प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)
प्रकरण ५ वें.
असुरकलीन आशियांतील राष्ट्रें व संस्कृती.
अमर्ना काल. - ज्या बलाढ्य राष्ट्रांच्या इतिहासाशीं व संस्कृतीशीं पॅलेस्टाइन बरींच शेतकें निगडित झाला होता त्यापैकीं कोणाहि राष्ट्रानें अद्यापपर्यंत त्या प्रांतास पूर्णपणें आत्मसात् करून घेतलें नव्हतें. ह्या अमर्ना कालांत वरील छोट्या राजांनीं इजिप्शियन राजकीय कारवानांचे व्यापाराचे रस्ते सुरक्षित राखणें, खंडणी देणें, सार्वभौम सत्तेविरुद्ध कट न करणें व सामान्यपणें सार्वभौमसत्ता व तिचे प्रतिनिधी यांची बाजू उचलून धरणें इत्यादि गोष्टी सांभाळल्या म्हणजे त्यास एक प्रकारचें स्वातंत्र्यच असे. एकंदर प्रदेशावर बाबिलोनियन संस्कृतीनें जरी बरेच दृढ परिणाम घडविले असले तरी जमिनींतून सांपडलेल्या अवशेषांमध्यें ह्या संस्कृतीच्या अगदीं फारच थोडया विशिष्ट खुणा दिसून येतात. कीलाकृति शिलालेखांचा अभ्यास केला असतां त्यांतील पॅलेस्टिनियन अक्षरांवरून असें दिसतें कीं, तद्देशियांची मूळ भाषा अगदीं प्राचीन व्यक्तिनामांप्रमाणें मागाहून प्रचलित झालेल्या 'कॅनेनाइट' (हिब्रू, मोबाइट व फिनिशियन) या भाषांसारखीच असावी. पॅलेस्टाइन, मिटनी व हिटाइट यांचे परस्पर संबंध विचारांत घेतां हें उघड दिसतें कीं, बाबिलोनियन संस्कृतीचे ह्या देशावरील परिणाम अप्रत्यक्ष रीतीनें झालेले असावेत आणि जोपर्यंत खऱ्या बाबिलोनियन गोष्टींचा निर्णय झाला नाहीं तोंपर्यंत केवळ सादृश्यावरून कसल्याहि तऱ्हेचीं अनुमानें काढणें गैर होईल. वरिष्ठ सत्तेचा शासित लोकांच्या संस्कृतीवर कांहीच परिणाम होत नाहीं हें म्हणणें अर्थातच प्रशस्त होणार नाहीं. परंतु इतिहासावरून असें ठरलें आहे कीं, अशा तर्हेचा परिणाम होणें त्या दोन समाजांतील बाह्य व आंतर सादृश्यावर अवलंबून असतें आणि हा परिणाम नेहमीं दृढ किंवा टिकाऊच होईल असें म्हणतां येत नाहीं. इजिप्तची परिस्थिति तर वरील सिद्धांतास जास्तच अनुकूल आहे; तथापि इजिप्तच्या वसाहतींचें अस्तित्व इजिप्तमधील उपासनासंप्रदाय, इजिप्तच्या धर्तीचीं देवालयें व मूर्ती यांची स्थापना हे व अशासारखे परस्पर संबंधदर्शक दुसरे जमिनींतून सांपडलेले अवशेष इत्यादि गोष्टी लक्षांत घेतां देखील, पॅलेस्टाइन प्रांताचीं संस्कृति इजिप्तमधील म्हणण्यापेक्षां आशियामधील म्हणणेंच अधिक संयुक्तिक होईल. आशियामधील संस्कृतीचा परिणाम इजिप्तला सुद्धां हिक्सॉस कालापासून व पुढें पुढें अठराव्या व त्या पुढील राजघराण्यांच्या अमलांत जास्तच जाणवूं लागला होता, व सीरिया पॅलेस्टाइनमधील प्रसिद्ध देवतांनां (रेशेफ्, बाल्, अॅनथ्, विब्लोसचा बॅलथ्, कडेश्, अॅस्टर्ट्.) बरेंच महत्त्व प्राप्त झालें. सामान्यत: त्यावेळच्या संस्कृतीचा व विचारविकासाचा मूलभूत पाया एकच असून, त्यामध्यें परिस्थित्यनुरूप स्थानिक, जातिविशिष्ट अगर राष्ट्रीय वाढीमध्यें काय फरक पडतो तेवढाच. कारण एकंदर सेमेटिक ग्रंथांतील पारमार्थिक कल्पनांचें इजिप्तमधील पारमार्थिक कल्पनांशीं बरेंच साम्य आहे. आणि बऱ्याच शतकांचा इतिहास दाखविणारे इजिप्तमधील किंवा कीलाकृति शिलालेख व इतर विशेष पुरावा म्हणजे अमर्ना कागदपत्रें, आर्मिनियांतील कॅनानाइट शिलालेख, जुना करार व त्यानंतरचें यहुदी वाङ्मय इत्यादीमध्यें अशाच तऱ्हेची त्या भूभागांतील आचारविचारविषयक सांप्रतच्या परिस्थितीपर्यंत तुलना केली तर पुष्कळच नवीन नवीन माहिती मिळेल व त्यावरून पुढील तीन गोष्टींबद्दलच्या अनुमानास बरीच बळकटी येईल.
(अ) धार्मिक, सामाजिक व राजकीय जीवनक्रमांतील चिरकालिन दृढ संबंध.
(आ) प्रचलित असलेल्या सर्वसामान्य धार्मिक समजुती व त्यांची कांहीं एक विशिष्ट तऱ्हेनें झालेली वाढ ह्यामधील भेद.
(इ) इतिहासदृष्ट्या ह्या विशिष्ट वाढीतील फेरबदल अगर स्थित्यंतरें.