प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ७ वें
सूतसंस्कृति
यज्ञामध्यें इतिहास - पुराणांचें महत्त्व- ब्राह्मणी वाङ्मयांत किंवा चळवळींत इतिहास भाग अजीबात वगळला होता असें नाहीं. शांखांयन-सूत्रांतून घेतलेला खालील उतारा, आपण ज्यास वेद म्हणतों त्याखेरीज असलेल्या वाङमयावर कांहीसा प्रकाश पाडतो. हीच हकीकत आश्वलायन सूत्रांत (१०.७) व शतपथ ब्राह्मणांत (१३.३,१,१) दिलेली आहे. “अश्वमेधाच्या वेळी, अध्वर्यु गायकांनां पाचारण करतो व ते वीण्यावर गातात, आणि तो त्यांनां राजाची स्तुति करावयास सांगतो. नंतर तो राजा इतर जुन्या सद्गुणी राजांसमवेत यज्ञ करतो. यज्ञाच्या पहिल्या दिवशी अध्वर्यु मनुवैवस्ततापासून आरंभ होणारी गोष्ट निवेदन करतो. ज्या अर्थी मनूचे लोक मनुष्य होते व यज्ञाला मनुष्य हजर आहेत त्या अर्थी ही गोष्ट सांगून अध्वर्यु हा गृहमेध्यांनां (कुटुंबी लोकांनां) उपदेश करतो. नंतर तो सांगतो कीं, ॠक-गीतें वेद आहे. हा वेद आहेत; आणि एक सूक्त म्हणतो “दुस-या दिवशी यमवैवस्वतापासून आरंभ होणारी गोष्ट ती सांगतो. ज्या अर्थी यमाचे लोक पितर होते आणि पितर येथें हजर आहेत म्हणून तो वृद्धमाणसांनां ही गोष्ट सांगून उपदेशितो. नंतर तो म्हणतो की, यजुर्वेद वेद आहे, हा वेद आहे आणि यजूंच्या एका अनुवाकाचें पठण करतो. तिस-या दिवशी वरुणआदित्यापासून आरंभ होणारी गोष्ट तो सांगतो. ज्या अर्थी वरुणाचे लोक गंधर्व होते आणि ज्या अर्थी ते हजर आहेत त्या अर्थी तो शोभिवन्त तरुणांनां ही गोष्ट सांगून उपदेशितो. नंतर तो म्हणतो की, ‘अथर्ववेद वेद आहे;’ हा वेद आहे. नंतर तो भेषजाचें पठण करतो. चवथ्या दिवशीं तो सोमवैष्णवापासून आरंभ होणारी गोष्ट सांगतो. ज्या अर्थी सोमाचे लोक अप्सरा होत्या आणि त्या हजर आहेत म्हणून तो शोभिवन्त तरुणींनां ही गोष्ट सांगून उपदेशितो. नंतर तो म्हणतो की, ‘आंगिरसवेद वेद आहे; हा वेद आहे;’ आणि त्या नंतर तो घोराचे पठण करतो. पाचव्य़ा दिवशी तो अर्बुदकाद्रवेया पासून आरंभ होणारी गोष्ट सांगतो. ज्या अर्थी अर्बुदाचे लोक सर्प होते आणि ज्या अर्थी ते हजर आहेत म्हणून तो सर्पांना किंवा सर्पविदांनां ही गोष्ट सांगून उपदेशितो. नंतर तो म्हणतो की, ‘सर्पविद्या वेद आहे; हा वेद आहे;’ आणि सर्प विद्येचें पठण करतो. साहाव्या दिवशी तो कुबेर वैश्रवणापासून आरंभ होणारी गोष्ट सांगतो. ज्या अर्थी कुबेराचे लोक राक्षस होते, आणि ते हजर आहेत म्हणून तो सेलगांना किंवा पापकृतांनां ही गोष्ट सांगून उपदेशितो. नंतर तो म्हणतो की, ‘रक्षोविद्या वेद आहे; हा वेद आहे’ आणि तो रक्षोविद्या पठण करतो. सातव्या दिवशीं तो असितधान्वनापासून आरंभ होणारी गोष्ट सांगतो. ज्या अर्थी त्याचे लोक असुर होते आणि ते हजर आहेत म्हणून तो कुसीदिनांनां (किंवा व्याजखाऊंनां ?) ही गोष्ट सांगून उपदेशितो. नंतर तो म्हणतो कीं, ‘असुरविद्या वेद आहे; हा वेद आहे;’ आणि एक हातचलाखीचा खेळ करून दाखवितो. आठव्या दिवशीं तो मत्स्य सामंदापासून आरंभ होणारी गोष्ट सांगतो. ज्या अर्थी त्याचे लोक जलचर होते आणि ते या ठिकाणीं हजर आहेत त्या अर्थी तो मत्स्यांनां किंवा धीवरांनां ही गोष्ट सांगून उपदेशितो. नंतर तो म्हणतो की, ‘इतिहासवेद वेद आहे, हा वेद आहे’ आणि तो एका इतिहासाचें पठण करतो. नवव्या दिवशीं तो तार्क्ष्य वैपश्चितापासून आरंभ होणारी गोष्ट सांगतो ज्याअर्थी त्याचे लोक पक्षी होते आणि ते हजर आहेत, म्हणून तो पक्ष्यांनां किंवा ब्रह्मचा-यांना ही गोष्ट सांगून उपदेशतो. नंतर तो म्हणतो कीं, ‘पुराण-वेद हा वेद आहे, हा वेद आहे;’ आणि त्या नंतर तो पुराणांतील कांही भाग पठण करतो. दहाव्या दिवशीं तो धर्म इंद्रापासून आरंभ होमारी गोष्ट सांगतो. ज्याअर्थी त्याचे लोक देव होते आणि ते हजर आहेत त्याअर्थी तो तरुण व अप्रतिग्राहक अशा श्रोत्रियांनां ही गोष्ट सांगून उपदेशतो. नंतर तो म्हणतो की, ‘सामवेद वेद आहे, हा वेद आहे’ आणि सामगायन करतो. (शाखा. श्रौ. सू. १६.१)”
प्रस्तूत उतारा आपणांस अनेक दृष्टींनीं महत्त्वाचा आहे. इतिहासपुराणें यांसहि पांचवा वेद म्हणण्याचें शास्त्रीय कारण काय? तर यज्ञ करण्यामध्यें त्यांचाहि उपयोग होता. वेदविद्या म्हणजे यज्ञ करणा-या लोकांची विद्या. तर जें वाङ्मय यज्ञांत म्हटलें जाई तेंहि वेदविद्येचा भाग होय.
अध्वर्यु जुन्या गोष्ठीचें निवेदन करतो असें यांत सांगितलें अहे. याचा अर्थ काय? अध्वर्यु सूतवाङ्मयाचा अभिमानी होता काय? की सूतवाङ्मय आणि देश्यसंस्कृति यांचा आणि मांत्रसंस्कृति आणि यज्ञसंस्था यामधील दुवा होता आणि यज्ञ, इतिहास व पुराणे हे वाङ्मय समाविष्ट करून त्यानें यज्ञसंस्था अधिक लोकप्रिय केली? वरील उता-यात आणखी एक गोष्ट दृष्टीस पडते की संहितीकरणाचा प्रयत्न होत असता हौत्र, आघ्वर्यव, औद्गात्र आणि ब्रह्मत्व यांचाच वेदात समावेश करण्याचें ठरण्यापूर्वी वाङ्मयाचें वर्गीकरण व सामुच्चयिक कल्पना ही निराळया त-हेची होती. ॠग्गीतें, यजुर्वेद, अथर्ववेद, आगिरसवेद, सर्पविद्या, रक्षोविद्या, असुरविद्या, इतिहासपुराणें व सामवेद हें या वर्गीकरणावरून दिसून येईल.
सर्प राक्षस आणि असुर ही तीन राष्ट्रें महत्त्वाची असून त्यांची विद्या काहीं विशेष होती आणि इतिहास पुराणाप्रमाणें त्या विद्येचाहि समावेश यज्ञसंस्थेत करून घ्यावा असा अध्वर्युचा प्रयत्न असावा. या तीन राष्ट्राचा इतिहास काही अंशी त्या वेळेस ठाऊक असून त्याचें उच्चारण अश्वमेध काली करावें अशी खटपट ते करीत होते असें दिसतें. सर्पराष्ट्राचा इतिहास अर्बुद काद्रवेयापासून परिचित होता; राक्षसाचा इतिहास कुबेर वैश्रवणापासून परिचित होता आणि असुरांचा इतिहास असितधान्वनापासून परिचित होता.