प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण १ लें.
इतिहासविषयक प्राचीन कल्पना.

जगाचा इतिहास लिहिण्यास सुरूवात करावयाची ती हिंदुस्थानच्या इतिहासाच्या अनुषंगानें करण्यास हरकत नाही. हिंदुस्थानचा इतिहास लिहावयाचा झाल्यास त्या इतिहासाशीं संलग्न असे अनेक इतिहास येतात. अत्यंत प्राचीन काळचीं राष्ट्रें म्हटली म्हणजे इजिप्त व असुर हीं होत. इजिप्तचा हिंदुस्थानाच्या इतिहासाशीं संबंध बराच अनिश्चित आहे. सेसोस्त्रियस नांवाच्या एका इजिप्तच्या सम्राटानें हिंदुस्थानावर स्वारी केली होती, अशी कांही वर्षांपूर्वी एक समजूत होती; पण ती कल्पना ज्या आधारावर रचली गेली त्या आधाराची विश्वसनीयता फारशी नसल्यामुळें ही समजूत निराधार आहे असें आज इतिहासज्ञ समजतात. असुर संस्कृतीचे ख्रिस्तपूर्व ६००० वर्षापूर्वीचे संस्थापक सुमेरू म्हणून लोक होते. ते भारतीय द्राविड वंशांतील असावेत असें हाल (H.R. Hall. The Ancient History of the Near East) नांवाचा ग्रंथकार म्हणतो. आम्हांस याविषयी आज हालचें मत सांगण्यापलीकडे कांहीं करतां येत नाहीं. द्राविड- सुमेरूकल्पना वगळतां दुसरा संबंध सेमीरामीसमार्फत लावतात, असूर्या देशांच्या सेमीरामीस राणीनें हिंदुस्थानावर स्वारी केली अशीहि एक समजूत होती. ती देखील त्यागिली गेली आहे. इराणचा बादशहा कुरूस (Cyrus) याच्या पदरीं पुष्कळ हिंदू फौजेंत होते, याबद्दल हिरोडोटसच्या वाक्याचा पुरावा आहे. इराणचा कुरूस- नंतरचा एक सम्राट् दर्युस याने हिंदुस्थानचा बराच भाग काबीज केला असावा असें दिसतें. इराणी लोकांनंतरचें महत्वास पावलेलें राष्ट्र ग्रीकांचें होय. त्यांचा हिंदुस्थानाशी संबंध पूर्वीपासून जरी असला तरी शिकंदराच्या स्वारीनें दृढ झाला असें दिसतें. रोमन पातशाहिचा हिंदुस्थानाशीं प्रत्यक्ष संबंध कमी आला तरी हिंदुस्थानांतील कांही राजांचे वकील रोमन दरबारीं होते. यावरून व्यापारी संबंध पूर्वापार असावा असें दिसतें. बुध्दापूर्वीच्या चीन देशाशीं असलेल्या संबंधाचें संशोधन अद्याप झालें नाही. लाउत्सेची “ता ओ” नांवाची विचारोपासनापद्धति उपनिषन्मूलक असावी असें म्हणतात. येणेंप्रमाणें अत्यंत प्राचीन राष्ट्रांच्या इतिहासाशीं हिंदुस्थानचा संबंध सांगतां येईल आणि इजिप्ती, चिनी, आसुरी, इराणी, ग्रीक, रोमन या प्राचीन संस्कृतींचा इतिहास भारतीय इतिहासाच्या विशिष्ट कालाच्या इतिहासाच्या अनुषंगानें विवेचितां येईल, एवढेच नव्हे तर हिंदुस्थानचा यूरोपांतील लोकांशीं जो एकवंशसंभवसंबंध दिसतो त्यामुळें इतिहासाशीं अत्यंत निकट संबंध असलेल्या भाषाशास्त्र, तौलनिक दैवतशास्त्र इत्यादी शास्त्रांशीं ओळख देखील हिंदुस्थानाच्या इतिहासाच्या अनुषंगानें देतां येईल.

जगाच्या इतिहासाशीं परिचय करून देण्यासाठीं हिंदुस्थानाच्या इतिहासाच्या अनुषंगानें सुरूवात करावी हें कित्येकांस बौद्धिक औद्धत्य वाटेल. कां कीं, इतिहासाविषयीं हिंदुस्थानाची अनास्था प्रख्यात आहे. भारतीयांचा इतिहास स्पष्ट करण्यासाठीं परक्यांची मदत घ्यावयाची ही जर पद्धति आहे, तर भारतापासून प्रारंभ करून जगाची ओळख करून देण्याचा प्रयत्‍न आपण कसा करणार? या प्रश्नास उत्तर एवढेंच कीं. जगाच्या अत्यंत प्राचीन इतिहासावर प्रकाश पाडणारा माल म्हणजे अत्यंत प्राचीन भाषा व शब्द हे भारतांत शिल्लक आहेत. त्यांचे निरनिराळ्या काळांतले अवशेषहि शिल्लक आहेत. फक्त या अवशेषांचा पृथ्वीच्या सूर्याभोवतीं होणार्‍या परिभ्रमणाच्या आंकडयांशीं संबंध लावावयाचा, हा इतिहाससंशोधकांचा कर्तव्यभाग आहे.

शिवाय हेंहि लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, इतिहास लिहिण्याची कला भारतीयांस अगदीं अपरिचित होती असें नाहीं. ज्या भावना इतिहासोत्पत्तीस व इतिहासरक्षणास कारणीभूत होतात त्या भावना भारतांत जागृत होत्या.

त्या भावनांचे परिणाम ज्या स्वरूपांत आपणांस दृष्टीस पडतात त्या परिणामांस आपण आज कदाचित् इतिहास म्हणणार नाही. शिलालेखांवरील राजावली व पुराणांतील कथा व कुलपरंपरा यांस आजचे लोक इतिहास म्हणणार नाहींत. तथापि ज्या भावना इतिहासग्रंथांच्या उत्पत्तीस कारण झाल्या त्या याहि कृतींच्या उत्पत्तीस कारण झाल्या. काश्मीरची राजतरंगिणी, सिंहलव्दीपांतील वंसोग्रंथ व आसाम आराकानकडील राजांचे इतिहास, यांसारखे प्रकार पाश्चात्य लोकांस इतिहासासारखे वाटतात; परंतु राष्ट्राच्या ज्या अनेक उलाढाली झाल्या, त्यांचे वर्णन करणारे हे वंसोग्रंथ खास नाहींत. ऋग्वेदांत ज्याप्रमाणें ब्राह्मणांस गाईंचें दान करणार्‍या राजे लोकांच्या जंत्री सांपडतात, त्या जंत्रींस पौराणिक, काल्पनिक, भाकड कथांची जोड दिली असतां जें स्वरूप येईल तें या वंसोग्रंथांचें आहे. पुष्कळ वेळां तर ज्या कथा हिंदुस्थानांतील कित्येक राजांच्या नांवांनी खपत होत्या त्या सिंहलांतील कांहीं राजांच्या नांवांनीं दडपून दिल्या आहेत. आहोम राजांच्या इतिहासाचे आहोमी (आसामी) भाषेंतील ग्रंथ भाषांतरित झालें नाहिंत आणि त्यामुळें त्या ग्रंथांवर विवेचन करतां येत नाही; परंतु पौराणिक ग्रंथांत जे दोष असतील अथवा जे दोष बखरींत आढळतात तेच दोष तेथेंहिं असतील अशी आमची समजूत आहे.

इतिहास  लिहिण्याची मनुष्याची प्रवृत्ति झाली तिचें कारण आपण काय केलें तें लिहून ठेवावें ही मनुष्याची इच्छा होय. या इच्छेमुळें हिंदुस्थानांतील अनेक राजांनीं आपले विजय शिलालेखांत कोरून ठेविले. ते सर्व इतिहास होत. इतिहासावर भारतीयांची आस्था नव्हती असें नाहीं. तथापि इतिहास या स्वरूपाचें वाङ्‌मय भारतांत फारसें वाढलें नाहीं, हें मात्र कबूल केलें पाहिजे. याचें मुख्य कारण राष्ट्राची इतिहासविषयक अनास्था होती असें नाहीं. वेदरक्षण झालें तें वाङ्‌मयरक्षणाच्या हेतूमुळें झालें असें मुळींच नाही तर प्राचीन ऋचांचा यज्ञाकडे उपयोग करण्यांत येई, यज्ञ करण्यासाठीं तें ज्ञान शिकावें लागे, अशी परिस्थिति असल्यामुळें त्या ग्रंथांचें जतन तरी झालें. भाटांचा जो वर्ग होता त्यानें राजस्थानाच्या बर्‍याच इतिहासाचें जतन केंलें. तथापि भाट हे वाङ्‌मयाचे कर्ते होते. काव्यें करणें हे त्यांचे कार्य असून इतिहासरक्षण करणें हें त्यांचें कार्य नव्हतें. त्यांचें कार्य लोकरंजन किंवा दात्याचें रंजन करण्याचें होतें. आपणांस या प्रवृत्तीमुळें थोडासा इतिहास उपलब्ध झाला आहे. करमणूक हा जेव्हां उद्देश असतो तेव्हां इतिहास हा चांगला काळजीपूर्वक रक्षिला जातो असें नाहीं जी कथानकें मनोरंजक असतात त्यांस प्राधान्य दिलें जातें. जो मोठा दिग्विजयी योध्दा असेल त्याच्या चरित्रापेक्षां ज्याच्या प्रेमविषयासंबंधानें लोकांनां अधिक मौज वाटेल त्याचेंच चरित्र रक्षिलें जातें. श्रोत्यांवर परिणाम घडवावयाचा असतो तेव्हां साध्या वर्णनापेक्षां तिखट-मीठ लाविलेलें वर्णन लोकांस सहजच अधिक आवडणार. लोकरंजनास जेव्हां प्राधान्य दिलें जातें तेंव्हां व्यक्तीचें ऐतिहासिक महत्व आणि सत्य या दोन्ही तत्वांची राखरांगोळी होते. बाजीरावाच्या मोठमोठ्या लढायांपेक्षां सामान्य लोकांस त्याच्या मस्तानीचें नांव अधिक परिचित आहे. हिंदुस्थानांत इतिहासरक्षणाचे प्रयत्न आपणांस वारंवार दृष्टीस पडतात. पण ते प्रयत्न लोकरंजन- प्रयत्नांत किंवा विशिष्ट उपासनेचा किंवा तत्वाचा पुढाकार करण्याच्या प्रयत्नांत विलीन झालेले दृष्टीस पडतात.

प्रत्येक इतिहासग्रंथामध्यें खोटें लिहिण्याची इच्छा लेखकास जास्त असते आणि पुष्कळदां खोटें लहिण्याकरितांच इतिहास जन्मास येतात. जगाची ऐतिहासिक भावना किंवा इतिहास महत्वाची जाणीव सत्य लिहिण्याच्या प्रयत्नावरून जशी दिसून येणार आहे तशीच खोटें लिहिण्याच्या प्रयत्नावरूनहिं दिसून येणार आहे. जो खोटें लिहून ठेवितो तो भावी वाचकांस फसविण्याच्या उद्देशाने लिहून ठेवितो आणि त्यास इतिहासमहत्व असल्याशिवाय तो खोटें लिहिण्याचे परिश्रम करील असें संभवत नाहीं. प्रत्येक इतिहासग्रंथांमध्यें कांहीं तरी खोटें अगर पक्षाभिमानानें अर्धेमुर्धे खरें लिहिणें दृष्टीस पडतेंच. तर जो ग्रंथ अगोदरच काव्य आहे त्यावर वैय्यक्तिक इच्छेनें किंवा आकांक्षेनें परिणाम होऊन त्याचें स्वरूप विकृत होतें हे आपल्या रामायण महाभारतादि ग्रंथांवरून व पुराणांवरून स्पष्ट होतें. खोट्या व लपंडावीच्या विधानांवरून खोटेपणाचीं व लपंडावीचीं कारणें शोधिलीं असतां आजच्या संशोधकांस इतिहास अधिक खुला होतो. त्याप्रमाणेंच आपल्या देशांतील सर्व प्रकारचे ग्रंथ घेऊन आपणांस इतिहास खुला करावा लागेल.

ग्रीकांचा प्रख्यात इतिहासकार हिरोडोटस याचें स्तोम बरेंच माजविलेलें आपणांस दृष्टीस पडतें.  त्यास सत्यवक्ता म्हणणारे लोक आंधळे आहेत असें वाटावयास लागतें हिरोडोटसचा ऐतिहासिक प्रामाणिकपणा देखील वर्णिला जातो. आज आपण हिरोडोटसचा ग्रंथ वाचूं लागलों म्हणजे कर्णोपकर्णी ऐकलेल्या किती तरी गोष्टी त्यानें लिहून ठेविलेल्या दृष्टीस पडतात. शिवाय लोकरंजन हा हेतु त्याच्या ग्रंथांत प्राधान्याने दृष्टीस पडतो. त्याच्या इतिहासांत कादंबरीवजा अनेक गोष्टी त्यानें भरल्या आहेत असें दिसून येतें. जिज्ञासूस ज्ञान देण्याच्या करामतीपेक्षां टवाळ व चावट गोष्टींचे शोकी असे जे गृहस्थ आहेत त्यांनां खूष करण्याच्या करामतींवर त्याच्या ग्रंथाची लोकप्रियता रचली गेली असावी आणि त्यानेंहि लोकप्रियताच मिळविण्यासाठीं खटपट केली असावी असें ग्रंथ वाचतांना वाटतें. असें वाटण्यास एकच कारण देतो. हिरोडोटसने हिंदुस्थानांतील लोकांसंबंधाने ते मनुष्यभक्षक आहेत अशी आपली समजूत व्यक्त केली आहे (Herodotus III-99). त्यास सत्य जाणण्याची संधि होती, तथापि जी गोष्ट मनोरंजक आहे, तिच्यांतील सत्य शोधून तिचा मनोरंजकपणा कशास घालवावा या भावनेनें तरी त्यानें सत्य शोधलें नसावें किंवा मुद्दाम असत्य प्रस्तृत करण्याची त्याची इच्छा असावी असें दिसतें. हिरोडोटसचा ग्रंथ इतिहास या दृष्टीने पुन्हांमांडणी करण्यास अवश्य असा आहे. हिरोडोटसची इतिहासविषयक कल्पना फारशी उज्ज्वल दिसत नाहीं. आणि वाङ्‌मय या दृष्टीनें देखील हा ग्रंथ अव्यवस्थित दिसतो. तो ऐतिहासिक टीपांनी युक्त व थोड्याबहुत चावट गोष्टींनीं लोकप्रिय झालेलें असें प्रवासवर्णन होय असें आम्ही म्हणूं.

इतिहास लिहितांना ज्या काहीं क्रिया होतात त्यांकडे आपण थोडेंसें लक्ष देऊं.
(१)    माहिती जमा करणें.
(२)    वृत्तांचे महत्वमापन करणें.
(३)    माहितीच्या अभावाच्या प्रसंगीं माहीत असलेल्या गोष्टीवरून संयोजक कल्पना करणें.
(४)    लेखनीय माहितीची व्यापकता नियमित करणें.
(५)    जगाच्या किंवा राष्ट्राच्या विकासक्रमाविषयीं सिध्दांत करणें.

या क्रियांपैकीं प्रत्येक क्रिया प्राचीन वाङ्‌मयांत झालेली दिसते. रामायण, महाभारत व पुराणें यांत जुनी माहिती जमा करून ठेवल्याचे पुरावे वारंवार दिसतात.

इतिहास कसा लिहावा यासंबंधानें विचार नेहमीं बदलत असतात. कालची स्थिति आज समजावी हें सर्वांसच वाटतें. पण कालच्या कोणत्या गोष्टीस महत्व द्यावयाचे यासंबंधाने कल्पना असेल तर इतिहास लिहिण्यास दिशा मिळेल. वृत्तांच्या महत्वासंबंधानें प्राचीनांची जी बुद्धि असेल ती अवगमिली पाहिजे. “कार्यमहत्वविवेचकता” हा इतिहासकाराचा अवश्य गुण तो प्राचीनांत होता काय हें आपणांस पाहिलें पाहिजे. हा गुण त्यांत होता असें केवळ पुराणाच्या व्याख्येवरून दिसतें.

प्राचीनांची इतिहास-विषयक कल्पना आणि पुराण-विषयक कल्पना आज आपणांस जाणणें अवश्य आहे. पुराण म्हणजे फार जुना इतिहास. प्राचीन पुराणांची व्याख्या येणेंप्रमाणें आहे.

सर्गश्र्च प्रतिसर्गश्र्च वंशो मन्वन्तराणि च |
वंशानुचरितं चेति पुराणं पंचलक्षणम् ||

पंचमहाभूतात्मक जगाची उत्पत्ति कशी झाली, मूलभूततत्वां-पासून इतर चराचर कसें निर्माण झालें, निरनिराळें वंश कोणते झाले, त्यांच्या कामगिर्‍या काय झाल्या, कालाचे अत्यंत मोठे विभाग म्हणजे जीं मन्वन्तरें, त्या निरनिराळ्या मन्वन्तरांत कोणकोणत्या गोष्टी होऊन गेल्या, या सर्वांची माहिती पुराणांत दिली पाहिजे अशी प्राचीनांची भावना होती. अत्यंत जुन्या गोष्टींची माहिती फारशी कालानुक्रमाने सांगतां येत नाहीं आणि त्या गोष्टींतील महत्वाच्या गोष्टी केवळ जुन्या म्हणून विशेष कालविषयक चर्चा केल्याशिवाय उतरून घेणें व ग्रंथीं समाविष्ट करणें याशिवाय दुसरा कोणताहि पक्ष ग्रंथकारांस उरत नाहीं. असें असल्यामुळें पुष्कळशा प्राचीन कथा कालानुक्रमानें मांडणीशिवाय व कालविषयक विधान केल्याशिवाय पुराणांत ग्रथित केलेल्या दिसतात.

इतिहासाचा एक हेतु असा असतो कीं, आज लोकांनां जें दिसत आहे त्याची उत्पत्ति अगर विकास सांगून ते स्पष्ट करावें. या हेतूचा इतिहास हा एक शक्य परिणाम आहे तथापि तो एकच नाहीं. या हेतूमुळें जे वाङ्‌मय उत्पन्न होतें तें केवळ  इतिहासरूपी होत नाही. जेंव्हां एखाद्या गोष्टीची आपणास साधार माहिती नसेल किंवा ती माहिती उपलब्ध होण्याजोगी नसेल तेव्हां पुढील प्रश्न सोडविण्यासाठीं मनुष्य कल्पना लढवूं लागतो. विश्व उत्पन्न कसें झालें? जाती उत्पन्न कशा झाल्या? राष्ट्रें उत्पन्न कशीं झालीं? इत्यादि जाडे प्रश्न एखाद्या काळच्या जाणते म्हणून समजल्या जाणार्‍या लोकांना साहित्य असो अगर नसो सोडविणे भाग पडतें, आणि ते त्यांस उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणें कल्पना करूं लागतात. या कल्पनांचें परिक्षण न होतां शेंकडों वर्षें त्या कल्पना लोकांस पढविल्या म्हणजे त्यांवर लोकांची इतकी श्रंध्दा बसूं लागते कीं, त्या कल्पनांवर विश्वास न ठेवणारा मनुष्य लोकांस नास्तिक अगर पाखंडी वाटावयास लागतो. पुष्कळ वेळां त्या कल्पनांनीं एखादा काल्पनिक इतिहासहि तयार होऊं लागतो. या तर्‍हेचा “इतिहास” आपल्या पुराणांतून व रामायणमहाभारतादि आर्ष काव्यांतून आणि त्याप्रमाणेंच वेदांतील अर्थवादांतून पुष्कळ दृष्टीस पडतो. भारतीयांस इतिहासाविषयीं अनास्था असलेले लोक म्हणून शिक्का मिळाला आहे आणि यांत तथ्थहि पुष्कळ आहे; पण याबरोबर हेंहि लक्षांत ठेवलें पाहिजे की, प्राचीनांस इतिहासजिज्ञासा होती व ज्या गोष्टीचा इतिहास ठाऊक नाहीं तो ज्ञानाचा खळगा विचार करून आणि तत्वज्ञान लावून भरून काढणें ही क्रिया ते करित होते. पुष्कळदां ही क्रिया करतांना केवळ काव्यरूपी कल्पनाच उत्पन्न होत. काव्यरूपीच त्यांची कल्पना होई ही गोष्ट प्राचीन भारतीयांच्या विरूद्द मांडतां येईल पण याबरोबर हेंहि लक्षांत ठेवलें पाहिजे कीं, माहितीचा अभाव निव्वळ कल्पनेनें भरून काढणारे लोक भारतीयांतच केवळ नाहींत तर ते चोहोंकडे आहेत. प्रत्येक राष्ट्र आडामपासून किंवा त्याच्या वंशांतील एखाद्या पुरूषापासून झालें आहे अशा समजुतींनीं ग्रीकांचे, अरबांचे व मुसुलमानांचे इतिहास यथास्थित भरलेले दिसतात, बौद्ध ग्रंथकारांनीं देखील असल्या कथांचे चांगलें यथास्थित ग्रहण केलेले दिसतें. येथें हेहि सांगितले पाहिजे कीं जेथें माहिती नसेल तेथें इतिहासकारानें वस्तुस्थिति कशी असावी यासंबंधानें कल्पना करणें ही क्रिया आजच्या शास्त्रीय पद्धतीनेहि इतिहासलेखनाचें अंग आहेच. फरक हा कीं आजचा इतिहासलेखक कल्पनेस कल्पनाच म्हणून पुढें मांडील. प्राचीन पुराणकार तसें करीत नसत.

इतिहासाचें क्षेत्र काय व त्याचें इतर ज्ञानक्षेत्रापासून पृथ करण कसें करावें हें आजहि निश्चितपणें ठरलें नाही. लोकांच्या इतर ज्ञानावर क्रियांच्या महत्वाचें ज्ञान अवलंबून असणार आणि त्यावर लेखन अवलंबून असणार. जगांत झालेल्या सर्व प्रकारच्या घडामोडी या इतिहासाचा विषय होत. इतिहास या विषयाचें स्वरूप दिवसानुदिवस अधिकाधिक विकसित होऊं लागलें आहे. इतिहास या शब्दाचा म्हणजे इति+ह+आस या शब्दसमुच्चयाचा मूळ अर्थ ‘असें झालें’ असा आहे. ग्रीक लोकांमध्यें हिस्टोरिया हा शब्द प्रथम जन्मास आला आणि त्याचा अर्थ शोध किंवा माहिती असा होता. ज्ञानाचें वर्गीकरण करूं इच्छिणारे लोक इतिहास हें शास्त्र आहे किंवा नाहीं याची बरीच पंचाईत करतात. ते म्हणतात की, इतिहास हे शास्त्रच नव्हे. कोणी म्हणतात, मनुष्य हा एक प्राणी आहे, तेव्हां मनुष्याच्या जगावरील क्रिया हा एकंदर प्राणिशास्त्राचा विषय होईल. कित्येक असें म्हणतात की, इतिहास हें जगांतील एकच शास्त्र होय. इतर शास्त्रें म्हणजे मनुष्यप्राण्याचें ज्ञान या सदराखाली इतिहास या शास्त्रांत सर्व कांहीं समाविष्ट करतां येईल. कारण कोणासहि वास्तविक ज्ञान होतच नाहीं. वस्तूंचें इंद्रियगोचर स्वरूप व त्यावर रचलेलीं अनुमानें तेवढीं मनुष्यास ठाऊक आहेत तेव्हां शास्त्रीय ज्ञान हा केवळ मनुष्येतिहासाचा भाग होय.

मनुष्याचा ऐतिहासिक घडामोडींवर विचार होऊं लागतो आणि त्याचे जगाच्या क्रमाविषयीं सिध्दांत बनूं लागतात. ही क्रिया देखील आपल्या वाङ्‌मयांत दृष्टीस पडते, ‘फिलॉसफी ऑफ हिस्टरी’ म्हणून एक अभ्यासक्षेत्र यूरोपांत दृष्टीस पडते त्यावर पुष्कळ ग्रंथ निर्माण झाले आहेत. त्या ग्रंथाचे विषय साधारणपणें खालील प्रकारचे दृष्टीस पडतात.
जगांतील अनेक घडामोडी पाहुन त्यांतून कांहीं ईश्वरी संकेत दृष्टीस पडतो काय हें पाहावयाचें आणि त्यांतून ईश्वराचे हेतू ओळखावयाचे. समाजाचा क्रम पाहून त्यांतून ईश्वराचे हेतू व नियम ओळखून आपला ईश्वराविषयींचा भाव दृढ करावा या इच्छेने कित्येक ग्रंथकार प्रवृत्त झाले आहेत.