प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १ लें.
चोविसशें वर्षांतील जगद्विकास

इतिहासलेखनार्थ कालविभाग - सर्व जगाचें स्थूल इतिहासचित्र देण्याच्या प्रयत्‍नांत कालविभाग पाडावयाचा प्रयत्‍न थोडासा गुंतागुंतीचा होतो. ज्ञानाच्या दृष्टीनें जे कालविभाग पडतील ते भाषेच्या दृष्टीनें पडावयाचे नाहींत. एखाद्या संप्रदायाच्या प्रामुख्याच्या अगर अप्रामुख्याच्या दृष्टीनें पाहूं गेलें असतां कालविभाग अगदीं निराळेच पडतील. याप्रमाणें भिन्न तत्त्वें आपण घेतलीं असतां भिन्न इतिहासकाल मानले पाहिजेत. आणि प्रत्येकाचें विवेचन स्वतंत्र केलें पाहिजे तथापि तसें करण्यास आपणांस अवकाश नसल्यामुळें अनेक तत्त्वें अंगीकारूनहि थोड्याशा कालविषयक व्याप्‍ती अव्याप्‍तीस न भितां कोणत्या कालांत कोणत्या गोष्टी ठळकपणानें पुढें येंतात तें पाहून इतिहासकाल पाडले पाहिजेत. या दृष्टीनें आम्हीं खालील कालविभाग पाडतों.

पहिला काल - ख्रिस्तपूर्व ५०० पासून ख्रिस्तोत्तर १५०० पर्यंत.
दुसरा काल - इ.स. १५०० पासून आजपर्यंत.

पहिल्या कालाचे आणखी पोटविभाग पाडावयाचे झाल्यास त्या कालाची विभागणी १००० इसवीसनाच्या सुमारास करतां येईल. या कालाच्या सुमारास यूरोपातील भाषांच्या रूपांत फेरबदल होऊन आजच्या अर्वाचीन भाषा झाल्या आहेत. हिंदुस्थानच्या इतिहासाचा कालविभागहि त्याच सुमारास पाडतां येईल. हिंदु संस्कृतीचा जवळ जवळ पूर्ण विकास याच सुमारास झाला आणि मुसुलमानी आघात याच सुमारास होऊन संस्कृति संकोचपंथास लागली होती. अर्वाचीन बंगाली, मराठी या भाषांनांहि स्वतंत्र स्थिति या सुमारास प्राप्‍त होऊं लागली होती. बुद्धोत्तर इतिहासाचा मुख्य विभाग काल १५०० हा धरण्याचा हेतु येणेंप्रमाणें : ख्रिस्ती सोळांव्या शतकाच्या प्रारंभाच्या सुमारास यूरोपच्या अर्वाचीन इतिहासास सुरुवात झाली असें बरेचसे यूरोपीय इतिहासकार समजतात. इ.स. १४९२ मध्यें कोलंबसानें अमेरिका खंड शोधून काढलें. वास्को दि गामा यानें १४९८ मध्यें हिंदुस्थानांत यूरोपांतून जलमार्गानें जाण्याचा मार्ग शोधून काढला. या क्रियांचा पुढील इतिहासावर महत्त्वाचा परिणाम झाला. १५०० नंतर थोडक्याच वर्षांनीं इंग्लंडमध्यें ८ वा हेन्री गादीवर आला आणि त्यानें रोमची इंग्लंडवरील सत्ता झुगारून दिली. आणि त्यामुळें उत्तर अमेरिका रोमच्या कचाटींत फारशी आलीच नाहीं. हिंदुस्थानांत थोडक्या काळांत मोंगली सत्ता बाबरनें स्थापित केली. दक्षिणेमध्यें संस्कृत ग्रंथकारांची परंपरा म्हणजे हिंदुसंस्कृतीची मशाल तालिकोटच्या लढाईंत १४९८ मध्येंच विझली गेली. मुसुलमानी सत्ता हिंदुस्थानाबाहेर या कालानंतर संपुष्टांत येत चालली.

इ.स. १५०० पर्यंत यूरोपमध्यें राष्ट्रांची वाढ होत होती. म्हणजे लहान संस्थानांमधील लढाया आटपून त्यांची मोठीं राष्ट्रस्वरूपी संस्थानें बनली आणि १५०० नंतर यूरोपीय राष्ट्रें अतिराष्ट्रीय स्वरूपाच्या चळवळींत पडलीं.

लहान संस्थानांपासून प्रारंभ होऊन मध्यें साम्राज्य व पुढें साम्राज्याचे तुकडे व त्यानंतर मोठीं राष्ट्रें या क्रिया ख्रिस्तपूर्व ५०० पासून ख्रिस्तोत्तर १५०० पर्यंत चालत होत्या आणि १५०० पासून १९१८ पर्यंत साम्राज्यविस्ताराची क्रिया चालत होती. १९१८ च्या नंतर जग एका संस्थेखालीं आणून पुनः स्वाभाविक समुच्चयांचें पृथक्त्व व शासनस्वातंत्र्य रक्षणाची क्रिया सुरू झाली आहे.