प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.               

हिंदी संगीत आणि पाश्चात्य संगीत– यांच्यामधील फरकासंबंधाचे काही महत्वाचे मुद्दे येथे देतों.

(१) हिंदी संगीताचा प्रमुख घटकावयव आलाप किंवा रागरागिण्या (मेलडी) हा आहे आणि पाश्चात्य संगीताचा सवरसंवाद (हार्मनी) हा आहे. हिंदी संगीतांत स्वरांचा संबंध रागांतील विशिष्ट प्रकारच्या स्वरांशी जोडलेला असतो आणि पाश्चात्य संगीतांतील स्वरांचा निरनिराळया स्वरमिलाफाशीं असतो. ऐकमेकांशी मिलाफ असलेल्या स्वरांच्या ठराविक अनुक्रमाने उच्चार केल्यानें हिंदी संगीतांतील स्वरसंवाद (हार्मनी) निरनिराळे परंतु एकमेकांशी संबंध असलेले निरनिराळे स्वर कानाला गोड लागतील अशा त-हेनें एकदम उच्चारुन उत्पन्न करितात. या महत्वाच्या फरकाचा परिणाम असा झाला की हिंदी संगीताची वाढ फक्त आलाप व रागरागिण्या याबाबतीच झाली आणि पाश्र्चात्य संगीताची अतिशय मोठी वाढ स्वरसंवादाचे बाबतीत झाली आहे. याप्रमाणे पाश्चात्य संगीताची वाढ दुस-या मार्गाने झाली आहे एवढयामुळें तें हिंदी संगीतापेक्षां पुढें आलेलें असें म्हणतां येईल काय ? कारण हिंदी संगीताची वाढ एका विशिष्ट दिशेनें म्हणजे आलापांच्या बाबतीत झालेली आहे आणि विविधता आणि रागरागिण्या आणि ताल यांची सर्व अंगांनी वाढ झालेली आहे. या सर्व बाबींकडे पाश्चात्य संगीताज्ञांचे मुळींच लक्ष गेलेलें दिसत नाही. तात्पर्य गीताची प्रगति करण्याचा दोन निरनिराळया दिशा असून एका संगीताने एका दिशेनें जितकी  दूरवर प्रगती केलेली आहे तितकीच दुस-या संगीतानें दुस-या दिशेनें केली आहे. राग आणि आलाप या बाबतीत  हिंदी संगीतानें इतकी मोठी प्रगति केली आहे कीं, तिची पूर्ण जाणिव सर्व हिंदी संगीत ज्ञानांनाही झालेली आहे असे दिसत नाही कारण पुर्वी दळणवळणाचीं साधनें सुलभ  नसल्यानें दूरवरच्या प्रांतांतील संगीत तंज्ञांचा ऐकमेकांचा प्रत्यक्ष परिचय क्वचितच घडत असे अलिकडे या बाबतींत अखिल भारतीय संगीत परिषदेनें उत्तम साधन उपलब्ध करून ठेविलें आहे. दुसरी अडचण म्हटली म्हणजे स्वरलेखनाच्या एका सर्वमान्य संर्वागपरिपुर्ण अशा पद्धतीचा अभाव हे होय. हे वैगुण्य दूर करण्याचें हिंदी संगीत तज्ञांनी आतां बरेंच मनावर घेतलें आहे.

(२) हिंदी संगीतांतले सर्व आलाप एका विशिष्ट रसाला (मूड) परिपोषिक असतात व स्वर आणि ताल हे सर्व मिळुन अखेर पर्यंत एकच रस उत्पन्न होईल अशी त्याची योजना असते. या पद्धतीप्रमाणें एकाच पद्यांत भिन्नभिन्न रस येऊं देत नाहींत. राग आणि रस यांचा मेळहि कांही विशिष्ट नियमानुयार घातलेला असतो. हिंदी संगीतांत सम साधतात ती तालाच्या सहय्याने साधतात. पाश्चात्य संगीतांत पद्यांतील सम साधण्याकरीतां रस भेदाचा उपयोग करतात. हिंदी संगीतांत निरनिराळे राग गाण्याच्या निरनिराळया वेळा ठरलेल्या आहेत आणि निरनिराळया रागांची चित्रें व त्यांतील व्यक्तींच्या चेह-यावरील मनोविकार या सर्व गोष्टी  हिंदी संगीतांसंबंधाच्या याच कल्पनेचे समर्थन करतात.

(३) तिसरा व सर्वांत महत्वाचा फरक म्हटला म्हणजे पद्यांतला किंवा रांगांतल्या वादीसंवादी स्वरासंबंधांच्या (सॅलियंटनोटस) होय. प्रत्येक रागातले वादी म्हणजे प्रमुख स्वर कोणते हें हिंदी संगीतात जुन्या दीर्घकाल चालत आलेल्या परंपंरेनें ठावून टाकलेलें आहे. कोणताहि राग गात असतांना गायकास या वादीसंवादी स्वरांच्या बाबतींत फेरफार करण्याचा अधिकार नसतो. स्वरांमध्ये वादीसंवादी उर्फ प्रमुख दुय्यम अशा प्रकारचा परस्पर संबंध प्राचीन परंपरेने ठरवून टाकिलेला आहे. उलटपक्षीं पाश्चात्य संगीतात प्रमुख स्वर कोणते हें स्वर संवाद किंवा कौटरपॉइंट यांच्यापासून होणा-या क्षणिक परिणामावरून ठरतें. त्यामुळें पाश्चात्य संगीतांत व्यक्तिश: कोणत्याही स्वराला महत्व नसून अनेक स्वरांच्या समुच्चयाला विशेष किंमत असते.

(४) शिवाय हिंदी संगीतांतील पद्यांतले आलाप कांही ठराविक स्वरांच्या परस्परसंबंधावर अवलंबून असतात, व हे आलापविषयक स्वर निरनिराळया रागांचे निरनिराळे असतात.  त्यामुळे हे ठराविक स्वर कितीहि निरनिराळया प्रकारानें काढले तरी पाश्चात्य संगीतातील अनेकस्वरसंवादित्व साधत नाही.  उलट पाश्चात्य संगीतांत मुख्य स्वरांशी उत्तम मिलाफ करणारे अनेक स्वर निरनिराळया प्रकारांनी वाजवून आलाप काढतात.

(५) हिंदी संगीतांत गमकाला फार महत्व असतें; परंतु पाश्चात्य संगीतांत गमकांनां हिंदी संगीतांतल्या इतकें प्राधान्य दिलेलें नाहीं.

(६) हिंदी संगीताला कोमल स्वरांच्या ( मायक्रोटोन ) योजनेमुळें व शास्त्रशुद्ध स्वरसप्तक कायम ठेवल्यामुळें फार माधुर्य येते.  परंतु पाश्चात्य संगीतांतील स्वरसप्तक मध्यम पद्धतीनें    ( टेंपर्ड ) बसविलेलें असल्यामुळें त्यांच्या कानाला हिंदी शुद्धस्वरप्तक अपरिचयामुळें चमत्कारिक लागतें.

(७) निरनिराळ्या तालांची योजना हाहि हिंदी संगीतांतला महत्वाचा फरक आहे.  या तालांच्या योजनेमुळें हिंदी संगीत पाश्चात्यांच्या कानाला चमत्कारिक वाटतें.  पाश्चात्यांच्या संगीतांत तालाऐवजी स्वराघातांची योजना आहे.

(८) याशिवाय पाश्चात्यांनां हिंदी संगीत न आवडण्याचें कारण कांही बाह्य गुणांकडे हिंदी संगीतज्ञांचे असलेलें दुर्लक्ष्य हे होय.  पाश्चात्य संगीतांत आवाजाला फार महत्व देतात.  हिंदी पद्धतीत कंठमाधुर्यापेक्षां संगीताच्या शास्त्रीय ज्ञानाला फार महत्व आहे.  हिंदी रागरागिण्या ऐकणाराच्या कानाला काय गोड लागतें याकडेच केवळ लक्ष देऊन ठरवलेल्या नसून काहीं ठराविक शास्त्रीय तत्वानुसार बसविलेल्या आहेत.  विशीष्ट राग गाणाराच्या आवाजाकडे कोणी फारसें लक्ष देत नाहीं.  यामुळें हिंदी गवई शास्त्रीय ज्ञानाला मुख्य महत्व देतात, आवाजांतील गोडी कमी महत्वाची समजतात.  हिंदी गवयाच्या आवाजासंबंधाने कोणी नाकें मुरडल्यास त्याला अरसिक, अतज्ज्ञ समजतात.  आवाजाप्रमाणें हावभाव व मुद्रा या संबंधानेहि हिंदी गवई बेफिकिर असतात.  डॉ. रविन्द्रनाथ टागोर यांनीहि हिंदी गवयांमधील हे दोष निदर्शनास आणून दिले आहेत.  ते म्हणतात, “गातांना चेहरा विद्रूप दिसला किंवा तिसऱ्या सप्तकांतील सूर काढतांना आवाज किरटा, कर्कष झाला तरी त्याबद्दल हिंदी गवयांना कांहींच कमीपणा वाटत नाही.  आपलें गाणे शास्त्रशुद्ध आहे किंवा नाही या एका गोष्टीकडेच ते सर्व लक्ष पुरवितात.”

यूरोपीय संगीतज्ञ आवाजाचें आणि वाद्यांचे माधुर्य याविषयी फार काळजी घेतात.  शिवाय पाश्चात्य लोकांनां हिंदी गवयांची नाकांतून आवाज काढून गाण्याची तऱ्हा बिलकुल आवडत नाहीं.

हिंदी आणि पाश्चात्त्य संगीत यांमध्ये आणखी एक महत्वाचा फरक डॉ. रवीन्द्रनाथ टागोर यांनी पुढे मांडला आहे ते म्हणतात:- “मॅडम आल्वनी यांनी नाइटिंगेल पक्षाचे हुबेहूब अनुकरण करुन जेव्हां गाण्याला सुरवात केली तेव्हां त्यांचे गाणे माझ्या कानाला फारच अप्रिय वाटले.  अशा ह्या पशुपक्ष्यांच्या नैसर्गिक आवाजाची बालिश नक्कल करणें मला फारसे अल्हादकारक वाटत नाही.  पाश्चात्य संगीत सर्व असल्या ह्या बाह्य गोष्टींच्या नकलांनी भरलेले आहे.”

हिंदी संगीतासंबंधानें अशी एक सुधारणा व्हावयास पाहिजे आहे कीं, गवयांनी राग आणि ताल यांच्या संबंधाची परंपरागत माहिती मिळविण्यातंच सर्व आयुष्य खर्च न करिता ते ध्वनिशास्त्राच्या कोणत्या तत्वावर तयार केलेलें आहे, ते शोधून काढण्याचा प्रयत्न करावा.  अखिल हिंदी संगीताचें असे शास्त्रीय संशोधन झाल्याशिवाय त्यांत प्रगति व्हावयाची नाही; शिवाय ही प्रगति होण्याकरितां सामान्यत: प्रत्येक हिंदी इसमानें संगीतशास्त्राचा आणि गायनाचा थोडा फार तरी अभ्यास जरुर ठेवावा.  संगीतावर देशी भाषेत पुष्कळ पुस्तकें तयार झालेलीं आहेत, त्यांच्या साहाय्यानें प्रत्येक गृहस्थानें कुटुंबांतील मुलास लहानपणापासून गायन वादनाचें शिक्षण देण्याचा उपक्रम करावा.  पाश्चात्य देशांत कोणतें तरी एखादें वाद्य घरांत असणे सुशिक्षित कुटुंबे अवश्य मानितात.