प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १० वें.
बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति.

आर्थिक स्थिति -  वरील सर्व माहितीवरून गरीत लोक, मध्यम स्थितींतील लोक व श्रीमंत लोक यांच्या ऐपतीबद्दल कांहीं अनुमानें काढतां येतात. या लोकांनां कोणत्या गोष्टीची ददात आहे असें कधीं झालें नाहीं; निदान अशाबद्दल पुरावा तरी सांपडत नाहीं. सामान्यतः स्वतंत्र माणसाला अन्नाकरितां टाकभाड्याचें काम करण्याचा प्रसंग येणें ही त्या काळांत सर्वांत मोठी आपत्ति समजली जात असे. वस्ती असलेल्या प्रदेशाशेजारीं फुकट जमीन मुबलक मिळत असल्यामुळें, फक्त तींतील जंगल काढून साफ करण्याचाच काय तो त्रास पडे.

परंतु त्या वेळच्या कालमानाप्रमाणें ज्यांनां श्रीमंत म्हणतां येईल, अशांची संख्या फारच थोडी होती. ज्यांची संपत्ति सामान्यतः कर व दुस-या कांहीं वसुलाच्या बाबी हीच असे, असे राजे लोक विसाच्यावर नव्हते. श्रीमंत सरदार लोक बरेच होते. कांहीं परगण्यांतून उत्पन्न होणा-या धर्मादायाच्या करांतून ज्यांनां नेमणुकी दिलेल्या असत, किंवा अशा त-हेचे वंशपरंपरा हक्क ज्यांनां मिळालेले होते असे कांहीं थोडे भिक्षुकहि होतेसें दिसतें. तक्षशिला, श्रावस्ती, काशी, राजगृह, वैशाली, कौशांबी वगैरे शहरांतून व बंदरांतून लक्षाधीश व्यापारी दहाबाराच्यावर नव्हते. मध्यम स्थितींतले लोक व साधारण दर्जाचे व्यापारी बरेच असल्याचे उल्लेख आहेत; परंतु यांनां अपवाद म्हणावयास हरकत नाहीं. जमीनदार लोक मुळींच नव्हते. सामान्यतः त्या वेळच्या लोकांत सुखवस्तु, शेतकरी व किरकोळ धंदे करून राहणारे लोक यांचा भरणा बराच होता. शेतक-यांची जमीन बहुतेक त्यांच्या मालकीची असे, व या लोकांचे अधिकारी त्यांचे त्यांनीं निवडलेले असत.