प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १० वें.
बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति.
शाक्येतर कुलें.- शाक्य कुळांखेरीज इतर कुळांचीं जीं नांवें सांपडतात तीं खालीं दिलीं आहेत:-
१ सुंसुमार पर्वता वरचे भग्ग.
२ अक्ककप येथील बली.
३ केसपुत्त येथील कालाम.
४ रामग्राम येथील कोलियन.
५ कुशिनार येथील मल्ल.
६ पावा येथील मल्ल.
७ पिप्पलीवन येथील मौय.
८ मिथिलेचे विदेह.
९ वैशाली येथील लिच्छवी. = वज्जि.
याशिवायहि पुष्कळ जातींचीं नांवें सांपडतात; परंतु त्या एकत्र संघ करून रहात होत्या किंवा राजतंत्रानें चालत होत्या याबद्दल माहिती मिळत नाहीं. एकदां राजनियंत्रित पद्धतीखालीं असलेलीं जात मागून स्वतंत्र होऊं पहात असल्याचें एकच उदाहरण सांपडतें. ज्या ज्या ठिकाणीं राजसत्ता एकाच घराण्याकडे बराच काळ राहिली त्या त्या ठिकाणीं तिचें पर्यवसान अनियंत्रित एकमुखी राजसत्तेत झालेलें आढळून येतें.