विभाग विसावा : वऱ्हाड - साचिन

वल संस्थान:- मुंबई, काठेवाड पोलि. एजन्सीमधील एक संस्थान. क्षेत्रफळ १०९ चौरस मैल आणि लोकसंख्या (१९०१) १३२८५. खेडयांची संख्या ४० असून काळींचें उत्पन्न १९०३-०४ सालीं २ लक्ष रु. होतें. काठेवाडमध्यें वल संस्थान तिस-या नंबरचें आहे. याचें पुरातन नांव वल्लभीपूर आहे. वल्लभीपूरचें राज्य लयाला गेल्यावर पाटणच्या मूळराजानें वल्लभीपूरच्या अस्ताव्यस्त झालेल्या लोकांनां घोघोपर्यंत हद्दपार करुन आपला अंमल बसविला. नंतर मुसुलमानांनीं स्वारी करुन गुजराथ घेतली, त्यावेळेस 'वल' लोक मुसुलमानी सत्तेखालीं आले. औरंगझेब मरण पावल्यानंतर भावनगर संस्थानाचा मूळ पुरुष भावसिंगजी यानें वल व त्याच्या आसपासचीं दोन खेडीं विसोजीला दिलीं. १७७४ सालीं विसोजी मरण पावला. त्यानंतर त्याचा नातू मेघभाई गादीवर आला. संस्थानिकांनां ठाकूर अशी संज्ञा आहे. वलगांव संस्थानची राजधानी आहे. हें भावनगरपासून २२ मैलांवर आहे. लोकसंख्या ५०००. गुप्तराजांच्या सेनापतीनें हें वसविलें असें म्हणतात. वल्लभीपूरच्या पूर्वी पट्टणसोमनाथची राजधानी वामनस्थली होती. येथें प्राचीन इमारतीचें अवशेष अद्याप आढळतात. अजून जुनीं नाणीं, ताम्रपट, मुद्रा, मूर्ती वगैरे वलच्या आसपास सांपडतात.