प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १० वें.
बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति.
विनिमयपद्धति.- जिनसांच्या अदलाबदलीनें व्यापार करण्याची पद्धत अजीबात नाहींशी झाली होती. तथापि राजमुद्रांकित नाणीं वापरण्याची पद्धतहि या वेळीं अंमलांत आली नव्हती. कहापन नांवाच्या एका तांब्याच्या नाण्यावर सर्व व्यवहार चालत असे. या नाण्याचें वजन अजमासें १४६ ग्रेन किंवा १॥। तोळे असे, व याच्या चोखपणाबद्दल व वजनाबद्दल खासगी व्यक्तींनीं शिक्के मारून हमी घेतलेली असे. हे शिक्के व्यापारी लोक मारीत, कीं संघांचे अधिकारी मारीत, कीं एखादा याच गोष्टीचा व्यापार करणारा इसम मारी हें निश्चित नाहीं.
चांदीच्या नाण्यांचा उपयोग कोठेंहि केला जात नसे. अर्धा व पाव कहापन अशीं आणखी दोन नाणीं होतीं. याखेरीज दुसरीं नाणीं असल्याचें दिसत नाहीं. सोन्याच्या नाण्यांबद्दलचे उल्लेख उत्तरकालीन व संशयित आहेत; व असलीं जुनीं नाणीं कोठेंहि सांपडत नाहींत. हिंदुस्थानांत असतांना अलेक्झांडर यानें हिंदूंसारखीं चौकोनीं नाणीं पाडलीं होतीं, ग्रीक लोकांप्रमाणें वाटोळीं नाणीं पाडलीं नाहींत हें लक्षांत ठेवण्यासारखें आहे.
सरकारनें बाजारचे निरख ठरवून दिल्याचा उल्लेख अगदीं अलीकडचा आहे (मनु. ८.४०१). राजवाड्यामध्यें खासगीकडे लागणा-या जिनसांचे दरदाम ठरवून देण्याकरितां एक अधिकारी ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकांत असल्याचें लिहिलें आहे. परंतु सामान्य बाजाराचे दरदाम ठरविणें निराळें, व राजवाड्यांतील खासगी खर्चाच्या जिनसांचे निरख ठरविणें निराळें. सामान्यतः, कहापनाची किंमत आपल्या ५६ आण्याइतकी असे, व एवढ्या किंमतींतच आजच्या बारा आण्यांच्या किंमतीइतका माल मिळे.