प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १ लें.
उपोद्धात-जगांतील स्पर्धा.
हिंदुस्थानाचें स्थूल स्वरूप :— हिंदुस्थानविषयीं विचार करतांना हिंदुस्थानाला देश म्हणण्यापेक्षां स्वतंत्र खंड म्हणणेंच अधिक योग्य होय. आज जरी तो आशिया खंडाचा भाग आहे, तरी भूस्तरशास्त्रांतील कालमापनपद्धतीप्रमाणें पाहतां हा हिंदुस्थान व आशिया यांचा अवयव-अवयवीसंबंध अलिकडला आहे. भूस्तरशास्त्रज्ञांचें मत असें आहे कीं हिमालयपर्वताचे ठिकणीं पूर्वीं एक मोठा समुद्र होता; व हिंदुस्थानचा दक्षिणभाग मादागास्करपासून मलायाबेटापर्यंत पसरलेल्या मोठ्या भूप्रदेशाशीं जोडलेला होता. हल्लींहि हिमालयपर्वतामुळें हिंदुस्थान आशियाखंडापासून अगदीं पृथक् झालेला आहे. यांशिवाय हिंदुस्थानाला स्वतंत्र खंड असें मानण्यात अनेक कारणें आहेत. आकारानें हिंदुस्थान रशियावर्जित युरोपखंडाएवढा आहे. लोकसंख्या सर्व पृथ्वीवरील लोकसंख्येच्या पंचमांश आहे हें सांगितलेंच आहे. जमीन, हवापाणी वगैरे भौतिक स्थिति व मनुष्यजाति या बाबतींत इतकी विविधता आहे कीं, हिंदुस्थानाला भिन्न देशाचा समुदाय किंवा खंड म्हणणेंच योग्य दिसतें. उत्तरेकडील सर्वोच्च हिमालयपर्वत व त्याच्या पायथ्यावरील गहनदाट अरण्यें, मध्यवर्ती वालुकामय अफाट प्रदेश, दक्षिणेकडील सह्याद्री, निलगिरी इत्यादि पर्वत, सिंधुगंगायमुनादि महानद्या या सर्वांनीं मिळून होणारा भौगोलिक असामान्य देखावा कोणाहि प्रवाशाच्या सहज लक्षांत भरण्यासारखा आहे.
भूस्तरशास्त्रदृष्ट्या परस्परविरोधी गोष्टींनीं हिंदुस्थानदेश भरलेला आहे. हीच गोष्ट त्यास एक देश म्हणण्यापेक्षां ही एक स्वतंत्र सृष्टीच आहे अशी भावना उत्पन्न करिते. हिंदुस्थानच्या केवळ अधोभागासारखें असलेलें द्वीपकल्प जगांतील अत्यंत जुन्या भूभागापैकीं आहे, उलट जगांत उच्चतेंत श्रेष्ठ असलेला आणि उत्तरहिंदुस्थान जरी प्रलयानें बुडून गेलें तरी आपलीं शिखरें उंच राखणारा हिमालय पर्वत मात्र अगदीं अलीकडे उत्पन्न झालेला आहे. पृथ्वीच्या इतिहासांतील निरनिराळ्या युगांच्या दर्शक गोष्टी हिंदुस्थानांत सांपडतात. जमिनीचे अनेक भिन्न प्रकार येथें आहेतच; आणि युरोपांतल्यापेक्षां कितीतरी अधिक जातींचे प्राणी येथें आहेत. हवामानांतहि ठिकठकाणीं फार भिन्नता आहे. उत्तरहिंदुस्थानांत कांहीं ठिकाणीं शीतोष्णतामान आत्यन्तिकेला जातें, म्हणजे हिंवाळ्यांत पारा शून्यांशाच्या बराच खालीं जातो, तर उन्हळ्यांत उष्णतामान १२० अंशांपर्यंत वाढतें.
पर्जन्यवृष्टीसंबंधींहि विविधता अशीच विलक्षण आहे, कांहीं ठिकाणीं पाऊस ३०० इंचांपेक्षांहि अधिक पडतो, तर कोठेंकोठं तो पांच इंचहि पुरा पडत नाहीं.
लोकांच्या बाह्यस्वरूपाकडेच लक्ष देतां भिन्नभिन्न प्रकारचे लोक हिंदुस्थानांतल्याप्रमाणें इतरत्र कोठेंहि आढळत नाहींत. परकी मनुष्याला सर्व चिनी लोक बहुतेक सारखेच दिसतात, पण हिंदुस्थानच्या रहिवाशांतील परस्परांतला विलक्षण फरक कोणाच्याहि ताबडतोब लक्षांत येतो. गुरखे, पठाण, जाट, रजपूत, नाग, या प्रकारें लोकांत शारीरिक भेद असून शिवाय तामील, तेलंगी व कानडी यांसारखे पोटभेद युरोपातींल इंग्रज, फ्रेंच, जर्मन यांच्याप्रमाणें आहेत. निरनिराळ्या काळीं आर्यन, शक, हूण, पठाण, मोंगल वगैरे लोकांच्या स्वार्या येऊन गेल्या त्यांचे वंशज आज कित्येक वर्षें हिंदुस्थानांत एकत्र राहत आहेत. कांहींतर मूळच्या हिंदुसमाजामध्यें त्यांचें नवेपण ओळखतां येणार नाहीं इतके प्रविष्ट झाले आहेत. या बाह्य फरकांकडे लक्ष न देतां सांस्कृतिक आणि विचारविषयक फरकांकडे लक्ष दिलें तर ही एक स्वतंत्र सृष्टीच आहे असें परकीयांस वाटतें. येथील सांस्कृतिक आणि विचारविषयक परंपरेवर आज बाह्य जगाचा जाणवेल इतका परिणाम होत आहे. आतां यापुढें इंग्रजी अम्मलाखालील सुधारणांमुळे व युरोपियन लोकांशीं चालू असलेल्या संघट्टनामुळें व स्पर्धेनें होणारे फरक भविष्यकाळीं दिसून येणार आहेत.
हिंदुस्थानांत निरनिराळ्या मुख्य सहा भाषागोत्रांपासून बनलेल्या अशा एकंदर १३० भाषा आज प्रचलित आहेत. बहुतेक लोक हिंदु आहेत. त्यात शैव, वैष्णव, महानुभाव, लिंगाईत, बौद्ध, जैन, शीख इत्यादि पंथ आहेतच, शिवाय ख्रिस्ती, मुसलमान वगैरे भिन्न लोकांचे प्रकार या भारतीय जनतेंत आहेत. एकेश्वरवादी, अनेकेश्वरवादी, सर्वेश्वरवादी वगैरे मतें, पूजकांचे अनेक प्रकार, जलतरूपाषाणांनां देव मानून त्यांनां जिवंत प्राण्यांचे बळी देणारे लोक या सर्वांचें वैविध्य कोणासहि दिसल्याखेरीज रहात नाहीं. विवाहविधी अनेक प्रकारचे आहेत. बायकांमध्ये पातिव्रत्यगुणाची महती विशेष आहे. कांहीं ठिकाणीं पडदापद्धती आहे, तर कोठें स्त्रीपुरूषमिश्र व्यवहार अव्याहत चालू आहे. पोषाखांचे अनेक प्रकार आहेत. कांहि ठिकणीं गहूं, कोठें तांदूळ, तर कोठें ज्वार, मका वगैरे मुख्य भोज्यांचे प्रकार आहेत. सुधारणेंतील सर्व पायर्यांवरचे लोक येथें सांपडतात. उदाहरणार्थ पाश्चात्य सुधारणेचें आगर जी मुंबापुरी तिजपासून पन्नास मैलांच्या आंतच नग्नकल्प स्त्रीपुरूष दृष्टीस पडतात. उच्च शिक्षण व सुधारणा झालेले कांहीं लोक सांपडतात, तर जंगलांत दर्याखोर्यांत राहून झाडांचीं पानें पांघरून रानांतील फळेंमुळें खाऊन राहणारे अत्यंत रानटी लोकहि कोठेंकोठें आढळतात.
राजकीय परिस्थितीहि अशीच भिन्नभिन्न आहे. हिंदुस्थानचा बहुतेक भाग ब्रिटिशसत्तेखालीं आहे, तरीहि मधूनमधून लहानमोठीं देशी संस्थानें आहेतच. काहीं मोठ्या संस्थानिकांचे संपूर्ण अधिकार राहूं दिलेले आहेत. कांही अगदींच लहान जहागिरदार आहेत. ब्रिटिश अमलाखालीं मुख्य मोठे चार इलाखे असून बाकीचे लहानमोठे प्रांत बनविलेले आहेत.
हा इतका मोठा प्रदेश आज जवळ जवळ एक छत्राखालीं आला आहे आणि ब्रिटिश साम्राज्यास साम्राज्य हें नांव धारण करण्यास अधिकार जर पोंचत असेल तर तो हिंदुस्थानमुळेच पोंचतो. हा देश अत्यंत विविध असल्यामुळें या देशाचें जगापासून भिन्नत्वमूलक ऐक्य जरी कांहींअंशीं प्राचीन कालापासून लोकपरिचित होतें, तथापि संहतकार्यविषयक भावना सर्व अर्वाचीनच आहेत. आणि जगांतील स्पर्धेत आपल्या सामुच्चयिक अस्तित्त्वाची ओळख पटण्यास नुकतीच कोठें सुरवात झालेली आहे.
या इतक्या विविधस्वरूपी समूहांनीं भरलेल्या समुच्चयास एकराष्ट्रीयत्व कसें येईल, त्यांस एकच कसें म्हणावें, त्या सर्वांस एकत्र बांधणारा इतिहास काय इत्यादि प्रश्न पुढें येतात. एवढी गोष्ट खरी कीं विसाव्या शतकांत एकत्वभावना जितकी जोरानें जोणवली तितकी पूर्वीं कधींहि जाणवली नव्हती.
सध्यांच्या हिंदुस्थानांतील एखादा भाग तोडून तो जगाच्या दुसर्या कोणत्या तरी भागास जोडल्यास तें भारतीयांस आवडेल काय हा प्रश्न विचारावा म्हणजे हिंदुस्थानास एकत्वभावना कितपत आहे याचें उत्तर मिळेल.
सर्व लोकांनीं मिळून एकत्र कार्य केलेलें थोडें असलें तरी ज्या गोष्टी लोकांस एकत्र बांधतात अशा अनेक आहेत. त्यांपैकीं मुख्य ही कीं बाहेरील जग भारतीयांस एकसारखेंच वागवितें. अमेरिकन लोक हिंदुस्थानांतील हा मनुष्य हिंदु आहे अगर मुसलमान आहे अगर ख्रिस्ती आहे याची चौकशी करीत नाहींत. अमेरीकन लोक हिंदुस्थानांतील सर्वासच हिंदु म्हणतात. खुद्द तुर्कस्थानांतील लोक हिंदुस्थानांतील मुसलमानांस हिंदी म्हणून परके समजतात. इराणांतहि तसेंच करतात. आणि याप्रकारे बाहेरील जगानें हिंदुस्थानांतील सर्व लोकांस इंडियन किंवा हिंदी किंवा हिंदु यांपैकीं कोणतेंहि नांव देऊन एकच समजावें ही गोष्ट भारतीय जनतेच्या एकत्वाची उत्पादक आहे.
हिंदुस्थानाच्या जगाशी संबंधाचा विचार करतांना चारपांच संबंधांकडे लक्ष दिलें पाहिजे.
पहिला संबंध राजकीय होय. जगाशीं ब्रिटिश साम्राज्य अनेक तहनाम्यांनीं आणि अनेक तर्हेच्या आश्र्वासनांनी आणि सार्वराष्ट्रीयसंघामध्यें सभासद असल्यामुळें बद्ध आहे. आणि हिंदुस्थानाचा ब्रिटिश साम्राज्याशीं अवयव-अवयवीसंबंध असल्यामुळें हिंदुस्थानहि त्याचप्रकारें बद्ध आहे. याशिवाय राष्ट्रसंघामध्ये स्वतंत्रपणे ह हिंदुस्थानास सदस्यत्व आहेच.
हिंदुस्थान व इतर जग यांशीं असलेला ज्ञानविषयक आणि विचारविषयक संबंध हा दोहोंस जोडणारा दुसरा संबंध होय. जगाशीं विचारविषयक संबंध देखील युरोपीय संस्कृतीमार्फत व इंग्रजी भाषेंतील ग्रंथांमार्फत व येथील विद्यापीठांमार्फत झाला आहे. जगांतील सर्व तर्हेच्या अर्वाचीन विचारांची छाया इंग्रजी ग्रंथांत दिसून येते आणि इंग्रजी ग्रंथांमार्फत ते विचार हिंदुस्थानभर पसरतात. शास्त्रज्ञांचा विकासवाद जगाचें निरनिराळ्या शास्त्रीय विचारांच्या बाबतींत होणारे ऐक्य हिंदुस्थानांतील सुशिक्षित वर्गांत पसरीत आहे.
तिसरें बंधन पारमार्थिकविचारमूलक आणि उपासनामूलक होय. पारमार्थिक विचार आणि उपासना हीं दोन्हीं कधीं कधीं बरोबर जातात आणि कधीं कधीं पृथक्पणें जातात. भारतीय पारमार्थिक विचारांची देवघेवहि, बुद्धिस्ट सोसायटी आफ् ग्रेटब्रिटन अॅण्ड आयर्लंड, ब्रह्मसमाज, थिआसफीकल सोसायटी, अमेरिकेची वेदांत सोसायटी इत्यादि संस्थांमार्फत होत आहे. तथापि हेंहि सांगितलें पाहिजे कीं संस्थांमार्फत प्रसृत होणारे विचार हे वैयक्तिक प्रयत्नानें होणार्या विचारांच्या देवघेवीचा अत्यंत अल्प अंश होत. हिंदुस्थानांत पूर्वी उत्पन्न झालेले विचार येथील ग्रंथांच्या भाषांतरांनीं पाश्चात्यांत प्रसृत झाले आणि पाश्चात्य विचार त्यांच्या ग्रंथांच्या प्रत्यक्ष ओळखीनें आपल्या लोकांत प्रसृत होतात.
हिंदुस्थानांत मुसलमान, ख्रिस्ती इत्यादि अनेक संप्रदायांचे लोक आहेत, त्यांचा स्वसदृश बाह्य लोकांशीं संबंध येतो. तथापि बाह्यांचा आणि त्यांच्या प्रयत्नांचा हिंदु जनतेवर परिणाम कितपत होत आहे ही गोष्ट सांगतां येण्याजोगी नाहीं.
चवथें दोहोंसहि बांधणारें बंधन हें व्यापारविषयक होय. एका स्थलीं उत्पन्न झालेल्या मालाचा दुसर्या ठिकाणीं उपयोग होणें हें स्वाभाविक आहे आणि हें बंधन इतर कोणत्याहि बंधनापेक्षां अधिक लौकर जोमास येणारें आणि अधिक परिणामकारी होईल. या बंधनाचा अभ्यास फार सूक्ष्म तर्हेनें व्हावयास पाहिजे.
हिंदुस्थान आणि इतर जग यांमधील उपासनाविषयक व देवघेव आणि व्यापारविषयक या दोन्ही क्रिया स्पर्धापर आणि सबकार्यपरहि असल्यामुळें त्यांचें सविस्तर परीक्षण अवश्य आहे. आणि तें तसें करावयाचें योजिलें आहे.
हिंदुस्थान आणि जग यांचा सामाजिक संबंध फारच अल्प आहे आणि जो आहे तो नाखुषींनें होत आहे. सोवळ्या समाजाचें सोवळें न टिकल्यामुळें हें बंधन उत्पन्न होत आहे. हिंदु जनता आणि बाहेरील जग यांच्यामध्ये लग्नव्यवहार नाहीं. हिंदुंनीं परदेशीं जावें हेंच पन्नास वर्षांपूर्वीं लोकांना फारसें रूचत नव्हतें. मोनिअर विल्यम्स म्हणते कीं तेल आणि पाणी हीं एकमेकांशी मिळतील पण राज्यकर्ते आणि जित लोक हिंदुस्थानांत एकत्र व्हावयाचे नाहींत. हिंदुस्थानी जनतेंत आज परकीय रक्त मिसळत नाहीं असें नाहीं. कायद्याने असें ठरविलें आहे कीं, युरोपीय पुरूषाशीं हिंदु बाईनें लग्न न लावतां तिला त्यापासून जर मुलगा झाला असेल तर तो हिंदु आहे. हा नियम व्यवहारांत दिसून येतो. पुष्कळ वेश्यांस युरोपीय लोकांपासून मुलें होऊन आज तीं हिंदु म्हणून समाजांत मोडलीं जातात. आणि याच प्रकारच्या एका घराण्यांत उत्पन्न झालेली एक मुलगी आपल्या सौंदर्याच्या जोरावर मोठ्या पदावर चढली आहे. कांहीं राजघराण्यांत मुसलमान स्त्रियांबरोबर लग्नव्यवहार होतो आणि कांहि मुसलमान स्त्रियांपासून झालेले मुलगे आज हिंदु म्हणून समाजांत आहेत. या सर्व गोष्टी आज अपवादादाखल आहेत. रक्ताच्या दृष्टीनें मुसलमान आणि ख्रिस्ती यांचे वर्ग सोडून दिले तर भारतीय जनतेचा आणि इतर जगाचा रक्ताचा संबंध क्वचितच आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं.