प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ७ वें
सूतसंस्कृति
वंशावळींचें स्वरूप - वंशावळतपशिलांत सुनिश्चितता आढळेल अशी अशा बाळगूं नये. कारण पुष्कळदां या याद्या ‘विस्तरेण’ ‘आनुपूवर्येण’ दिल्या असून देखील त्या अपूर्ण असल्याचें त्याच ठिकाणी सांगितलेलें असतें. प्रसिद्ध राजांचीच नांवे त्यांत घातलेलीं असतात. कधीं कधीं याद्या लांबलचक असूनहि (‘संक्षेपेण’ किंवा ‘समासेन’) त्या आंखडलेल्या आहेत असें म्हटलेलें असतें. दोन राजांमधील संबंध दाखविण्याचे चार प्रकार आहेत ते सांगतांनां आपण माजी राजाबद्दल ‘क’ वापरूं व पुढच्या राजाबद्दल ‘ख’ वापरूं. हे प्रकार येणेंप्रमाणें:-
(१) ख कचा मुलगा होता; हें नातें पुत्र किंवा जात या अर्थाचा शब्द वापरून दाखविलेलें असतें. उदा. विजयाद् रुरुको जज्ञे। रुरुकात्तु वृकःसुत:॥ (गरूडपु. १,१३८, २८)
(२) ख कचा-होता; या ठिकाणीं नातें स्पष्ट केलेलें नसतें. उदाहरण दृढाश्वस्य प्रमोदासश्व। हर्यश्वस्व निकुंभोऽभूत्। मत्स्यपु.१२.३३
(३) कपासून किंवा नंतर ख झाला पंचमी विभक्ति किंवा या अर्थाचें क्रियाविशेषणरूप येथें योजिलेलें असतें.
उदा. नाभागात, अंबरीषोऽभूत्। सिन्धुद्वीपोंऽबरीषतः॥ (गरूडपु. १,३३८,३१) जेव्हां पंचमी व षष्ठीची विभक्तिरूपे सारखींच होतात तेव्हां प्रकार (२) आणि (३) निरनिराळें ओळखूं येत नाहींत. उदा. बाहोस्तु सगरः स्मृतः। (गरूड पु. १,१३८,२८)
(४) ख कचा वारस होता, उदा. शशादस्यतु दायादः ककुत्स्थो नाम। (ब्रह्मपु. ९.७,५१)
कांहीं वेळा या चारहि प्रकारांत पुत्राचेंच नातें निघतें; परंतु केव्हां केव्हां इतर नातीं निघून कांही बाबतींत नातें मुळींच नसतें.
अशा प्रकारच्या अडचणी असल्यानें वंशावळींत निर्दोषपणा येणें अशक्य असलें तरी, आपल्या कार्याला पुरेशी पूर्णता त्यांमध्यें आणणें शक्य आहे.
वंशावळींची तुलना करितां जी विशिष्ट गोष्ट नजरेस येते ती म्हणजे अयोध्येच्या सूर्यवंशाचा महान् विस्तार होय. यांत ९३ नांवे आहेत. विस्तारानें दुस-या प्रतीच्या दोन याद्या आहेत त्या यांपेक्षां ब-याच लहान आहेत. पश्चिम हिंदुस्थानातील यादवकुलाची यादी सुमारें ६२ नांवांची व सोम किंवा पौरव कुळाची ५० नांवांची आहे. सूर्यवंशाची यादी चांगली पूर्ण आहे व दुस-या दोन वंशांची तशी नाही असें धरून चालण्यास सबळ कारणें आहेत असें पारगिटेर म्हणतो आणि निरनिराळया वंशावळयांची संगति खालीं दिल्याप्रमाणें लावतो.