प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ७ वें
सूतसंस्कृति

सूतसंस्कृतींतील लोकांचा उपासनासंप्रदाय - या विषयीं असें म्हणता येईल कीं, शिवविष्णुपूजा तत्कालीं जवळ जवळ आजच्या स्वरूपांतच होती.यजुर्वेदीय संहिता व ब्राह्मणें यांचा काळ म्हणजे दोन्ही संस्कृतीच्या मिलाफाचा काळ. त्या काळांत शंकर, गिरिसुता व स्वामी कार्तिकेय यांनी युक्त दाखविला आहे. विष्णूच्याबरोबर वैनतेयाचा उल्लेख असला तरी तो वैनतेय गरूडपक्षीच होता की नाहीं याविषयीं शंका आहे. ॠग्वेदांतील विष्णु व सूतसंस्कृतीतील विष्णु यांचें अत्यंत प्राचीन म्हणजे कदाचित् पर्शुभारतीय काळीं मूळ एक असेल परतु क्रमानें परिवर्तन झालेले वेदांत दिसत नसून एकाच नांवाची दोन भिन्न दैवतें उद्भुत झालेंली दिसतात. महादेवांचे पूजन लिंगस्वरूपांतहि होत असावें. त्याशिवाय शिश्न देवांचा उल्लेख इतक्या सरळपणानें स्पष्ट करतां येणार नाहीं.

सूतसंस्कृतीच्या लोकांत कांही मगानुयायी शकहि असावेत त्यांच्यामध्यें इन्द्र हा राक्षसच समजला जात होता. आणि इन्द्राला दुय्यम करून प्रजापतीला महत्त्व देणें ही यजुर्वेद कालीं जी क्रिया झालेली दृष्टीस पडते तिचें कारण इन्द्र ही देवता सर्व लोकांस मान्य नव्हती आणि सर्व लोकांस मान्य होईल अशी देवता पुढें सारावयाची होती हें होय. प्रजापति मंत्रांत फारसा येत नाहीं. तथापि प्रजापतिविषयक म्हणजे एक विशिष्ट पुरुषापासून सृष्टीची उत्पत्ति, अशा प्रकारच्या कल्पना सूतसंस्कृतीच्या लोकांमध्यें पूर्णपणें सिद्ध झाल्या होत्या आणि त्यामुळें प्रजापतीस महत्त्व बृहद्यज्ञसंस्थेच्या उत्पादकांनी दिलें असावें असें दिसतें. यजुर्वेदीय प्रजापतीच्या कल्पनेचा ॠग्वेदीयदैवतोतिहासाशीं संबंध मुळीच लावतां येत नाहीं.  (वेदविद्या पृ. २५२ पहा.)  प्रजापतीचें अस्तित्व पुराणांनां कबूल आहे एवढेंच नव्हें तर बौद्ध जैनांनांहि कबूल आहे. वैश्रवण कुबेर ही देवताहि सूतसंस्कृतीतील असावी. दोन्ही परंपरांच्या एकीकरणाच्या प्रयत्नांत मुख्य देव स्थानिकांचा घेतला; शिवविष्णू हे स्थानिकांचे घेतले. ॠग्वेदांतील शिवस्वरूप जें विष्णु त्यांचे आणि स्थानिकांच्या विश्वदेवतेचें ऐक्य कल्पिलें आणि रुद्राचें शिवाशीं ऐक्य स्वरूप लक्षण कल्पना करून स्थापन केलें, म्हणजें स्थानिकांच्या दैवतांनां प्राधान्य देऊन मंत्रांस व क्रियांस महत्त्व दिलें. अशा त-हेनें दोहोंचे एकीकरण करण्यांत आलें आणि आपला श्रौतधर्म स्थानिकांस प्रिय करण्यासाठी तो त्यांच्या वाडवडिलांचा धर्म आहे असें शुनःशेपसूक्तास हरिश्चंद्र जोडून देऊन सांगण्यांत आलें. आतां उपदैवतांसंबंधानें पाहतां अमरकोशांत सांगितलेल्या ‘विद्याधराप्सरे यक्षरक्षोगंधर्वकिन्नराः पिशाचो गुह्यकः सिद्धी भुतोमी देवयोनयः’ इत्यादि देवयोनीसंबंधी असें म्हणतां येईल कीं, रक्षोगंधर्वासह सर्व देवयोनी सूतसंस्कृतीच्या लोकांस मान्य असाव्या परंतु मात्रसंस्कृतीच्या लोकांस फक्त रक्षोगंधर्व एवढेच मान्य असावे व इतर मान्य नसावेत. पण मांत्रसंस्कृतीत मान्य असलेले साध्य व ॠभु हे सूतसंस्कृतीत आढळत नाहींत व पुढें ते नापत्ताच झालें. रक्षोगंधर्व दोघांसहि मान्य असल्यामुळें त्यांच्या कथा पुढेहि आढळतात.