प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.           
 
हलायुधाची टीका.- हलायुधाच्या टीकेवर बरेच महत्वाचे प्रश्न अवलंबून आहेत. त्याच्या ग्रंथरचनेचा काल दहावें शतक असावा. हा काल अगदीं निश्चित जरी नाहीं तरी बऱ्याच अंशानें खरा आहे.

हलायुधानें वृत्तांचें स्वरूप म्हणून जीं उदाहरणें दिलीं  आहेत त्या श्र्लोकांमध्यें त्या कालीं राज्य करीत असलेल्या मुंज राजाच्या नांवाचा उल्लेख आहे; व हा राजा ह्या पद्यांच्या  कर्त्याचा आश्रयदाता होता असें ह्या उल्लेखावरून स्पष्ट आहे. कदाचित् हा हलायुधाचाच आश्रयदाता असावा. कारण अशा तऱ्हनें आपल्या धन्याची थोरवी गाण्याची पद्धत हिंदुस्थानांत दिसून येते. वेवरनें वरील तऱ्हेचे उल्लेख कोठें येतात तीं स्थळें दिलीं आहेत.

कालिदासाची स्तुति करणारें एक पद्य या टीकेंत दिलें आहे. कात्यायन व माघ ह्यांच्या ग्रंथांतील कांहीं उतारेहि  यांत दिले आहेत. कोलब्रूक व कर्न साहेबांनीं आणखी कांहीं उदाहरणें दिलीं आहेत.

हलायुधानें दिलेल्या उदाहरणांपैकीं अमुक उध्दृत आहेत  व अमुक त्याचीं स्वत:चीं आहेत अशाविषयीं कांहींएक नियम ठरवितां येणार नाहीं; व जेथें जेथें दुसरा कांहीं पुरावा मिळत नाहीं तेथें त्याचा व्यक्तिश:च विचार करणें भाग आहे. उदाहरणार्थ, ज्या उदाहरणांमध्यें यमकांची जुळणी आहे तीं त्या यमकांच्या जुळणीवरून अलीकडचीं आहेत असें धरून चाललें-व हें कधीं कधीं संभवेल सुध्दां-तरी पण ह्यावरून तीं उदाहरणें हलायुधानेंच लिहिलीं असें सिध्द होत नाहीं.

हलायुध ह्या व्यक्तिविषयीं सुध्दां आपणांस निश्चित स्वरूपाची अशी कांहींच माहिती उपलब्ध नाहीं. जैमिनीय  मीमांसासागर आपल्या पित्यानें आलांडला अशी एक उदाहरणांत हलायुधानें आपल्या वडिलांची स्तुति केली आहे. परंतु हलायुधाच्या टीकेचा हा भाग त्यानेंच लिहिला किंवा नाहीं हें निश्चित सांगतां येत नाहीं; कदाचित् ह्या उदाहरणांतील श्र्लोक दुसरीकडून आणून येथें घातला असेल. हलायुध  हें नांव फारच ठिकाणीं आढळत असल्यामुळें अमुक हलायुध आणि प्रसिध्द हलायुध हे दोघे एकच आहेत असें ठरवितां येत नाहीं. ऑफ्रेक्ट साहेबांच्या पुस्तकांत ह्याविषयीं  विवेचन आहे. अभिधानरत्नमाला ह्या ग्रंथांत कृत्रिम वृत्तें आहेत ह्या मुद्दयावरून त्या ग्रंथाचा कर्ता व आपण ज्याचा विचार करीत आहोंत तो हलायुध हे एकच आहेत असें ऑफ्रेक्ट साहेबांचें मत आहे. वेवरचेंहि असेंच मत आहे व  कालाच्या दृष्टीनें तें असंभवनीय नाहीं.