प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १ लें.
उपोद्धात-जगांतील स्पर्धा.

संस्कृतिस्पर्धा :—  जगाचे संस्कृतिदृष्ट्या चार भाग पडतात.  एक भाग म्हटला म्हणजे युरोपीय संस्कृतीचा.  ज्या लोकांनीं या संस्कृतीचें संवर्धन केलें त्यांचे वंशज किंवा त्यांशीं पूर्णपणें तादात्म्य पावलेले लोक यांनीं तुर्कस्थानाचा लहानसा तुकडा खेरीजकरून सर्व युरोपखंड आणि बहुतेक सर्व पश्चिम गोलार्ध व्यापिला आहे.  ईजिप्‍तच्या मुसलमानी आणि अबिसीनियाच्या ख्रिस्ती धुगधुगीस बाजुला वगळलें तर सर्व आफ्रिकाखंड या संस्कृतीच्या लोकांनींच पादाक्रांत केलें आहे.  आणि जपानचें जिवंत राष्ट्र, चीनचें साम्राज्यस्वरूपी लोकसत्तात्मक राज्य आणि मृतकल्प सयाम, इराण आणि तुर्कस्थान म्हणजे एशिया मायनर हीं वगळलीं असतां एशिया खंडाचा सर्व भागहि यांनींच पादाक्रांत केला आहे.  अफगाणिस्तान व नेपाळ यांस मेहेरबानीनें किंवा उगाच आपला व्याप फार वाढवूं नये या बुद्धीनें, हातपाय बांधून पण जिवंत ठेवले आहे.  हिंदुस्थानांतील इंग्रजांच्या कृपाछत्राखालीं असलेलीं संस्थानें यांचें अस्तित्व नेपाळ व अफगाणिस्तान यांपेक्षांहि केवळ मेहेरबानीनेंच आहे.  सर्व इतर संस्कृतींपेक्षां या संस्कृतीशीं तन्मय झालेले लोक ज्ञानानें व कर्तृत्वानें आणि व्यवहारांच्या अवाढव्यतेनें इतरांच्या पुढें गेलेले आहेत.

या संस्कृतीच्या शिवाय दुसर्‍या दोन भारतीयेतर संस्कृती म्हटल्या म्हणजे मुसलमानी व चिनी या होत. या संस्कृतींमध्यें शासनसंस्था जिवंत असल्यामुळें या खालावलेल्या तथापि अजून सर्वांगपरिपूर्ण आहेत.  अत्यंत पुरातन कालीं उच्च दर्जा पावून जिनें आपलें सातत्य आतांपर्यंत कायम राखलें, आणि भौतिक शक्तींचा उपयोग व युद्धकला याखेरीज इतर बाबतींत जिचे अवयव जगांतील कोणत्याहि संस्कृतीच्या तोडीचे आहेत, अशी संस्कृति चिनी होय.  मुसलमानी संस्कृतीचा ईश्वरविषयक भावनांच्या आवेशानें असंस्कृत अरबांनीं पाया घातला आणि इतरांचें ज्ञान  मागांहून मिळवून तिला जोरदार केली आणि चोहोंकडे जय मिळवून आपल्या संस्कृतीस महत्त्व आणलें.  सध्यां ही संस्कृति मरणोन्मुख झाली आहे.

चिनी संस्कृतीसंबंधानें हेंहि म्हटलें पाहिजे कीं, तिचा चोहोंकडे फैलाव होण्यास एक महत्त्वाचें कारण म्हटलें म्हणजे बौद्ध संप्रदायाचा तिजवर झालेला परिणाम होय.  तिनें कोरियावर प्रकाश पाडला आणि कोरियामार्फत जपानवर प्रकाश पाडला.  तिने अनामवर आपला पगडा बराच बसविला आणि सयाम, ब्रह्मदेश, नेपाळ आणि तार्तरीचा बराचसा भाग यांस शह दिला.  तथापि चीनचें आणि वर दिलेल्या इतर राष्ट्रांचें जें स्वरूपैक्य झालें आहे तें भारतमूलकच आहे.