प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १ लें.
उपोद्धात-जगांतील स्पर्धा.
हिंदु आणि हिंदुस्थान :— सामाजिक किंवा राजकीय गोष्टींसंबंधानें विचार करतांना आम्हा भारतीयांचें अन्तःकरण द्विधा होतें. मनुष्यानें आपल्या अन्तःकरणांत जो अभिमान बाळगावयाचा तो संस्कृतीच्या एकत्वानें जो मनुष्यसमूह निश्चित होतो त्या समूहाविषयीं धरावयाचा, कीं, ज्या स्थानांत आपण राहतों त्या स्थानांत निरनिराळ्या संस्कृतीचे लोक मिळून जो समाज होतो त्या प्रदेशनिश्चित समाजाचेच केवळ आपण अंशभाक् आहोंत, संस्कृतीच्या एकत्वामुळें उत्पन्न होणार्या इतस्ततः पसरलेल्या मनुष्यसमूहाशीं आपणास कांही एक कर्तव्य नाहीं, ही भावना मनांत ठेवून केवळ प्रदेशमूलक अभिमान बाळगावयाचा, या प्रश्नाचें उत्तर येथें देणें अप्रस्तुत होय. तथापि हें सांगितलें पाहिजे कीं, लोकांचें अन्तःकरण जसें देशप्रेमानें व्याप्त असतें तसेंच जाती, संप्रदाय आणि संस्कृती यांच्या प्रेमानेंहि व्याप्त असतें. आणि प्रेममूलक जिज्ञासा ही या सर्वांसंबंधानें आहे. यासाठी हिंदुस्थानचें आणि तसेंच हिंदुसमाजाचें ज्ञानहि आपणास पाहिजे. हिंदुस्थान आणि हिंदुसमाज हे दोन्ही मनुष्यसमूह स्पर्धेनें व्याप्त आहेत.
आपणांस हिंदुस्थानचे अवयव आणि हिंदुसमाजाचे अवयव या दोन्ही दृष्टीनीं आपले हितसंबंध तपासले पाहिजेत. हिंदुस्थानदेश आणि हिंदुसमाज या दोन्ही समुच्चयांस स्पर्धा बाधत आहे. हिंदु ही भावना ठेवून आपले हितसंबंध पहाण्यापूर्वीं आपण हिंदुस्थानविषयकच विचार करुं. कां कीं हिंदुस्थान ही केवळ राजकीय व प्रादेशिक कल्पना असल्यामुळें हिचें स्पष्टीकरण करणें आणि आपलें हितसंबंध पहाणें अधिक सुलभ आहे.