प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.
प्रकरण ७ वें.
वेदप्रवेश-आरण्यकें व उपनिषदें.
“अथर्ववेदीय उपनिषदें.”– उपनिषदांचा आणखीहि एक चवथा वर्ग आहे. परंतु वर सांगितलेल्या तीन वर्गांतील उपनिषदांचाच वैदिक शाखांशीं किती संबंध आहे हीच गोष्ट कित्येक संशोधकांस संशयित वाटत आहे. ह्या नवीन वर्गांत जीं पुष्कळशीं उपनिषदें आहेत त्यांचा वैदिक पंथाशीं कांहीं संबंध नसेलसें वाटतें. वेदांचा आणि नंतरचीं उपनिषदें ह्यांचा कांहींच संबंध नसावा. भारतीयांच्या परंपरेप्रमाणें हीं सर्व उपनिषदें अथर्ववेदाचीं आहेत. वास्तविक पाहतां अथर्ववेदाचीं उपनिषदें ह्या नांवाखालीं मोडणा-या ह्या उपनिषदांत वेदाच्या बाहेरील व पुष्कळ पुढील काळच्या निरनिराळ्या तत्त्वज्ञांचीं व निरनिराळ्या पंथांचीं मतें व विचार दृष्टोत्पत्तीस येतात. हीं अथर्ववेदांतील आहेत अशी समजूत होण्याचें कारण इतकेंच कीं, अथर्ववेद श्रौतधर्माबाहेरील विषयांचा संग्रह असल्यामुळें जें जें रूढशास्त्रसंमत विशिष्ट गोष्टींनां धरून नव्हतें तें तें सर्व अथर्ववेदांतील आहे असें म्हणण्याचा परिपाठ पडला. शिवाय वर सांगितल्याप्रमाणें अथर्ववेद हा मंत्रतंत्र आणि अभिचार ह्यांचा वेद होय. उपनिषदाचा खरा अर्थ गुप्ततत्त्वें असा असून हा अर्थ अबाधित आहे. अथर्ववेद म्हणजेच गूढ तत्त्वांचा संग्रह असें असल्यामुळें उपनिषदें किंवा गूढ तत्त्वें ह्या नांवाचे जे जे अनेक ग्रंथ निर्माण झाले ते ते सर्व अथर्ववेदाला जोडले गेले हें अगदीं साहजिक दिसतें. {kosh संग्रह या स्वरूपांत कोणताहि उपनिषदांचा संग्रह फार जुना नाहीं. कारण इ. सन ८०० च्या सुमारास होऊन गेलेले शंकराचार्य ह्यांनीं अमुक ब्राह्मणाचे भाग म्हणून पुष्कळ उपनिषदें दिलीं आहेत परंतु ह्यांच्या एकीकरणासंबंधीं कांहींच लिहिलेलें नाहीं. एक तर त्यांनीं उपनिषदांनां श्रुति असें म्हटलें आहे किंवा तीं ज्या वैदिक पंथाचीं उपनिषदें होतीं त्यांचीं नावें दिलीं आहेत. इ. स. १२ व्या शतकांत होऊन गेलेला रामानुज ह्यानेंहि ह्या निरनिराळ्या पंथांतील उपनिषदांसंबंधीं लिहितांना छंदोग, वाजसनेयिन् व कौषितकिन् अशीं नांवें दिलीं आहेत. ह्याचा अर्थ इतकाच कीं हे वेदाचे भाग होते, विशिष्ट स्वरूपाचे संग्रह नव्हते. निःसंशयपणें अगदीं अलीकडील म्हणतां येईल अशा मुक्तिका उपनिषदांत १०८ उपनिषदांची यादी दिली आहे. हीं सर्व एका ठिकाणीं संग्रथित होतीं. (Deussen Sechzing Upanishads p. ५३२ etc.) इ. स. १६५६ त फारशी भाषेंत तरजुमा झालेल्या संग्रहांत ५० उपनिषदें आहेत. उपनिषदांचे मूळग्रंथ हिंदुस्थानांत पुष्कळ वेळां प्रसिद्ध झाले. आनंदाश्रम, निर्णयसागर व गणपत कृष्णाजी यांच्या आवृत्त्या आहेतच. बृहदारण्यक व छांदोग्य हीं उपनिषदें Bothlingk ह्यानें बरोबर तपासून छापविलीं असून (सेंट पीटर्सबर्ग आणि लिप्झीग् १८८९) त्यांचें जर्मन भाषांतरहि झालें आहे. ह्याच शोधकानें कठ ऐतरेय व प्रश्नोपनिषदहि तपासून जर्मंन भाषेंत त्यांचें भाषांतर केलें आहे. [Reports of the Royal Saxon Society of Sciences] मुख्य मुख्य उपनिषदांचें इंग्रजी भाषांतर मोक्षमुल्लर ह्यांनीं (Vols I & १५ of the Sacred books of the East १८७९ and १८८४) केलें आहे. पॉल् डॉयसेन ह्यानें केलेल्या उत्तम जर्मन भाषांतरावरूनहि यूरोपीयांस उपनिषदांचें सहज ज्ञान होईल (Sechzing Upanishadas des Veda Leipzig १८९७.) ह्याच शोधकानें Allgemeine Geschichte der Philosophie Leipzig १८९९ ह्या ग्रंथाच्या पहिल्या पुस्तकाच्या दुस-या भागांत उपनिषदांतील तत्त्वज्ञान ह्याचें चांगलें विवेचन केलें आहे. मराठी भाषांतरकारांत रा. रा. भागवत, ह. र. भागवत, चिं. गं. भानु इत्यादि लेखक प्रसिद्ध आहेत.}*{/kosh}