प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १० वें.
बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति.

साक्षरता. - लेखनकलेला अनुलक्षून केलेला असा अत्यंत जुना उल्लेख म्हणजे शील नांवाच्या ग्रंथांत सांपडतो. सुत्तंताच्या म्हणजे संवादपद्धतीनें बुद्धानें दिलेल्या व्याख्यानाच्या पहिल्या वर्गाचा पहिला भाग म्हणून जे तेरा संवाद आहेत त्यांनां ही संज्ञा समष्टिरूपानें दिलेली आहे. ह्या शील ग्रंथांचा काळ र्‍हीस डेव्हिड्सच्या मतें अजमासें ख्रिस्तपूर्व ४५० हा असावा. या ग्रंथांत बौद्ध संप्रदायाच्या अनुयायांनीं काय काय गोष्टी करूं नयेत यांच्या याद्या सांपडतात. यांपैकीं एका यादींत पुष्कळ खेळ आहेत. अक्षरिका नांवाचा एक खेळ यांत आहे. हा खेळ म्हणजे हवेंत बोटांनीं दाखविलेलीं, किंवा एखाद्याच्या पाठीवर लिहिलेलीं अक्षरें ओळखणें हा होय. संदर्भावरून पाहतां, हे सर्व खेळ मुलांचे असावेत, व हाहि त्यांतलाच एक खेळ असावा.

लेखनकलेबद्दल विनय नांवाच्या ग्रंथांतहि बरेच सूचक उल्लेख सांपडतात. उदाहरणार्थ, विनय. ४.७ यामध्यें लेखनकलेची एक उत्तम कला या नात्यानें स्तुति केल्याचें दिसून येतें. बौद्ध संप्रदायाच्या अनुयायी म्हणविणा-या स्त्रियांनीं ज्या ज्या गोष्टी करूं नयेत म्हणून लिहिलें आहे त्यांनां लेखनकला हा एक अपवाद आहे. गुन्हेगार लोकांपैकीं ज्यांची ज्यांचीं नांवें राजाच्या देवडीवर नमूद करून ठेविलेली असत, त्यांनां संप्रदायांत घेतलें जात नसे. मुलानें पुढें कोणता धंदा करावा अशाबद्दल विचार करतांना त्याचे आईबाप म्हणतः ''यानें लेखकाचा धंदा केल्यास हा सुखासमाधानानें आनंदांत दिवस काढील, परंतु याचीं बोटें मात्र दुखूं लागतील.'' संप्रदायापैकीं एखाद्या इसमानें दुस-या एखाद्याला लिहितांना जर आत्महत्येपासून होणा-या फायद्याचें वर्णन केलें तर त्या लेखांतील प्रत्येक अक्षरागणिक त्यानें एक एक गुन्हा केला असें मानलें जात असे.

विनयांतील या सर्व उदाहरणांवरून एवढें स्पष्ट दिसतें कीं, विनय ग्रंथ रचला गेला त्या काळीं लेखनकला अस्तित्वांत होती; सरकारी जाहिराती, सूचना, वगैरेंच्या कामीं व खासगी पत्रव्यवहाराच्या बाबतींत लेखनकलेचा उपयोग होत होता; मानमरातबानें उपजीविका करण्याचें साधन म्हणून लेखनकलेचा उपयोग होण्याइतकी पात्रता तिला आली होती; आणि लेखनकला विशिष्ट वर्गांतले लोक शिकत इतकेंच नव्हे, तर सामान्य लोक किंवा स्त्रियासुद्धां या कालांत लिहिण्यास शिकत.