प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ६ वें
यावद्वीप संस्कृति.

ऐतिहासिक माहितीचे तुकडे. - जावानीज बाबद ग्रंथ, चिनी ग्रंथ, शिलालेख, ताम्रपट इत्यादि साधनांनीं आज यवद्वीपाचा इतिहास लिहिला जात आहे. बाबद ग्रंथ जर मनोरंजक कथा आपल्या पुढें ठेवतात, तर त्यांच्या विश्वसनीयतेविषयीं चिनीं ग्रंथ व शिलालेख संशय उत्पन्न करितात. इतिहास आणि काव्य यांची भेसळ ज्याप्रमाणें रामायण व पुराणें यांमध्यें दृष्टीस पडते त्याप्रमाणें बाबद ग्रंथांतहि दृष्टीस पडते. जगदुत्पत्तीविषयक विचार आणि प्राचीन कथा यांचा व खर्‍या इतिहासाचा मेळ बसविण्याविषयीं उदाहरणार्थ राजघराण्यांचा संबंध ब्रह्मदेवाशीं जोडण्याविषयीं धडपडी या बाबद ग्रंथांत दिसतात. बाबद ग्रंथांनीं वर्णलेलीं स्त्रिया मिळविण्याकरितां युद्धें हीं देखील फार प्राचीन कालाच्या इतिहासाची छटा त्या ग्रंथांस देतात.

यवद्वीपांतील प्रबल संस्थान जें मयपहित त्याचा संबंध तुमपेल व केदिरि या संस्थानांशीं, बलिद्वीपाशीं, सुमात्राशीं व आसपासच्या जिंकलेल्या मुलखांशीं तर येतोच, पण चिनी व तार्तार यांसारख्या दूर देशच्या लोकांशींहि येतो. हिंदुस्थानांतील राज्याशीं राजकीय संबंध शोधण्यासाठीं झालेल्या प्रयत्‍नांस अजून यश आलें नाहीं.
मयपहितसंबंधी जावानीज इतिहासग्रंथांत जी माहिती मिळते ती फारच अपूर्ण आणि अविश्वसनीय आहे. ‘परारतन’ नामक ग्रंथांत जी माहिती आहे ती सर्वांत चांगली आहे. हा ग्रंथ डॉ. ब्रँडिस यानें लोकांच्या नजरेस आणला.

एकांत तुमपेल येथील राजांविषयीं माहिती आहे. यावर डॉ. ब्रँडिस यानें ऐतिहासिक भाष्य केलें असून त्यासाठीं त्यानें जावानिज बाबद नामक ग्रंथ, चिनी ग्रंथ आणि जावा येथील प्राचीन शिलालेख इत्यादि साहित्य वापरलें आहे.

परारतन या महत्त्वाच्या ग्रंथांतील मुख्य भाग येथें देतों.

या ग्रंथांत प्रांरभीं मयपहित राजघराण्याचा प्राचीन दंतकथात्मक इतिहास दिला आहे.

या घराण्याचा संस्थापक केन अंगरोक हा होय. ह्या विषयीं माहित असलेल्या कथा येणेंप्रमाणेः-

तुंगल अमेतुंग हा केन अंगरोक याच्या देदीस नामक पत्‍नीला पळवून नेतो-त्याचा मृत्यू कट्यारीनें होईल आणि त्याप्रमाणें त्या मुलांचा आणि नातवंडांचा अंतहि कट्यारीनेंच होईल असें भविष्य-तुंगल अमेतुंग याचा खून-तुंगल अमेतुंग याच्या पासून अनुशपति नामक पुत्रास देदीस ही प्रसवते-अंगरोक राजा होतो-श्रीराजस आणि अमूर्वभूमी हें नांव धारण करतो-तुमपेल देश “दह” (केदिरि) पासून स्वतंत्र होतो. दहविरुद्ध युद्ध-दहनृपतीचा पराभव (शके ११४४). पुढें २७ वर्षें राज्य करून म्हणजे शक ११६९ मध्यें राजा केन अंगरोक हा भविष्याप्रमाणें गुप्‍त कट्यारीनें ठार होतो. त्याची रक्षा कांगे निंगं येथें रक्षिली आहे.

अंगरोक याची उत्पत्ति ब्रह्मदेवापासून वर्णिली आहे. त्याच्यानंतर त्याचा सावत्र मुलगा अनुशपति हा गादीवर आला. पुढील वर्षीं अंगरोकच्या देदीस खेरीज दुसर्‍या एका पत्‍नीपासून झालेल्या रादेन्तोहजय नामक मुलानें त्यास ठार केलें. त्याची रक्षा कीडल येथें रक्षिली आहे. रादेन्तोहजय यास शके ११७१ मध्यें गादी मिळाली पण त्यास फार थोडा काळापर्यंत राज्य करतां आलें. त्यानंतर रंगवूनी यास गादी मिळाली. रंगवूनी हा अंगरोक व देदीस यांचा मुलगा होता, त्यानें विष्णुवर्धन हें नांव धारण केलें.

महिषचंपक रंगवूनीचा मित्र आणि संबंधी यास राज्याचा चालक केलें. भट्टार नरसिंह हें नांव त्यानें धारण केलें. शके ११९४ त रंगवूनी वारला, त्यानंतर कृतनगर (दुसरें नांव भट्टार शिवबुध) हा गादीवर बसला. हा छांदिष्ट आणि निष्काळजी राजा होता. याची कारकीर्द मोठी आणीबाणीची होती. गादीवर बसल्यानंतर थोडक्याच दिवसांत मलयु (म्हणजे सुमात्रा) देशाशीं यानें युद्ध सुरु केलें, आणि यामुळें राज्यरक्षणासाठीं अवश्य असें सैन्य उरलें नाहीं. त्यामुळें दहचा राजा जयकटोंग यास फावलें. त्यानें चीनच्या मंगोलियिन बादशहाशीं देखील युद्धास सुरवात केली. त्याचा सेनापती रादेन (रत्‍न) विजय (महिषचंपकाचा पुत्र) हा होता.

जयकटोंग यानें तुमपेलच्या उत्तरेवर स्वारी केली. त्यास रादेनविजय यानें मोठ्या यशस्वी रीतीनें अडथळा केला, तथापि कृतनगर हा दुसर्‍या एका युद्धांत पडला. रादेनविजय यानें राजाच्या मृत्यूचें वर्तमान ऐकतांच तो घाईनें परत आला आणि एका राजकन्येला सोडविलें. तो पुढें मदुरा येथें गेला आणि तेथें वीरराज (उर्फ बाणकविदे) याच्या आश्रयास राहिला. वीरराज हा त्यांचा शत्रु जो जयकटोंग त्याचा मित्र होता, तथापि वीरराज यानें त्याचें स्वागत केलें, आणि राजकन्येची काळजी घेतली. एवढ्या काळांत म्हणजे शके ११९८ मध्यें जयकटोंग यानें तुमपेल घेतलें. जयकटोंग यानें हें शहर ११९८ मध्येंच घेतलें किंवा नाहीं याबद्दल वाद आहे, आणि यावर डॉ. ब्रँडिस यानें टीपा लिहिल्या आहेत. रादेनविजयास दह येथील राजानेंच ठेवून घेतलें. जयकटोंग यास ट्रिक येथील जमिनी अधिक सुपीक करण्यासाठीं वीरराज यानें सल्ला दिला. मदुरा येथील कांहीं लोक विजय यानें आणले होते. ते भुकेले झाले. त्यांनीं मय नांवाचें फल खाल्लें, तें त्यांनां कडू लागलें आणि त्यामुळें त्या प्रदेशास मयपहित (कडूमय) हें नांव पडलें.