प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १२ वें.
अशोक ते अराजक-शकयवनांचा धुमाकूळ.

मौर्य घराण्याचे बाकीचे राजे (ख्रि. पू. २३२-१८५).- अशोकानंतर त्याचा नातू दशरथ राज्यावर आला. पण त्याची कारकीर्द लवकरच संपली, व नंतर अशोकाचा दुसरा एक नातू संप्रति हा राज्यावर आला. याचा जैन वाङ्‌मयांत पुष्कळ उल्लेख आहे. कारण त्यानें जैन पंथास मोठा आश्रय देऊन आर्येतरांच्या देशांतहि जैन मठ स्थापले. तो जैन अशोक म्हणून लोकांत प्रसिद्ध आहे. तथापि बौद्ध व जैन ग्रंथांत याच्या संबंधानें परस्परविरुद्ध अशी माहिती सांपडते, व तींतून सत्य निवडून काढणें फार कठिण आहे. संप्रतीनंतर मौर्य घराण्याचे आणखी चार राजे झाले, परंतु ते केवळ नामधारी दुर्बल राजे होते. यांच्या वेळीं मौर्य घराण्याची सत्ता भराभर कमी होत गेली, व त्याला ब्राह्मणांकडून झालेला विरोध कारण झाला असें व्ही. स्मिथ म्हणतो. कलिंगाचें राज्य मौर्य साम्राज्याचें जूं झुगारून देऊन स्वतंत्र बनलें आणि गोदावरी व कृष्णा यांच्यामधील प्रदेशांत आंध्रांचें राज्य बलिष्ठ बनलें. मौर्य घराण्याचा शेवटला राजा बृहद्रथ याला त्याचा मुख्य सेनापति पुष्प(ष्य) मित्र यानें विश्वासघातानें ठार मारलें.

यानंतरहि मौर्याचें लहानसें राज्य मगधांत चालू होतें. ७ व्या शतकांत ह्युएन त्संग या चिनी प्रवाशाच्या वेळीं पूर्ण-वर्मा नांवाचा मौर्य राजा मगधांत होता. त्याशिवाय या मूळ मौर्य घराण्याचीं वंशज म्हणून सांगणारीं लहान लहान मौर्य घराणीं ६।७।८ व्या शतकांत पश्चिम हिंदुस्थानांतील कोंकण व इतर कांहीं भागांत राज्य करीत होतीं व त्याचा अनेक शिलालेखांत उल्लेखहि आढळतो.