प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण १ लें.
उपोद्धात-जगांतील स्पर्धा.
ज्ञानार्जनाचें प्रयोजन :
एका विशिष्ट विचारपद्घतीच्या तत्त्वज्ञांचें असें मत आहे कीं., आपणांस जगांत वास्तविक म्हणजे खरें ज्ञान होतच नाहीं. जें कांहीं आपणांस होतें तें ज्ञान वास्तविक नसून व्यक्तिसिद्धरूप म्हणजे व्यक्तींच्या ज्ञानेंद्रियांनीं निश्चित झालेल्या स्वरूपांत असतें. सर्व भौतिक शास्त्रें हीं देखील वास्तविक ज्ञानाच्या तत्त्वावर उभारलेलीं नसून स्वानुभवनियमित ज्ञानाच्या तत्त्वावर उभारलेलीं आहेत. अर्थात् हें म्हणणें खोटें नाहीं. तथापि या गृहीत तत्त्वावरून कित्येक लोक एक उंच भरारी मारतात ती ही कीं, वास्तविक ज्ञान होणें जर अशक्य आहे, तर आपण ज्य़ास ज्ञान म्हणतों तें ज्ञानच नव्हे, आणि त्यामुळें तें निरूपयोगी होय. या प्रकारच्या वादविवादपद्धतीमध्यें शास्त्रज्ञानें उगीच डोकेंफोड करण्यात मतलब नाहीं; कां की ज्ञान जरी इंद्रियानुभवनियमित असलें तरी तें “गजोऽपि मिथ्या पलायनमपि मिथ्या” या न्यायानें इंद्रियानुभव नियमित जगाशींच वागतांना उपयोगांत आणावयाचें आहे, आणि त्यासाठींच तें मिळवावयाचें आहे.
शास्त्रज्ञांचा आणि त्यांच्या प्रयत्नांचा उपहास करूं पहाणारा दुसरा वर्ग म्हटला म्हणजे “अमुक ज्ञानाचा उपयोग काय?” असें विचारणारांचा होय. प्रस्तुत प्रश्न विचारणें जितकें सोपें आहे, तितकें त्याचें उत्तर देणें सोपें नाहीं. कारण अनेक ज्ञानांगांचा उपयोग समजण्यास देखील तें ज्ञान मिळविल्यानंतरची स्थिती अनुभवावी लागते. जंगली मनुष्यांस अनेक शास्त्रांच्या ज्ञानाचा उपयोग समजावून देतां येणार नाहीं. कोनन डॉइल या प्रसिद्ध आंग्ल कादंबरीकारानें आपल्या “शरलॉक होम्स्”ची ओळख करून देतांना शरलॉक होम्सला असें म्हणतांना दाखविलें आहे कीं “ ‘पृथ्वीभोंवती सूर्य फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवतीं फिरते’ या ज्ञानाचा उपयोग काय? ही गोष्ट खरी आहे कीं खोटी आहे याची चौकशी करण्याच्या भानगडींत मी पडत नाहीं. आणि जर खरी असलीच तर ती मला विसरून गेलें पाहिजे. कां कीं तिचा उपयोग मला कांहींएक नाहीं. मग ती डोक्यांत ठेवण्याचे तरी परिश्रम हवेत कशाला?” अर्थात् वर्षाचें गणित करण्यासाठीं, ऋतूंच्या स्पष्टीकरणासाठीं आणि कालविषयक सूक्ष्म मोजदाद करण्यासाठीं पृथ्वी व सूर्य यांपैकीं कोण कोणाभोंवतीं फिरतें याचें ज्ञान अवश्य आहेच. पण ह्या ज्ञानाचा रोजच्या व्यवहारांत फारसा उपयोग सामान्य व्यक्तीस नाहीं. मनुष्याचा व्याप जितका जास्त होत जातो तितकी त्यास अधिक ज्ञानाची जरूर असते. राष्ट्रांत अनेक अवयव असतात, त्या अवयवांस अनेक क्रिया करावयाच्या असतात,म्हणून अत्यंत विविधज्ञानाची जरूर राष्ट्रस आहेच. त्याने काढलेल्या संशयासारखे संशय उपयुक्ततेच्या दृष्टीनें ज्ञानक्षेत्रांचें अवलोकन करावयास आणि मनुष्यहितबुद्धिनें तें ज्ञान मांडावयास लेखकांस आणि वक्त्यांस भाग पाडतील.
विविध प्रकारच्या ज्ञानाची उपयुक्तता लक्षांत येण्यासाठी आपले म्हणजे हिंदूंचे व हिंदुस्थानाचे हितसंबंध जितक्या विस्तृतेनें लक्षांत आणतां येतील तितक्या विस्तृतेनें आणले पाहिजेत; आणि ते लक्षांत आणून देण्याची जबाबदारी सर्व विषयांचें अवडंबर पुढें मांडण्याचा आपला हक्क आहे असें समजणार्या ज्ञानकोशकारांवर पडते. ज्ञानकोशकारांच्या दृष्टीने सर्व भारतीयांस हिंदूंची एकंदर परिस्थिति ठाऊक पाहिजे, म्हणजे हिंदूंची विस्ताराची, त्या दोहोंशीं स्पर्धा करीत असलेल्या जगांतील शक्तींची व कार्यपरंपराची माहिती पाहिजेच. हिंदुस्थानाच्या भूमीचा भारतीयांची इतरांशी स्पर्धा आणि सर्व देश हाच एक समुच्चय धरून त्या देशांतील लोकांची इतर देशांतील लोकांशी होत असलेली स्पर्धा आणि या दोन स्पर्धांच्या मुळें उत्पन्न झालेल्या व होणा-या कार्यपरंपरा, या सर्व आपणांस ज्ञातव्य आहेत. सामाजिक आणि राजकीय दृष्टीनें आपले हितसंबंध जाणण्याचा आपण प्रयत्न करुं लागलों तर आत्महितबुद्धीनेंच पण जगांतील बहुतेक ज्ञानविषयांसंबंधी जिज्ञासा आपणांस उत्पन्न होईल.