प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १ लें.
चोविसशें वर्षांतील जगद्विकास

इतिहासलेखनाचें धोरण - जगामध्यें मनुष्यांमनुष्यांत भेद असल्यामुळें व सदृशांची शासनसंस्था एक असावी या भावनेमुळें प्राचीन काळीं देखील निरनिराळे राष्ट्रस्वरूपी समुच्चय दृष्टीस पडतात. या सर्व समुच्चयांचा हिशोब घेऊन नंतर त्यांचे घटनेविघटनेचे फरक पहात बसलें पाहिजे. त्या समुच्चयांपैकीं अनेक समुच्चय आज एका मोठ्या राष्ट्राखालीं, उद्यां एका साम्राज्याखालीं एकत्रित कसे झाले पुन्हा निराळे कसे झाले, पुढें नवीन समुच्चय कसे बनत गेले, लहान लहान समुच्चयांस ठोक देऊन एका सत्तेखालीं आणणार्‍या शक्ती कोणकोणत्या होत्या यांची हकीकत हा राजकीय इतिहासाचा मुख्य भाग होय. निरनिराळ्या समुच्चयांस सामान्य वाङ्‌मयानें, परमार्थसाधनानें किंवा आपल्या कलाविकासानें एकस्वरूप दिलें जातें, तिचें वर्णन हा सांस्कृतिक इतिहासाचा मुख्य भाग होय. यासाठीं प्राचीन राष्ट्रें, प्राचीन भाषा, त्यांतील कोणत्या भाषांचें प्रामुख्य कोणत्या काळांत किती वाढलें याची माहिती आणि त्याबरोबर मुसुलमानी, ख्रिस्ती व बौद्ध संप्रदायांनीं व ब्राह्मण संस्कृतीनें जगाच्या बर्‍याचशा भूभागावर सादृश्योत्पादक काय परिणाम घडविले यांची माहिती जगाचा थोडक्यांत इतिहास सांगण्याचा प्रयत्‍न करतांना देखील महत्त्वानें वर्णन करण्याजोगी आहे.