प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
सामामंत्रलेखनांतील चिन्हे.– बिब्लिओथिका इंडिका ( कलकत्ता १८७४ ) या प्रतींत सामसंहितामंत्रातील अक्षरांच्या डोक्यावर मधून मधून उ, क, र हीं अक्षरे असून १,२,३ हे आकडे असतात. अक्षरांपैकी र हें अक्षर जास्त वेळ आढळते व उ आणि क कमी आढळतात. अक्षरें असतात ती १,२,३ या आंकडयांना लागून असतात व क्वचित मोकळी असतात. र हें अक्षर तिन्ही आंकडयांपैकी कोणत्याहि आंकडयांस लागून असतें. उ आणि क हीं अक्षरें १ या आकडयास लागून असलेलीं आढळत नाहींत. अक्षरांच्या डोक्यावर येणारा आंकडा तीनच्या पुढील नसतो. अपवाद:- भाग १ पृष्ठ १६० व २५६ मध्ये संहितामंत्रात अनुक्रमे ५ व ४ आकडे आले आहेत.
सामगानमंत्रातील अक्षराच्या डोक्यावर १ पासून ५ पर्यंत आकडे येतात. क्वचित ७ आकडा येतो. परंतु ६ मात्र येत नाही. अपवाद:- भाग १ पृष्ठ ४३२ येथे गानमंत्रात ‘इंद्रोअंगा’या पदातील ‘द्रो’या अक्षरावर ८ चा आकडा.
गानमंत्रातील अक्षरावर फक्त र हे अक्षर आढळते. क आणि उ आढळत नाहीत. डोक्यावर येणारे र अक्षर केव्हां आकडयास लागून असतें व केव्हां सुटें असते.
गानमंत्रातील अक्षराच्या पुढें १ पासून ६ पर्यंत आकडे येतात. हे आकडे केव्हां एकत्र २ ते ५; कोठें २ ते ४ अनुक्रमाने अथवा उलट सुलट व एककटेहि येतात. मात्र एक हा आंकडा एकटा येत नाही. आकडयांची संख्या केव्हां केव्हां पांचपर्यंत असते.
ओळीत येणारे आंकडे जेथे २,३,४,५ अशा अनुक्रमानें येतात तेव्हां त्या प्रत्येक आंकडयाच्या डोक्यावर एकाचा आंकडा असतो. मात्र त्या ( ओळींतील ) आंकडयांच्या पूर्वी ओकार असला तर आकडयांच्या डोक्यावर आंकडे येत नाहींत. या नियमास क्वचित अपवाद: - भाग २ पृष्ठ ११८ येथे ‘माता’ या अक्षरापुढील अनुक्रमानें येणाऱ्या २,३,४,५ या आंकडयांच्या डोक्यांवर आंकडे नाहीत. त्याचप्रमाणे भाग २ पृष्ठ १५२, २०३, २३५ येथेंहि आकडयांच्या डोक्यावर आंकडे नाहीत.
गानमंत्रात ओळीतील अक्षरापुढे क्वचित २, ३, ४ व ३, ४, ५ या अनुक्रमाने येणाऱ्या तीनच आकडयांच्या डोक्यावर १ चा आंकडा येतो. उ. भा. २ पृ. ७५ मध्ये ‘तरेमा’ यापुढील २, ३, ४ या आकडयांच्या डोक्यावर १ चे आंकडे. गानमंत्रातील अक्षरावर कोठे ऽ, ~, _, इत्यादि खुणा आढळतात. ही खूण फक्त ओळीत येणाऱ्या २ या आंकडयाच्या डोक्यावर असते. मात्र तो दोनचा आंकडा एकटा असेल तरच असते. या नियमास क्वचित अपवाद:- भाग २ पृ. २२१ ‘रा’ यापुढील २ आंकडयावर खूण नाही. बाकीच्या दोन्ही खुणा अमक्याच अक्षरावर अथवा आंकडयावर असतात असें सांगतां येत नाहीं.
गानमंत्रात ओळीमध्यें अक्षरांच्या पुढें अशी ० अशी खूण संहितामंत्रातील अनुस्वाराकरिता असते. परंतु ती अनुस्वार असलेलें अक्षर विकृत झाले तर असते. उदाहरण :- भाग २ पृष्ठ १७२-७३ येथे संहितामंत्रात ‘रथं विष्वंच’ अशी पदे आहेत. गानमंत्र ५ यामध्यें ‘रथ विष्वा’ असा तुकडा आल्यामुळें ओळीत अनुसराची खूण नाहीं. परंतु गानमंत्र ६ मध्यें ‘रथां ३’ अशी अक्षरें असून त्यांपुढे ३ चा आंकडा आल्यामुळे त्यापुढे ‘रथं’वरील अनुस्वाराकरिता ० ही खूण आली आहे.
या खुणांचा अर्थ कसा लावावयाचा हा प्रश्न आहे. या खुणा आम्ही फक्त कलकत्यास ( १८७४ मध्ये ) छापलेल्या प्रतींतील दिल्या आहेत. या प्रतींतील खुणांचें स्पष्टीकरण केलें म्हणजे सर्व झालें असे मुळीच नाही. खरें म्हटले असतां खुणांशिवाय अक्षरस्वरुपभेदावरुन सामांचे गायनशास्त्र काढलें पाहिजे. कारण खुणा फारच उत्तरकालीन असण्याचा संभव आहे. तथापि गांनांतील खुणांचा अर्थ देण्याचा प्रयत्न येथें केला आहे. मंत्रातील १, २, ३ हे आंकडे उदात्त, अनुदात्त, स्वरितांकरिता असावेत. र या अक्षराचा अर्थपुढे दिला आहे पण उ, व क यांचा अर्थ लागला नाही.
सामवेदाच्या गायनासंबंधी निरनिराळया शाखांमध्ये बरेच मतभेद आहेत. कौथुमी शाखाच विशेषेंकरुन प्रचारांत असल्यामुळें त्या शाखेच्या पद्धतीसंबंधीच मुख्य गोष्टी पुढें दिल्या आहेत. परंतु हे संगीतहि लुप्तप्रायच आहे.
या संगीताची रचना अतिशय प्राचीन कालापासून झाली असल्यामुळें ज्या सप्तकावर याची उभारणी आहे तें शास्त्रशुद्ध असणें फारसें संभवत नाहीं. या संगीतांत अर्वाचीन संगीताप्रमाणें अनेक राग आढळत नाहीत. त्यावरुन सर्व गाणी एकाच रागांत म्हटली जात असावी असे बर्नेलला वाटते. बर्नेलचे म्हणणे आम्हांस पटत नाही. कारण निरनिराळया रागांत गाणे म्हणणे निराळे आणि रागांची जाणीव असणें निराळें. आपल्या इकडील सामाचे ग्रेगरियन किंवा साधे गीत ( प्लेन चांट ) या यूरोपीय चालीशीं बरेच साद्दश्य आहे असें बर्नेलचें मत आहे. तथापि या दोहोंतहि कांही ठिकाणी फरक आहेच.
सामांची स्वरलेखनपद्धति निरनिराळया हस्तलिखितांत भिन्नभिन्न प्रकारची आढळते; आणि एकाच पद्धतीने लिहिलेल्या दोन हस्तलिखित प्रती मिळणें जवळ जवळ अशक्य आहे. कारण या प्रती बहुतेक सामगायक स्वत:च तयार करतात. प्रत्येक जण आपल्याला गायन सुलभ होईल अशा तऱ्हेने कांही नवीन खुणाहि घालतो.
दक्षिणेकडील सामलेखनपद्धतीत आपणाला अशा शेंकडो खुणा आढळतात, व त्या सर्वांचा खुलासा करणें जवळ जवळ अशक्य आहे असे बर्नेलने म्हटलें आहे. तथापि अलीकडच्या पद्धतीत सात स्वरांकरिता १, २, ३, ४, ५, ६ व ७ ( किंवा ~ ) हे आकडे घालतात. या स्वरांची नांवे व क्रम पूर्वी दिलाच आहे. सामवेदाच्या पोथ्यांमध्यें स्वर बरेच उत्तरकालीं शिरले असणार. त्या स्वरांचा अर्थ लावला म्हणजे कुरुयुद्धकालीन संगीत हाती आले असें मुळीच होणार नाही.
मूळ सात स्वरांना प्रकृतिस्वर म्हणतात. यांखेरीज कांहि विकृतिस्वर म्हणून असतात. त्यांमध्ये कांही पुन:पुन्हा येणारे स्वरसमुच्चय अथवा एखाद्या स्वराचें विकृत स्वरुप येते. उदाहरणार्थ ‘प्रेंख’ याने मागील स्वर दोन मात्रा वाढवावयाचा असून त्याचा अंत दुसऱ्या स्वरांत होतो असे समजतात. याचें चिन्ह कांही प्रतींत २ असें असतें व कांही प्रतींत विशेषत: दक्षिणेत ‘प्रे’ असें लिहितात. ‘नमन’म्हणजे मागील अक्षर १, २, ३ या तीन स्वरांत उचारावयाचे. कर्षण याची खूण ^ किंवा v आहे आणि अशा दोन चिन्हांमध्ये जितके आंकडे असतील तितके स्वर अनुक्रमें चढावयाचे किंवा उतरावयाचे असतें. ‘विनत’ याबद्दल ‘वि’किंवा ‘ऽ’चिन्ह वापरतात. याचा अर्थ १, २ हे स्वर असा होतो. ग्रामगेयगानामध्यें जेथे ‘विनत’असतो. तेथे ऊहगानामध्यें ‘प्रेंख’ असतो. आणखी दोन ‘अत्युक्रम’= ४ ५ ६ ५ व ‘संप्रसारण’= २ ३ ४ ५ या विकृती आहेत. यांना अलीकडच्या भाषेंत ताना म्हणतां येईल. अशा तऱ्हेच्या आणखी अनेक पारिभाषिक संज्ञा आहेत. ‘अभिगत’म्हणून एक संज्ञा आहे तिचा अर्थ पूर्वीचाच स्वर त्याच्यामागे एक अ लावून म्हणावयाचा असा आहे; व या संज्ञेबद्दल बिब्लिओथिका इंडिकेच्या प्रतींत ७ हा आंकडा वापरला आहे. म्हणजे हा सातव्या स्वराचा निदर्शक नाही.
सामगीतांमध्ये स्वराची उच्चनीचता व मात्रा या मुख्यत: शब्दावर अवलंबून असतात. एका सामाच्या चालींतच दुसरा मंत्र म्हणावयाचा असल्यास शब्दांचा उच्चार कमी अधिक लांबवून अथवा कांही अक्षरे वगळून किंवा अधिक घालून मात्रा बरोबर करुन घेतात. कधी कधी स्वर ‘दीर्घ’ किंवा ‘वृद्ध’ असतात. म्हणजे अनुक्रमें अधिक वेळपर्यंत लांबवावयाचे असतात, किंवा जोर देऊन उच्चारावयाचे असतात; तेव्हां त्यांच्यावर उत्तरहिंदुस्थानांत ‘र’ हे अक्षर घालण्याची पद्धषत आहे व दक्षिण हिंदुस्थानांत ‘ओ’ हे अक्षर घालतात. जेव्हां कांही आंकडे ओळीने लिहिलेले असतात व त्यांच्या डोक्यावर दुसरे आंकडे असतात तेव्हां ते डोक्यावरचे आंकडे मात्रा अथवा काल दाखवितात. सामामध्ये ज्या उभ्या रेघा मधून मधून असतात त्या एकाच दमांत म्हणावयाचे भाग ( पर्व ) किंवा तुकडे दाखवितात. एका स्वराच्या मात्रा अक्षरांतील स्वरांवर अवलंबून असतात; छन्द: शास्त्राप्रमाणें अक्षराच्या लांबीवर अवलंबून नसतात; ‘चित्र’ या शब्दांतील पहिल्या स्वराची मात्रा लघु अथवा एक आहे. पर्वाच्या शेवटील अक्षराची मात्रा नेहमीं वृद्ध असते.
वेदकालीन किंवा वेदकालानंतरच्या निकटच्या कालाचें संगीत स्पष्ट करण्यासाठी नारदी शिक्षेसारखा ग्रंथ उपयोगांत आणावा किंवा नाही याविषयी मतभेद होईल. तथापि परंपरागत पद्धतीचे स्पष्टीकरण करण्यासाठी परंपरेने मान्य असलेल्या ग्रंथाचा उपयोग केला पाहिजे म्हणूनच केला आहे. रे. पापले यांच्या मतें ( आम्ही त्या मतास मान्यता देत नाही ) नारदी शिक्षा हा ग्रंथ दहाव्या किंवा बाराव्या शतकांत पडेल इतका उत्तरकालीन आहे.
रेव्हरंड पापले यांनी भारतीय संगीतावर जें छोटेखानी पुस्तक लिहिले आहे, ते पुष्कळ प्रकारें चांगले व बहुश्रुत आहे, तथापि जे निरनिराळया ग्रंथाचे काल त्यांनी दिले आहेत, ते प्रचलित पंडितांस मान्य होण्याजोगे नाहीत; आणि त्यांनी आपल्या म्हणण्यास आधारहि दिले नाहीत. रे. पापले यांचा सर्व प्रयत्न सप्तस्वरात्मक भारतीय संगीत पायथ्यागोरसनंतर घालण्याचा असल्यामुळें त्यांचें पुस्तक या बाबतीत विश्वसनीय नाही.