प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १२ वें.
अशोक ते अराजक-शकयवनांचा धुमाकूळ.

युएचि उर्फ कुशान - हें आशियांतील एक टोळीचें नांव आहे. या लोकांनीं बॅक्ट्रिया व हिंदुस्थान या देशांवर राज्य केलें. यांनां इंडो-सिथियन असेंहि म्हणतात व त्यांच्या एका पोटजातीवरून त्यांस कुशान हें नांवहि मिळालें आहे. हे चीन देशांतील कानशू प्रांतांत रहाणारे भटकणारे लोक असावेत, व त्यांच्याच वंशांपैकीं हिउंग्नु नांवाच्या दुसर्‍या एका टोळीनें त्यास तेथून हुसकून दिलें असावें. यांनीं इली नदीवर रहाणार्‍या बुसन नांवाच्या दुसर्‍या एका टोळींस जिंकून त्या प्रदेशांत कांहीं दिवस वसाहत केली असावी. हा काळ ख्रि. पू. १७५ पासून १४० पर्यंतचा असावा. नंतर त्यांनीं शक नांवाच्या एका टोळीस जिंकून त्यांस इराण-हिंदुस्थानच्या दिशेला हुसकून लाविलें. हे युएचि लोक सुमारें वीस वर्षे चु आणि सरदारिया या दोन नद्यांमधील प्रदेशांत राहिले असावेत. येथेंहि पुन्हा त्यांचे जुने शत्रु जे हिउंग्नु लोक त्यांनीं त्यांचा पराभव केला. या वंळा हिउंग्नु लोकांबरोबर वुसन लोकांचा पराभूत नाईक होता. नंतर युएचि लोक बॅक्ट्रिया प्रांतांत राहिले. यानंतर १०० वर्षेपर्यंत त्यांच्याबद्दल फारच थोडी माहिती मिळते. या कालांत त्यांच्यांत जास्त ऐक्य उत्पन्न झालें. पूर्वीं ते पांच निरनिराळ्या टोळ्या करून होते; परंतु आतां त्यांच्यांतील मुख्य जी कुशान (क्वेश्वांग) तिचेंच नांव त्यांनीं धारण केलें. पूर्वींचें आपलें भटकणें सोडून देऊन त्यांनीं स्वतःची थोडीशी सुधारणा करुन घेतली. त्या वेळीं बॅक्ट्रिया प्रांतांत एक हजार शहरें होतीं असें म्हणतात. ही जरी अतिशयोक्ति असती, तरी एवढें मात्र खरें कीं, या प्रांतापर्यंत इराणी व हेलेनी संस्कृती येऊन पोंचल्या होत्या. कारण, त्या देशाचे राजे युक्राडिटीझ व डिमिट्रिअस यांनीं हिंदुस्थानावर स्वार्‍या केल्या होत्या. तेव्हां युएचि लोकांस त्यांच्या संस्कृतीचा थोडासा आस्वाद मिळतांच, ते स्वतः शूर असल्यामुळें त्यांनींहि त्यांचाच कित्ता गिरविला असल्यास त्यांत आश्चर्य नाहीं.

हिं दु स्था नां ती ल अं म ल.- या कुशान लोकांच्या स्वारीचा व त्यानंतरचा त्यांचा हिंदुस्थानांतील खात्रीलायक इतिहास सांपडत नाहीं. हिंदुस्थानांतील ग्रंथांतून या काळाबद्दल फारच थोडी माहितीं मिळते, आणि जी कांहीं थोडीशी माहिती मिळते ती बहुतेक चिनी बखरींवरून, शिलालेखांवरून व विशेषतः नाण्यांवरुन मिळते. यावरून त्यांच्या राजांचीं नांवें आपणांस कळतात. या पुराव्यांवरून असेहि अनुमान काढण्यांत आलें आहे कीं, कोझुलो कडफिसेस, कुजुलकस किवां किउत्सु किओ (इ. स. ४८-७८) या नांवाच्या एका राजानें त्या पांच टोळ्यांचें ऐक्य करुन काबूल नदीकाठचा प्रदेश काबजी केला व तेथील ग्रीक सत्तेचा नायनाट केला. बहुतकरून यानंतर कांहीं काळाने ओइमो कडफिसेस, हिमकपिस किंवा येन-काओ-त्सिन-ताइ नांवाचा राजा येऊन त्यानें उत्तर हिंदुस्थान पादाक्रांत केलें. त्यानंतर कनिष्क आला (इ. स. १२०-१६२). हा बौद्ध लोकांचा आश्रयदाता म्हणून प्रसिद्ध आहे. यानें बौद्धांची तिसरी संगीति भरविली. त्यानें काश्गार, मार्कंद आणि खोतान हे देश जिंकले असें म्हणतात. त्याच्या मागून हुविष्क व वासुदेव हे गादीवर बसले. वासुदेव हा इ. स. २२० च्या सुमारास निवर्तला असावा. वासुदेवानंतर कुशान लोकांचें सामर्थ्य हळुहळू कमी होत जाऊन शेवटीं त्यांस सिंधु नदीच्या प्रदेशांत व ईशान्य अफगाणिस्थानाकडे जावें लागलें. चीनमधील माहितीप्रमाणें कुशान लोकांचें राज्य कि-तो-लो (किदार) नांवाच्या वंशानें घेतलें. हा कि-तो-लो वंशहि मूळ युएचि जातीचाच होता, पण जेव्हां कुशान लोक हिंदुस्थानांत आले तेव्हां हे कि-तो-लो लोक बॅक्ट्रियामध्येंच राहिले होते. पुढें ज्या वेळीं ज्वेन लोक चीनच्या सरहद्दीपासून पश्चिमेकडे पुढें पुढें सरकुं लागले त्यावेळीं हे कि-तो-लो लोक हिंदूकुश पर्वताच्या दक्षिणेकडे आले. या वंशाचे राजे गांधार (पूर्व अफगाणिस्थान) देशांत लघु कुशान नांवाच्या लहानशा राज्यावर राज्य करीत होते. त्यांचें हें राज्य पुढें इ. स. ४३० च्या सुमारास हूण लोकांच्या स्वा-यांमुळें बुडालें.

एके काळीं कांहीं पंडितांचें असेंहि मत होतें कीं कुशान राजांपैकीं कनिष्क हा ख्रि. पू. ५८ च्या सुमारास होऊन गेला असावा, आणि हुविष्काच्या पूर्वीं किंवा नंतर दुसरा एक वसुष्क या नांवाचा राजा झाला असला पाहिजे. परंतु व्हिन्सेंट स्मिथ म्हणतो कीं, आतां या कुशान राजांची संख्या व अनुक्रम आपणांस नक्की कळला असून त्यांच्या कालासंबंधानें संशोधकांस जो कांहीं प्रश्न सोडवावयाचा राहिला आहे तो एवढाच कीं, त्यांच्यापैकीं कनिष्क हा इ. स. ७८ मध्यें राज्यारूढ झाला किंवा त्यानंतर ४० वर्षांनीं, इ. स. १२० च्या सुमारास झाला. या कुशानांचा सविस्तर राजकीय इतिहास पुढे दिला जावयाचा असल्यामुळें येथें त्यांच्या संबंधीं अधिक कांहीं न लिहितां युएचींच्या संस्कृतीकडे वळूं.

त्यां ची सं स्कृ ति.— युएचि लोकांच्या स्वार्‍या ख्रि. शकाच्या फारशा पूर्वीं किंवा नंतर झाल्या नसाव्या. या स्वा-यांचा हिंदु संस्कृतीवर कांहीं तरी परिणाम झाला असला पाहिजे. त्यांच्या नाण्यांत पुष्कळ राष्ट्रांच्या नाण्यांची छटा मोठ्या चमत्कारिक रीतीनें मिश्रित झालेली दिसते. त्या नाण्यांचा आकार व सर्वसाधारण घडण रोमन नाण्यांसारखी आहे. त्यांवरील लेख कांहीं ठिकाणी ग्रीक भाषेंत व लिपींत आहेत, तर कांहीं ठिकाणीं ते पर्शियन भाषेंत असून ग्रीक किंवा खरोष्ठी लिपींत लिहिलेले आहेत. पाठीमागील बाजूस बहुतेक देवतेचें चित्र असतें, व ते बहुतेक ग्रीक (हेराक्लीझ, हीलिऑस, सिलीनि), अथवा झरथुष्ट्र (मिथ्र, वात किंवा वैरेथ्रझ, अथवा हिंदु (बहुतकरून शिव किंवा योद्धा) देवतेचें असतें. सरपो या नांवाची जी त्यांवर आकृति असते ती बहुतकरून इजिप्शियन सिरेपिस असावी, व दुसर्‍या कांहीं आकृती बाबिलोनी देवतांच्या असाव्यात. दर्शनी भागावर राजाचें चित्र असे. त्या चित्रांतील राजाचा पोशाख, निदान फार पूर्वकालच्या नाण्यांत तरी, एक लांब अंगरखा, गुडघ्यापर्यंत जोडे आणि एक उंच टोपी असा असे. हा पोशाख उत्तरेकडील भटकणारे लोक वापरील असत. कनिष्काची राजधानी पुरुषपुर (हल्लींचें पेशावर) याच्या आसपास जे कांहीं शिलाकामाचे नमुने सांपडतात, त्यांवरून गांधार देशांतील शिल्पशास्त्र हें ग्रीक व रोमन पद्धतींवरूनच घेऊन त्यांत हिंदू देवतांस साजेल इतका फेरफार केला होता असें दिसतें. हिंदुस्थानांतील बौद्ध लोकांनीं व्यापलेल्या आशियाखंडांतील भागांतल्या शिल्पशास्त्रावर गांधार देशांतील शिल्पशास्त्राचा व कलेचा जो परिणाम झाला आहे त्याचें महत्त्व आतां सर्वांस कळून चुकलें आहे.

कुशान राजांच्या मंदिरांमधून असलेल्या ग्रीक, पर्शियन व हिंदू देवतांच्या मिश्रणाचा परिणाम बौद्ध व हिंदू या दोहोंवरहि झाला असला पाहिजे. तसा तो पूर्वीच्या ब्राह्मण संस्कृतीवर झालेला नव्हता. कनिष्कादि राजे जरी बौद्धपंथानुयायी होते तरी ते धर्मवेडे नव्हते. कनिष्कानें काश्गार व खोतान हे प्रांत जिंकल्यामुळें चीनमध्यें बौद्ध संप्रदायाचा प्रवेश होणें सुलभ झालें असलें पाहिजे. ब्रिटानिकाकारांच्या मतें या युएचि लोकांनीं उत्तर हिंदुस्थानांतील लोकसंख्येंत चांगलीच भर टाकिली असली पाहिजे.

युएचि लोक हे तुर्क किंवा हूण लोकांप्रमाणें तुराणी राष्ट्रजातीपैकीं होते कीं काय हें नक्की सांगतां येत नाहीं. त्यांच्या मूळ भाषेबद्दल कांहींच माहिती मिळत नाहीं. त्यांच्या नाण्यावरचे जे लेख ग्रीक किंवा हिंदी भाषेंत लिहिलेले नसतात ते बहुतेक पर्शियन भाषेंत व ग्रीक लिपींत लिहिलेले असतात. तेव्हां त्यांच्या नाण्यांवरून त्यांच्या भाषेचा बोध होऊं शकत नाहीं.

या नाण्यांवर जें मनुष्याचें चित्र असतें त्याचें नाक मोठें व पुढें आलेलें, डोळे मोठे, साधारण बरीचशी दाढी, व थोडेसे जाड व पुढें आलेले ओठ असतात. यावरून युएचि हे मोंगल किंवा उग्रो-फिनिक असण्यापेक्षां तुर्क जातीचे असण्याचा संभव बराच दिसतो. पण या अनुमानांवर पुष्कळ वेळां भरंवसा ठेवतां येत नाहीं. त्यांचें शौर्य पाहिलें व त्यांनीं पर्शियन व हिंदु संस्कृति किती लवकर उचललीं हें पाहिलें म्हणजे हे तुर्क असावे असेंच वाटतें; व त्यांनां हिंदु ग्रंथकारांनीं दिलेल्या तुरुष्क अथवा तुरुख या नांवावरून ते तुर्क असावे असें कांहींनीं अनुमान काढलेंहि आहे. परंतु तुर्कांचें राष्ट्र व नांव ही मुळीं ख्रिस्ती शकाच्या ५ व्या शतकांतच जन्मास आलीं असल्यामुळें युएचि लोकांनां तुर्क म्हणणें इतिहासाशीं विसंगत होईल. तथापि तुर्क व युएचि हे मूळ एकाच जातीचे असून त्यांची निरनिराळ्या दिशांनीं सुधारणा होत गेली असणें संभवनीय आहे. एक अलवेरुणी नांवाचा मुसुलमान ग्रंथकार म्हणतो कीं, पूर्वींचे हिंदू लोकांचे राजे तुर्कच असत, व यास तो कनिक (कनिष्क) याचें उदाहरण देतो. यावरून युएचि आणि तुर्क हे एकच असावेत अशी एखादी दंतकथा पूर्वीं प्रचलित असण्याचा संभव दिसतो. कांहीं ग्रंथकारांचे म्हणणें आहे कीं, युएचि व जेति एकच असून, त्यांनां पूर्वीं जुत (युत) हा शब्द असे, व तोच शब्द पुढें जाट असा झाला [ब्रिटानिका].

बॅक्ट्रियामध्यें दोन ग्रीक राज्यें उरलीं होतीं व तीं पुढें शकांनीं बुडविलीं हें मागें सांगितलेंच आहे. आतां तेथें झालेल्या राज्यक्रांतीचे, आणि त्या राज्यक्रांतीस कारण झालेल्या शकांच्या चळवळींचे भारतवर्षांवर परिणाम काय झाले आहेत तिकडे लक्ष देऊं.