प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ६ वें
यावद्वीप संस्कृति.
वैश्य. - बलिद्वीपांत राजकीय सत्ता वैश्य जातीच्या हातांत बरीच गेली होती. करेंग असेम, बोलेलेंग, मेंगुइ, तबनन आणि बदोंग व लाँबाक येथील राजे वैश्य जातीचे होते. त्यांची संख्याहि क्षत्रियांपेक्षां अधिक आहे. करेंग असेम, बोलेलेंग मेंगुइ, आणि लाँबाक येथील राजघराण्यांची उत्पत्ति पतिः गजमद या वैश्यापासून झालेली आहे. बलिद्वीप विजेता आर्य दमर हा क्षत्रिय असून देव अगुंग याचा सावत्र भाऊ होता. गजमद हा मयपहित येथील दुय्यम सेनापति असून त्यानेंच आर्य दमर यास बलिद्वीप जिंकण्याच्या कामीं मुख्य साहाय्य केलें होतें. तबनन आणि बदोंग येथील राजे आर्य दमर याचेच वंशज होते पण ते आपले केश वैश्यांप्रमाणें राखीत यामुळें त्यांस देव अगुंग यानें वैश्य जातींत टाकलें. सध्या केशरचनेच्या बाबतींत वैश्य व क्षत्रिय यांमध्यें फारसा फरक नाहीं. परंतु वरील गोष्टीस कांहीं तरी राजकीय कारण असावें असा फ्रेडरिकचा तर्क आहे.
दह आणि मयपहित येथील क्षत्रिय महिस, क्बो आणि रंग्ग अशीं उपपदें लावीत हें आपणांस वर दिसून आलेंच आहे. पतिः, देमंग आणि तुमेंग्गुंग हीं उपपदें वैश्यांस लावीत असत. जावामध्यें सर्वांत कनिष्ठ प्रतीच्या राजांस मंत्री असें म्हणत. बलिद्वीपांत मंत्री हा क्षत्रिय किंवा वैश्य यांपैकीं कोणत्याहि जातीचा असूं शकतो. पतिः हें उपपद फार मानाचें द्योतक असे. गजमद हा विष्णूचा अवतार समजला जात असे व त्याला पतिः हें उपपद असे.
दह (केदिरि) दरबारांतील प्रमुख वैश्यांचीं नांवें येणेंप्रमाणें होतीं-मंत्रि बवोंग, कलमुदोंग, तुमेंग्गुंग परुंगसरि, दमंग द्रवलिक, गेबोबबसह, कल लिंगपुंग, वुत विलिस, बुबर बलेमन, जलक कतेंगेंग. या कुलांपासून आणि आर्य दमर याच्या सख्या भावांपासून बरींचशीं वैश्य कुलें बलीमध्यें उत्पन्न झालीं होतीं. परंतु आर्य दमर आणि पतिः गजमद यांच्या वंशजांशिवाय बाकीचे महत्त्वाचे नाहींत व बहुतेक हळूहळू शूद्र बनले आहेत.
इड, देव व गुस्ती हीं अनुक्रमें ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांनां उपपदें लावतात. या जातींची लोकसंख्या बरीच असून त्यांनीं आपलें महत्त्व कायम राखिलें आहे. विशेषतः यांतील शेवटच्या दोन जाती श्रम करून पोटाला मिळविणें हलकें समजतात, व भलतेच हक्क सांगतात. ते प्रजेला अमर्यादपणें लुटतात. वास्तविक उच्च कुलांतील राजे व राजपुत्र असे अत्याचार फारसे करीत नाहींत पण हे लोक त्यांचे नातलग असल्यामुळें त्यांच्या दुष्कृत्यांकडे राजे लोक कानाडोळा करितात. जेथें वैश्य राजे असतात तेथें बहुतकरून गुस्ती व क्षत्रिय राजे असतात तेथें बहुतकरून देव या जातींकडे सर्व अधिकाराच्या जागा असतात. या जागांपासून जरी त्यांनां बराच मान मिळतो तरी वेतन अगदींच थोडें असतें.
बलिद्वीपांत अधिराज, त्याचे मांडलिक (पुंगव), राजकुलांतील इतर पुरुष व नंतर गुस्ती असा क्रम असतो. गुस्ती यांचा दर्जा जवळजवळ पुगवांसारखा असतो. यांनां मरणांत शिक्षा देण्याचा अधिकार असतो. सरंजामी पद्धति चालू असून किरकोळ बाबतींत मांडलिक व अधिराजा हे लक्ष देत नाहींत. पुंगवांच्या वसूलावर व्यापारी, जकात, रस्ते व पूल यांचेसंबंधीं इत्यादि कर असतात. गुस्ती, देव आणि इड यांनां व्यापारावरील कर माफ असातात. मात्र त्यांच्याकडे पाटबंधार्यांचें काम सोंपविलेलें असतें; परंतु त्याबद्दल ते वेगळें उत्पन्न शेतकर्यांपासून काढितात.