प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.
प्रकरण १५ वें.
ब्राह्मणोक्त व सूत्रोक्त यज्ञसंस्थेचें वर्णन.
(आत्रेय) चतूरात्र.- ज्या यज्ञामध्यें प्रधान यागाचें म्हणजे सोमरसाच्या हवनाचें अनुष्ठान चार दिवस चालावयाचें त्याचें नांव चतूरात्र. प्रजाभिवृद्धीस जरूर असणारें ब्रह्मवर्चस प्राप्त होणें हा यज्ञाचा प्रधान हेतु असल्यानें या यज्ञामध्यें पवमानसंज्ञक जीं गाणीं सकाळीं एक, दुपारीं एक, सायंकालीं एक अशा रीतीनें गावयाचीं असतात तीं गाणीं प्रकृतिभूत अग्निष्टोमांतील पद्धतीनें न गातां गायनांतील प्रत्येक ऋचा २४।२४ वेळ आवृत्ति करून गावीं. शिवाय पवमान गायनाखेरीज सामगायनें गावयाचीं तीं पहिल्या दिवशीं प्रात:सवनामध्यें त्रिवृत् नामक स्तोमानें युक्त, माध्यंदिनसवनामध्यें पञ्चदशसंज्ञक स्तोमयुक्त, आणि तृतीयसवनांमध्यें सप्तदस्तोमयुक्त करून गावीं. दुसऱ्या दिवशीं तिन्हीं सवनांच्या ठिकाणीं अनुक्रमें पञ्चदश, सप्तदश व एकविंशसंज्ञक स्तोमयुक्त अशीं सामें गावीं. तिसऱ्या दिवशीं सप्तदश, एकविंश व त्रिणव या स्तोमांनीं युक्त अशीं सामें तिन्हीं सवनांत क्रमानें गावीं. शेवटच्या म्हणजे प्रधानयांगाच्या चवथ्या दिवशीं एकविंश, त्रिणव व त्रयस्त्रिश या स्तोमांनीं युक्त असें सामांचें गायन करावें. प्रत्येक दिवशीं सांगितलेल्या पद्धतीनें सामें गाइल्यानें यज्ञकर्त्याला अनुक्रमें तेज, इन्द्रियदाढर्य, ब्रह्मवर्चस व अन्नाद्यत्व प्राप्त होतें.
अत्रीनें हा चतूरात्र यज्ञ केला त्या वेळीं चारी दिवस पूर्वोक्त पद्धतीनें चार प्रकारच्या स्तोमयुक्त गायनांचा अवलंब केल्यामुळें त्याला ब्रह्मवर्चसादि फल प्राप्त झालें. तसेंच फल जो कोणी हा चतूरात्र करतो त्याला मिळतें. या क्रतूची लोकप्रसिद्धि अत्रिऋषीपासून झाल्यामुळें ह्याला अत्रीचा चतूरात्र अशी संज्ञा आहे.