उत्तर यूरोपांतील ज्या अनेक रानटी जातींनीं शेजारच्या सुधारलेल्या राष्ट्रांवर स्वा-या करून त्यांनां अनेक वेळां त्रास दिला अशा अनेक जातींचा समोवश होतो. आशियाच्या इतिहासांत पहिल्या दरायसनें सिथिया देशावर जी सुप्रसिद्ध स्वारी केली तिची हकीकत हिरोडोटसनें दिली आहे. पुढें अलेक्झांडर दि ग्रेट यानें आशियाखंड जिंकण्याचा उपक्रम केला, तेव्हां त्याला पहिला अडथळा सिथियन लोकांनीच केला. प्राचीन ग्रीक सत्तेच्या वेळींहि सिथियन लोकांनीं खुद्द अथेन्स शहर एकदां काबीज केलें होतें. तात्पर्य प्राचीन पौरस्त्य देशांतील अनेक सुधारलेल्या राष्ट्रांनां वारंवार त्रास देणारे म्हणून सिथियन लोक इतिहासांत प्रसिद्ध आहेत.
त्यां चें प रि भ्र म ण.- सिथियन लोकांच्या टोळ्या आशियांत घुसल्या तेव्हां त्या वेळीं बलाढ्य असलेल्या असुर राष्ट्राच्या वाटेस न जातां त्यांच्यापैकीं कांही टोळ्या पूर्व बाजूला व कांहीं पश्चिम बाजूला गेल्या. होमरनें वर्णिलेला काल आणि इराणी साम्राज्याचा काल यांच्या दरम्यानच्या कालांतील आशियामायनरच्या परिस्थितीवर सिथियन लोकांचा बराच परिणाम झालेला आहे. होमरनंतरच्या काळांत ग्रीस देशावर डोरिअन लोकांच्या आगमनानें जो परिणाम झाला, त्याचें आशियामायनरवर झालेल्या सिथियन लोकांच्या परिणामाशीं साम्य आहे. होमरच्या काव्यांत सिथियन लोकांचा नामनिर्देश नाही, पण हेसिअडच्या काव्यांत तो आढळतो. सिथियन लोकांच्या चालीरीती वगैरे गोष्टीसंबंधानें विशेष महत्त्वाची माहिती हिरोडोटसच्या ग्रंथांत मिळते. हिरोडोटस व हिपॉक्राटीझ यांच्या ग्रंथांत सिथियन लोक पूर्ण रानटी होते असें वर्णन आढळते, पण नंतरच्या इतिहासकारांनीं सिथियन हे बरेच सुधारलेले लोक होते असें म्हटलें आहे. या विरोधाचा खुलासा असा आहे कीं, सिथियन लोकांपैकीं कांहीं टोळ्या केवळ भटकेगिरी करणा-या होत्या, तर उलटपक्षी कांहीं स्थायिक राहून शेतकी व इतर अनेक उद्योगधंदे करणा-या होत्या. अर्थातच या दोन प्रकारच्या सिथियन लोकांच्या चालीरीती आणि संस्कृति यांच्यामध्यें बरेच अंतर होतें.
चा ली री ती.- सिथियन लोक उत्तर दान्यूब नदीपासून उत्तर टॅनास(डॉन) नदीपर्यत पसरलेले होते असें जें हिरोडोटस म्हणतो तें बरोबर आहे. तसेंच हे लोक कृषिकर्म वगैरं कांहीं एक न करतां लुटालूट करीत हिंडणारे, केवळ जनावरांचें मांस खाऊन राहणारे व विशेषतः घोड्याचें दूध व दहीं खाणारे होते हेंहि हिरोडोटसचें वर्णन सिथियन लोकांच्या कांहीं टोळ्यांनां बरोबर लागू होतें. याप्रमाणें या भटक्या सिथियन लोकांच्या ब-याच चालीरीती हिरोडोटसनें दिल्या आहेत. हे लोक प्रत्यक्ष तलवारीलाच देवता मानून तिची उपासना करीत असत, व तिला मेंढ्या, घोडे आणि लढाईतले कैदी बळी म्हणून अर्पण करीत असत. ठार मारलेल्या शत्रूचीं कातडीं व डोक्याच्या कवट्या ते भूषणाप्रमाणें अंगावर वापरीत. लढाईंत पकडलेल्या लोकांनां गुलाम करून ठेवतांना ते त्यांचे डोळे काढीत असत. सारांश या सिथियनांच्या अनेक चालीरीती घाणेरड्या व क्रूरपणाच्या असत. हे लोक दिसण्यांस भयंकर होते. त्यांच्या एकवटलेल्या सामर्थ्यापुढें कोणत्याहि तत्कालीन सुधारलेल्या राष्ट्राचा निभाव लागणें शक्य नव्हतें. युक्झाइनच्या आसपासच्या लोकांतील मूर्खपणाच्या मानानें सिथियन लोकांची बुद्धिमत्ता चांगली होती असें हिरोडोटस म्हणतो.
ध र्म वि धी.- हे लोक जुपिटर, त्याची बायको टेलस, आपोलो, व्हीनस, हक्यूलिस आणि मार्स या सर्व देवतांची उपासना करीत असत. पण त्यांत मार्स हा प्रमुख देवता होती. या देवतांनां ते जनावरांचा बळी देत असत, व बळी दिलेल्या जनावराचें कातडें बळी देणारा अंगावर वापरीत असे. ते अनेक जातींच्या जनावरांचा बळी देण्यासाठीं उपयोग करीत, पण त्यांतल्या त्यांत घोड्यांला विशेष महत्त्व असे. शिवाय कैद केलेल्या लोकांपैकींहि शेंकडा एक लोकांनां ते बळी देत असत. माणसाचा बळी देतांना प्रथम त्याचा गळा कापीत आणि नंतर उजवा हात खांद्यापासून तोडून उंच हवेंत फेकून देत ते डुकराचा मात्र कधीच बळी देत नसत; इतकेंच नव्हे तर ते या प्राण्याला आपल्या देशांतहि राहूं देत नसत.
यु द्ध वि ष य क रि वा ज.- युद्धामध्यें प्रत्येक सिथियन सैनिक शत्रूकडील स्वतःमारलेल्या इसमांपैकीं पहिल्याचें रक्त पीत असे. लढाईंत मारलेल्या शत्रूकडील इसमांचीं मुंडकीं तोडून तीं आपल्या राजाला नजर करण्याची त्यांच्यामध्यें चाल होती. तसेंच ते लढाईंत सापडलेल्या माणसांच्या अंगाची कातडी सोलून काढून ती चांगली गौरवर्ण असल्यास आपल्या घोड्यावर घालण्यास तिचा उपयोग करीत असत.
या लोकांच्या राज्यांत राजानें कोणास करणाची शिक्षा दिल्यास त्या गुन्हेगाराबरोबर त्याची सर्व पुरुषसंततीहि मारून टाकण्याची चाल होती. असो.
सोक.- आतां चिनी ग्रंथांतील माहितीकडे वळूं. चिनी ग्रंथांत यांनां सोक हें नांव आहे. चिनी ग्रंथांतील माहिती एकत्र करून पाश्चात्य पंडितांनी तयार केलेलें कथासूत्र इंडियन अँटिक्वरीच्या एका अंकांत आलें आहे. त्या कथासूत्राचा सारांश येणेंप्रमाणें:-
मू ल स्था ना पा सू न प रि भ्र म ण.- हे लोक पूर्वीं आरल समुद्राजवळच्या, सिथियन, गेटीइ लोकांप्रमाणें आर्य लोकांच्या मूलस्थानापासून पूर्वेकडे व दक्षिणेकडे आले असावे. चिनी बखेरीवरून असें दिसतें कीं, ख्रि. पू. १७४ सालीं हिउं-ग्नु लोकांनीं युएचि लोकांचा देश काबीज केल्यामुळें युएचि लोकांनीं सइ लोकांचा देश घेऊन त्यांस तेथून हांकून दिलें.
हिउं-ग्नु लोकांनीं त-युएचि लोकांस जिंकले तेव्हां त्यांनी त-हिआ(बॅक्ट्रिया) देश सइ-वंग (सइ लोकांचे राजे) यांजपासून घेऊन त्यांस दक्षिणेकडे जावयास लाविलें. यांनीं दक्षिणेकडे जाऊन किपिन (काश्मीर प्रांत ?) घेतला (हानबखरी). सोक, युएचि व हिउं-ग्नु हे एकामागून एक त्याच प्रदेशांतून आल्यामुळें त्यांचे मिश्रण झालें असावें. पूर्वींच्या चिनी भाषेमध्यें शोध वगैरे करणा-या सर्व ग्रंथकारांनीं या सोक लोकांस निरनिराळीं नांवें देऊन ते ग्रीक आणि रोमन लोकांनीं झकइ व सकइ या नांवानीं वर्णन केलेले लोक व हिंदू बखरींमधील शक लोक हे एकच होते असें म्हटलें आहे. चिनी भाषानभिज्ञ डॉ. लॅसेन व सेन्ट मार्टिन यांनीं मात्र या नांवांतील फरकावरुन हे लोक भिन्न असावेत असें म्हटलें आहे. या दोघांनींहि या सोक लोकांचें मूलस्थान होआंग-हो नदीजवळ असावें अशी कल्पना करून, त्यांचें येथपर्यंत येणें असंभवनीय ठरविलें व त्यांचा कार्य जातीच्या शक लोकांशीं कांहीं संबंध नाहीं असें उघडच म्हटलें.
पण हान लोकांच्या बखरींमध्यें असें स्पष्ट म्हटलें आहे कीं सोक लोक फार दूरवर पसरून त्यांनीं निरनिराळीं राज्यें स्थापन केली. शु-ले (काश्गार) पासून हिउ-सुन व कुं-तु यांच्या ताब्यांतील सर्व प्रदेश पूर्वींच्या सोक लोकांचे आहेत.
पुढें हिउ-सुन लोकांचें वर्णन असून त्याच्या शेवटीं हे पूर्वींचे शक लोक होत असें म्हटलें आहे. नंतर कुं-तु लोकांचें वर्णन असून याच्याहि शेवटीं वरीलप्रमाणेंच हे पूर्वींचे शक लोक होत असें सांगितलें आहे.
या हिड-सुन नांवाबद्दलहि लॅसेन व रिठ्ठन यांचा बराच गैरसमज झाला आहे. ते हें नांव व यूसुन हीं एकच असें समजतात. त्याप्रमाणेंच कुं-तु या नांवाचाहि घोटाळा झाला आहे. पिएन-यि-टिएन हा स्वरसाद्दश्यावरून हें नांव व शेन-तु अथवा यिं-तु हें नांवहि अभिन्न मानून त्यांच्या प्रमाणेंच याचा अर्थ हिंदू असा करतो. याप्रमाणेंच येन-शि-कु हा सुद्धां कुं-तु हा शब्द व शन्-तु अथवा त्येंचु हे हिंदु या अर्थाचे शब्द एकच समजून यांचा हिंदु असाच अर्थ करतो.
यांचा धंदावयांनीं व्यापलेल्या देशावरील यांची सत्ता.- पण हान बखरीमध्यें म्हटलें आहे कीं, हिउ-सुन व कुन्तु या दोन शक जाती असून ते आपले कळप काश्गारच्या वायव्येस व त्येन-शान पर्वताच्या नैर्ॠत्त्येकडील उतरणीवर व नरिन नदीच्या उपनद्यांवर चारीत असत. यांपैकीं हिउ-सुन हे फरघनच्या सरहद्दीजवळ असत व कुं-तु हे त्यांच्या पूर्व बाजूस असून इस्सि-- कुलपर्यंत पसरलेल्या वु-सुन लोकांच्या प्रदेशास लागून उत्तरेकडे पसरलेले होते.
त-अंगशूमध्यें ६५८ या वर्षीं चीनच्या बादशहानें कोसइ येथून हिउ-सुन येथें राजधानी नेण्याचा हुकूम दिल्याचा उल्लेख आहे. यावरून ७ व्या शतकांत हिउ-सुन घराणें फरघनच्या कांहीं भागावर तरी राज्य करीत असावें असे वाटतें.
परंतु वेइ घराण्याच्या इतिहासावरून असें दिसतें कीं, तिस-या शतकांत कुं-तु व हिउ-सुन हीं घराणीं काश्गार प्रांतांत होतीं. त्याप्रमाणेंच तु-येनचा ज्ञानकोश झाला त्यावेळीं सो-चे कुं-तु व हिउ-सुन हे काश्गारच्या राज्याचे भाग होते असा त्यांत उल्लेख आहे.
यावरून शक लोक हे त्या वेळीं काश्गारच्या पूर्वेकडे किंवा दक्षिणेकडे फारसे पसरले नव्हते असें दिसतें.
पुन्हां प रि भ्र म ण.- चंग-क्येन याच्या चरित्रांत असें आढळतें कीं हि उं-ग्नु लोकांनीं युएचि लोकांस जिंकल्यावर त्यांनीं (युएचींनीं) पश्चिमेकडील लोक लोकांवर स्वारी केली. तेव्हां शक लोकांनीं दक्षिणेकडेजाऊन नवी वसाहत केली. कुन्-मो यानें आपल्या बापाबद्दल सूड उगविण्याकरितां शान-यू याची परवानगी मागितली व युए-चि लोकांस जिंकून त्यांस पश्चिमेकडे पिटाळून दिलें. मोडुक राजा ख्रि. पू. १७४ या वर्षीं मेला व यु-एचि लोक पश्चिमेकडे ख्रि .पू. १६० या वर्षी गेले त्या अर्थी शक लोक हे दक्षिणेकडे ख्रि .पू. १७४ पासून १६० या कालच्या दरम्यान - म्हणजे इंडो-सिथियन लोक येण्याच्या पुष्कळच वर्षें अगोदर- आले.
तसेंच डॉ.लॅसेन यांच्या म्हणण्याप्रमाणें स्से (सोक) हे लोक सॉग्डिएनाकडे- हा देश पश्चिमेस आहे-गेल्याचा कोठेंच उल्लेख नसून हे लोक दक्षिणेकडे किपिन प्रांतात गेले असें म्हटलेले आहे.
हा किपिन देश त्या वेळीं अॅराकोशिआचा ईशान्य भाग नसून तो कपिल-कपिर-टॉलेमीचें कॅस्पेरिया व हल्लीचें काश्मीर असावें असें ब्रिटानिकाकार म्हणतात.
प रि भ्र म ण मा र्ग.— यांच्या मार्गाचें वर्णन हान बखरीमध्यें असें आहे : "ते दक्षिणेकडे जाऊन हिएन्तु (ही जागा सिंधु नदीवर असावी) टाकून पुढें गेले. हे स्थळ काश्मीरच्या सरहद्दीवर असून तेथें एका कड्यावरून एक फुट रुंदीची पाऊल वाट जाते. येथें प्रवासी एकमेकांस धरून फार काळजीपूर्वक चालतात. तेथें एकमेकांस जोडलेले दो-यांचे पूल असतात. व ते सुमारे ७ मैल लांब आहेत, नंतर हिएन्तु (लोंबती वाट) येते."
या हिएन्तु नामक ठिकाणींच बौद्ध भिक्षु फा-हिआन यानें उदयान येथें येण्यापूर्वीं सिंधु नदी ओलांडली.
यावरुन हिएन्तु काश्गारपासून नैॠत्येच्याहि थोडेंसें दक्षिणदिशेच्या बाजूस असून हल्लींच्या ददिंस्थानच्या सरहद्दीजवळ असलेल्या स्कार्डोच्या पश्चिमेस असावें असें दिसतें.
किपिन या प्रांताच्या नैॠत्येस वु-इ-शान-ली अथवा अॅराकोशिआ हा प्रांत, अग्नेयीस त-युएचि यांचें राज्य बॅकट्रिया हा प्रांत, ईशान्येस नऊ दिवसांच्या वाटेवर नान्तौ व पूर्वेस ७५० मैलांवर बु-चा याप्रमाणें त्याच्या मर्यादा होत्या.
कुओ-यी कुंग म्हणतो कीं, हिएन्तु याच्या पूर्वेस वुचा आहे. यावरून हि-एन्तु हें सरहद्दीवर धरुन याची राजधानी पेशावर जवळ असावी असें अनुमान निघतें.
याप्रमाणेंच शक लोकांनीं शकस्थान हल्लीचें सेजिस्थानयास आपलें नांव दिलें आहे.
शकांशीं सदृश किंवा संगत अशी एखादी राष्ट्रजाति असेल तर ती युएचि लोकांची होय. तिचा स्थूल इतिहास येणेंप्रमाणें देतां येईल.