प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)

प्रकरण १ लें
पश्चिमेकडील प्राचीन संस्कृतीचें स्थूल विवेचन

भारतीय व पाश्चात्य प्राचीन संस्कृतींचा परस्परसंबंध - भारतीय इतिहासाच्या अवगमनासाठीं प्रत्येक कालाचें विवेचन करतांना सर्व जगाकडे नजर फेंकली पाहिजे. ज्या प्राचीनकाळी आपल्या देशांत सुव्यवस्थित राज्यें होतीं आणि त्यांचे अस्तित्त्व दाखविणारें आणि प्रौढ विचार व्यक्त करणारें वाङ्मयहि होतें, त्या काळीं आज प्रगमनशील समजला जाणारा जगाचा म्हणजे यूरोपचा भाग सुधारणेच्या दृष्टीनें अत्यंत बाल्यावस्थेंत होता. त्या प्राचीन काळीं कांही राष्ट्रें सुसंस्कृत झाली होतीं, नव्हतीं असें नाहीं. पण ती राष्ट्रें आज नामशेष झाली आहेत. आणि चीन खेरीजकरून इतरांच्या संस्कृतीचें सातत्य नष्ट झालें आहे. भारतीय संस्कृतीचा चार हजार वर्षांचा इतिहास आपणास बराचसा सातत्यानें लिहितां येतो, पण तो इतिहास जगाच्या इतर इतिहासाशीं सापेक्षतेनें लिहावयाचा झाल्यास आज या संस्कृतीशीं व राष्ट्राशीं तर उद्या त्या संस्कृतींशी व राष्ट्रांशीं संबंध येतो.  पृथु, पर्शु, शक, मग,असुर, यवन इत्यादि राष्ट्रांचा उल्लेख आपल्या ग्रंथांत वारंवार येतो तेव्हां त्या राष्ट्रांच्या समकालीन प्रदेशव्याप्तीचें आणि संस्कृतीचें सामान्य ज्ञान तरी आपणांस पाहिजे. असुरांची भौतिक संस्कृति आपणांपेक्षां अधिक पाहून भारतीयांनीं असुरांच्या संपत्तीशीं भुताटकीचा संबंध जोडला, इत्यादि प्रकार आपण पौराणिक ग्रंथावरूंन पाहतोंच तर असुरांची स्थिति काय होती? हे असुर कोण होते? हें आपणांस समजलें पाहिजें. भारतीय संस्कृतीचा बराचसा विकास होऊन ती संस्कृति जगज्जेती होण्याच्या मार्गास लागली तेव्हांपासून इतर संस्कृतीशीं झालेली युद्धें व त्या युद्धानंतर उरलेले भारतीय संस्कृतीचे अवशेष या गोष्टी प्रस्तावनाखंडाच्या पहिल्या भागांत वर्णन केल्या आहेत. दुसऱ्या विभागांत व तिसऱ्या विभागाच्या पूर्वभागांत भारतीय संस्कृतिघटना दाखविली आहे. भारतीय संस्कृतीच्या आरंभकालीं जो जगाचा इतिहास भारतीय इतिहासाच्या दृष्टीनें विचारणीय आहे, तिकडे त्यावेळी लक्ष देतां आलें नाहीं. आता जगाच्या अत्यंत प्राचीन संस्कृतींकडे आणि त्यांशी भारतीयांच्या संबंधांकडे वळूं. आणि वेदकाळाच्या सुमारास भारताबाहेरील जगानें संस्कृतिसंवर्धनाच्या प्रयत्नांत काय यश मिळविलें तें पाहूं.