प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १ लें.
चोविसशें वर्षांतील जगद्विकास
युरोपीय इतिहासांतील व्यापक क्रिया - यूरोपच्या इतिहासांत झालेल्या घडामोडी थोडक्यांत पुढें मांडतांना बर्याच कालपर्यंत चाललेल्या, अधिक व्यापक अशा क्रिया प्रथम घेतल्या पाहिजेत. अशा क्रिया शोधूं लागतां खालील क्रियांस प्रामुख्य येतें.
(१) पूर्वीचीं लहान राष्ट्रकें व कांहीं कालपर्यंत लहान मोठीं साम्राज्यें व पुढें साम्राज्यें मोडून झालेलीं मोठालीं राष्ट्रें व साम्राज्यें तयार झालीं व तीं पुढें राष्ट्रसंघसदस्य झालीं या क्रियेचा इतिहास.
(२) जीं राष्ट्रें परस्परांशीं असदृश्य व अस्पृष्ट होतीं ती ख्रिस्ती संप्रदायानें बांधलीं गेली व यामुळें संप्रदायसंस्थेनें राष्ट्रांवर अगर संस्थानांवर जें कमी अधिक दडपण पाडले व पुढें ते कालांतरानें कमीं झालें त्या क्रियेचा इतिहास.
(३) यूरोपांत मुसुलमानी सत्तेच्या उचलीचा व संकोचाचा इतिहास.
(४) यूरोपांतील संस्थानांमध्यें लहान उपसंस्थानांचें अगर सरदार जाहगिरदार यांचें प्राबल्य कमी कसें होत गेलें, व प्रथम एकतंत्री राजांचें आणि नंतर लोकांचें प्राबल्य कसें वाढत गेलें त्या क्रियेचा इतिहास.
(५) लोकांचें प्राबल्य वाढत असतां पैसेवाल्या वर्गाचें महत्त्व वाढूं लागलें; व पुढें कालांतरानें कामकरी वर्ग सुसंघटित होऊन आपलें महत्त्व वाढवूं लागला; व सर्व समाजसत्ता स्वायत्तीकृत करण्याचा प्रयत्न करूं लागला; या क्रियांचा इतिहास.
(६) वैज्ञानिक इतिहास. शास्त्रीय लेखनाचा ग्रीसमध्यें झालेला आरंभ, त्यास पारमार्थिक संप्रदायांमुळें आलेलें वैकल्य आणि त्याचा ग्रीक संस्कृतीच्या पुनरुज्जीवनानंतर झालेला विकास.
(७) कलेचा इतिहास. सौंदर्य व माधुर्य यांच्या कल्पनांचा ग्रीक राष्ट्रामध्यें झालेला उदय, त्यावर ख्रिस्ती व मुसुलमानी संप्रदायांचा परिणाम; पुन्हां पैतृक कल्पनांचें ग्रहण व नंतरचा विकास.
वैज्ञानिक इतिहास हा विशेषेंकरून पांचव्या भागांत येत असल्यामुळें त्याखेरीज इतर मुद्दयांवर येथें विवेचन देण्यांत येईल.