प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)
प्रकरण ४ थें.
असुरी बाबिलोनी संस्कृति.
बाबिलोनियाचा इतिहास देण्यापूर्वी सुमारें ख्रि. पू. १५०० या सुमाराचे कोणकोणते प्राचीन प्रांत आजच्या किंवा कालच्या आशियांतील तुर्कस्थानामध्यें मोडतात याचा विचार करूं. कारण असुरी बाबिलोनी व त्यांचे प्रतिस्पर्धी लोक याच प्रदेशांत रहात होते. लिडिया, मायसिया, कारिया, लिसिया, हे प्रांत ग्रीसच्या अगदीं तोंडाशींच आहेत. हिटाइट लोकांचें राज्य स्मर्नाच्या पूर्वेस पण काळ्या समुद्राच्या दक्षिणेस आहे. सुमेर हा प्रांत युफ्रेटिस नदीच्या मुखाशीं आहे आणि त्याच्यामध्यें व हिटाइट मुलुखामध्यें परंतु तैग्रिस व युफ्रेटिस यांच्या दुआबांत अनुक्रमानें अक्कड व असुर हीं शहरें आहेत. पॅलेस्टाइन, फिनिशिया हे आज जेथें सिरिया आहे त्याचे भाग होत. आर्मेनिया हिटाइटच्या पूर्वेकडे पण असुरांच्या प्रदेशाच्या उत्तरेस आहे. हिटाइटच्या प्रदेशासच पुढें कॅपॅडोशिया नांव पडलें आणि आसुरिया, बाबिलोन, अक्कड या विस्तीर्ण प्रदेशास पुढें मेसापोटेमिया नांव पडलें. असुर व बाबिलोन यांची संस्कृति व राज्यें युफ्रेटिसच्या कांठीं होतीं. फिनिशिअन यांची भूमध्यसमुद्राच्या पूर्व किनार्यावर व्यापार करणारी वस्ती होती. हिटाइट यांनीं आशियामायनरचा पूर्वभाग व्यापला होता आणि लिडियामधील (मायसिया, लिसिया, कारिया व बिथनिया धरून) ग्रीक इजिअन समुद्राच्या आसपासच्या इतर लोकाशीं संबंध ठेवून मोठा उच्च संस्कृतीचा आयुष्यक्रम आचरित होते. परंतु आर्मेनियापासून पूर्वेकडे म्हणजे आज जेथें इराण आहे तेथील लोकांविषयीं निश्चयपूर्वक माहिती आपणांस देतां येत नाहीं.