प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ७ वें
सूतसंस्कृति

कालैक्यें व ती काढतांना लागणारी सावधगिरी - या वंशावळीचा अभ्यास करितांना कालैक्याकडे चांगले लक्ष्य ठेविलें पाहिजे. एरवी नुसत्या वंशावळींनां कांहीच महत्त्व येणार नाही. राजे व ॠषी यांच्या संबंधींच्या अनेक   ख-याखोटया कथा आहेत. तेव्हां कांही तरी ठराविक कसोटीला लावून त्यांतील ख-याखोटयांचे पृथक्करण केलें पाहिजें. त्यांतून आपणांस बरीचशीं कालैक्यें पुष्कळ अंशीं खरीं म्हणून गोळा करितां येतील व त्यांवरून चांगलीं अनुमानें काढतां येतील.

हीं अनुमानें काढतांनां कांही गोष्टीविषयीं विशेष काळजी घ्यावी लागते. या गोष्टी म्हणजे, प्रथमतः पैतृकनामावरून पितापुत्रांचें नातें नेहमीच निघतें असें नाहीं तर तें नाम पुष्कळदां वंशज या अर्थी असतें; उदाहरणार्थ विश्वामित्राला त्याच्या आजोबांच्या नांवावरून कौशिक, दाशरथी रामाला राघव आणि कृष्णाला माधव, सात्वत, वार्ष्णेय, दाशार्ह, शौरी, अशीं पैतृक नावें असत. दुसरी गोष्ट म्हणजे साधें नांव नेहमींच मूळपुरूषवाचक नसतें पण कधीं कधीं वंशजांनांहि लावण्यांत येतें. ॠषींच्या बाबतीत ही नोष्ट विशेष लक्ष्यांत बाळगिली पाहिजे. उदा. वसिष्ठाचें नांव सूर्यवंशाच्या सर्व काळी दृष्टीस पडतें व तें वसिष्ठकुलाची परंपरा दर्शवितें. याच अर्थी भरद्वाज, कण्व, गौतम, भुगृ, अत्रि इत्यादि निरनिराळया काळीं दृष्टीस पडणारीं नांवें घेतली पाहिजेत.  आणखी एक गोष्ट म्हणजे कधीं कधी एकच नांव अनेक व्यक्तीचें असल्याने, त्या व्यक्तींच्या निरनिराळया कथा एकाच व्यक्तींवर आरोपित केलेल्या असतात. अशा ठिकाणीं सावधगिरी बाळगावी लागते. धृतराष्ट्र, जनमेजय, ब्रह्मदत्त, भीष्म, भीम इत्यादि नांवाचे अनेक राजे होऊन गेले आहेत. त्याचप्रमाणें दिवोदास सुदास किंवा सृंजय या नांवांचे एकाहून अधिक राजे होते. हीच गोष्ट ॠषींच्या बाबतींतहि लागू आहे.

आतां यापुढें निरनिराळीं घराणीं घेऊन त्यांविषयी आधार व थोडे विवेचन ज पारगिटेर देतो तें त्यांचें विवेचन आम्ही जसेंच्या तसेंच देत आहों. वैवस्वतमनूपासून सर्व कुलें निर्माण झालीं; सूर्य आणि विदेहवंश त्याच्या इक्ष्वाकु पुत्रापासून, विशाल घराणें त्याच्या नेदिष्ठ पुत्रापासून आणि त्याची कन्या इला हिच्या पुरुरवस् पुत्रापासून इतर सर्व घराणीं उदयास आली. पुरुरव्याचा वंश म्हणजे आयु, नहुष, ययाति  आणि पुढें ययातीचें पांच पुत्र यदु, तुर्वसु, द्रुह्यु, अनु, आणि पुरु. मनूच्या इक्ष्वापुत्रापासून निघालेला अयोध्येचा सूर्यवंश अनेक पुराणें आणि रामायण यांतून वर्णिला आहे. पुराणांतून दिलेली वंशावळ जुळतें पण रामायणांतील मात्र भिन्न आहे. रामायणांतल्या वंशावळीचें नीट परीक्षण करितां ती चुकीची आहे असेंच म्हणणे भाग पडतें, तेव्हां ती बाजूला सारून पुराणवंशावळच स्वीकारली पाहिजे.

विदेहवंश इक्ष्वाकूच्या निमिपुत्रापासून निघाला. भागवत, गरूड, वायु आणि विष्णु अशा चार पुराणांतून व रामायणांतून हा विस्तारलेला आहे. या सर्वांची बहुतेक एकवाक्यता आहे. यांत पुष्कळ राजांचें जनक असें नांव आहे पण तें व्यक्तिनाम नसून गोत्रनाम किंवा राजविशेषण असावें.

ययातीच्या यदुपुत्रापासून यादववंश निघाला असें विधान पुराणांत आहे. याचे दोन फांटे झाले. एक यदूच्या सहस्त्रजित पुत्रापासून- याच्या हैहय व तालजंघ अशा दोन शाखा प्रसिद्धीस आल्या. दुस-या त्याच्या कोष्ठु नांवाच्या पुत्रापासून- हें घराणें चिरकाल टिकलें होतें. यादववंशाविषयी सर्व आधारांची एकवाक्यता आहे. याच वंशांत कंस व कृष्ण होऊन गलें.

पौरव (किंवा सोम) वंश ययातीच्या पुरू नांवाच्या पुत्रापासून निघाला. हा महाभारत व इतर अनेक पुराणांत विस्तारलेला आहे. महाभारताखेरीज सर्व पुराणांची या वंशावळीतील पिढयासंबंधी बहुतेक एकवाक्यता आहे. महाभारतांत ज्या दोन याद्या आहेत त्या मात्र भिन्न असून एकमेकींशीहि जुळत नाहींत. या सर्व याद्या ताडून पाहातां, पुराणवंशयादीच बरोबर दिसते.

अहिच्छत्राच्या गादीवर असलेला उत्तर पंचालवंश सोमवंशांतील अजमीढापासून निघाला. हा अनेक पुराणांत सारखाच वर्णिला आहे. ॠग्वेदांत सुद्धां या वंशांतील कांहीं पिढया आहेत. सृंजय व सोमक कुलें यांच्याच शाखा असून ब्राह्मणवाङ्मयांत यांचा विशेष उल्लेख आहे. कांपिल्य येथील दक्षिण पंचालवंश हा अजमीढापासून निघालेला दुसरा वंश होय. हा अनेक पुराणांत दिला असून, त्यांत यासंबंधी एकवाक्यताहि आहे.
अजमीढाचा भाऊ द्विमीढ यापासून निघालेला मध्यदेशांत दुसरा एक वंश होता. कांही पुराणांत हा उल्लेखिला असून त्यांत बहुवंशी एकवाक्यता आहे.

कुरूपासून पांचवी पिढी वसु, यानें एक घराणें स्थापिलें. यानें चेदि राज्य बळकावून आपणाला चैदिद्य- उपरिचर असें विशेषण घेतलें. मगध देशापर्यंत यानें दिग्विजय मिळविला. त्याच्या घराण्याला मगधवंश असें म्हणावें. याचें वर्णन कांही पुराणांतून बहुतेक सारखेच आढळतें.

ज्यांत गाधि आणि विश्वामित्र होऊन गेलें, तो वंश कान्यकुब्ज येथें राज्यारूढ होता. निरनिराळया ठिकाणीं याचें सारखेंच स्वरूप दिलें आहे, पण पूर्वज मात्र दोन निरनिराळे सांगितले आहेत. पुरुरवसचा पुत्र अमावसु याच्यापासून याची उत्पत्ति झाली याविषयी बहुमत पडतें. भरत विश्वामित्राचा पूर्वज धरणें गैरवाजवी होतें, तेव्हां ज्या वंशावळींतून विश्वामित्राचा पूर्वज जो जःहु याला भरताचा वंशज केले आहे त्या वंशावळी चुकीच्या असल्या पाहिजेत.

काशींत काशीवंश असें. या वंशांतील सुहोत्र आणि सोमवंशांतील सुहोत्र यांची घालमेल होऊन निरनिराळया पुराणांत सुहोत्राचे निरनिराळे पूर्वज दिले आहेत. सुहोत्रापासून पुढच्या पिढया सर्व पुराणांतून बहुतेक सारख्याच आहेत.

ययातीच्या अनु नांवाच्या पुत्राचे वंशज पंजाबांत केकय, शिबि इत्यादि जातीत आणि पूर्वेकडे अंग घराण्यांत समाविष्ट झाले. जयद्रथामागून अंग घराण्याच्या दोन शाखा झाल्या. धाकटया शाखेंत कर्ण जन्मला असून तो पुढें राजा झाला. महाभारतांत मात्र कर्ण व जयद्रथ हे समकालीन दाखविले आहेत.

मनूच्या (दिष्ट किंवा नेदिष्ट) पुत्रापासून दुसरा एक वंश स्थापन झाला.या वंशांतील विशाल व त्यापुढील राजांनीं विशाला किंवा वैशाली घराणें स्थापिलें. याला दिष्टवंश म्हणावें. याच्या पिढयांविषयी एकवाक्यता आहे.
यापुढें, वंशावळीच्या याद्या देऊन कालैक्यें समजावून देणें आहे. पुढील तक्त्यांतून यासंबंधीचा निर्णय दाखविला आहे.यांत मनूपासूनचे जेवढे महत्वाचे वंश होते तेवढे दाखविले आहेत. ॠचीक, जमदग्नि व राम हे तीन भार्गव ॠषी त्यांच्या वेळची कालैक्यें स्पष्ट होण्यासाठी यांत ग्रथिंत केले आहेत. यांतील वंश होतांहोईतो भौगोलिक स्थानाप्रमाणें मांडले आहेत, म्हणजे पश्चिमेकडे होऊन गेलेली घराणी तक्त्यांत डाव्या बाजूला. मध्यदेशांतील मध्यभागी आणि पूर्वेकडील घराणीं उजव्या बाजूला लिहिली आहेत. ज्यांची स्थानें कालैक्यांनीं अगदीं निश्चित झाली आहेत. अशा सर्व राजांच्या नांवापूर्वी * अशी फुली आहे; कंसांतील नांवे, ज्यांचा वंशावळींत उल्लेख नाही पण कालैक्यांचा विचार करितानां ज्याचें अस्तित्व उघडकीस आलें अशा राजांची आहेत. ज्या काहीं याद्या, मग त्या एका कालैक्यापासून दुस-या कालैक्यापर्यंत पोचल्या असल्या तरी, इतरांपेक्षां कमी भरलेल्या दिसतात; त्यांतील नांवें गळलेलीं आढळतील. गळलेंलीं नावें कोठें येतात हें माहीत नसल्यानें, त्या याद्यातील नांवें नुसती अंतर टाकून मांडली आहेत; आणि ज्या ठिकाणीं कालैक्ये नाहींत त्या ठिकाणीं शक्य तितकें चांगलें अनुमान बांधून, काम भागविलें आहे. तक्त्यांत आलेल्या चक्रवर्ती राजांपुढे x असें गुणिलें चिन्ह दाखविलें आहे. जे राजे आपल्या सभोवतालच्या प्रदेशावर वर्चस्व स्थापित, व तेथील राजांनां आपले मांडलिक बनवीत अशांनां चक्रवर्ती किंवा सम्राज ही पदवी असे. यांच्या विजयामुळें शेजारच्या राजवंशातून अंदाधुंदी झाल्यास नवल नाहीं. व यामुळें याच्या काळच्या शेजारील राजवंशावळींत विस्कळीतपणा दिसून येतो. शिवाय अशा चक्रवर्ती राजाच्या कारकीर्दी बहुधा मोठया असाव्यात, असें दिसतें.

पुढील तक्त्यांत आपणांस असें दिसून येईल की, यादव, पौरव, काशी,सूर्य, दिष्ट व अनु हे वंश मनूपासून निघाले आहेत. त्यांपैकी यादववंश, सूर्यवंश व विदेहवंश या घराण्यांच्या वंशावळी ब-याच मोठया असून त्यांतील बहुतेक नांवाची स्मृति परंपरेनें चालत आलेली आहे व यांत फारच थोडी नांवे गळलेली दिसतात. पौरव कुलांत जरी बरीच नांवे दिसली तरी मध्यंतरी मोठमोठी रिक्तस्थानें आढळतात. अनुवंशाचीहि वंशावळ बरीच मोठी व दीर्घकालापर्यंत पसरलेली आहे. पण तीतहि रिक्तस्थानें मधून मधून बरीच आढळतात. काशीवंश व द्विष्टवंश हे यानंतरचे महत्त्वाचे वंश होत. यांचा लोप दाशरथी रामाच्या सुमारास झालेला आढळतो. बाकीचे वंश या मानानें कमी महत्वाचे असून कांहीचा आरंभ बराच उत्तरकालीन दाखविला आहे.

 पुराणांतील वंशावळयांचे कालैक्यदर्शक कोष्टक

वरीलप्रमाणें कोष्टक तयार करून त्यांत आढळणा-या महत्त्वाच्या कालैक्यांसबंधानें पारगिटेर कालानुक्रम दिग्दर्शित येणें प्रमाणें करतो.