प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.            
 
सोमनाथपंडिताचा रागविबोध.– रागविबोध हा हिंदी संगीतशास्त्रावरील महत्वाचा ग्रंथ इ.स. १६०९ मध्यें सोमनाथ या पूर्वकिनाऱ्यावरील राजमहेंद्री येथील तेलगू ब्राह्मणपंडितानें लिहिलेला आहे, हा स्वत: गाणारा असून विद्वान् संगीतज्ञ आणि कवीहि होता.  याचा ग्रंथ आर्यावृत्तामध्यें लिहलेला आहे.  या ग्रंथात स्वरांच्या उपत्तीपासून आरंभ करुन, पुढें अस्तित्वांत असलेल्या निरनिराळया वीणांचे वर्णन देऊन त्यांचा उपयोग कसा करावा हे सांगितलें आहे.  तसेच बावीस श्रुतींची नांवे व त्यांची स्थानेंहि त्यांत दिलेलीं आहेत.  सोमनाथ हा दक्षिण संगीतपद्धतींतला असून त्यानें रागाचे जनक आणि जन्य असे दोन प्रकार केले आहेत.  हल्ली दक्षिण हिंदुस्थानांतील संगीतांत असेच प्रकार करतात. रागापासून निघालेल्या अनेक रागिण्याहि या ग्रंथात दिलेल्या आहेत.