प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ७ वें
सूतसंस्कृति
आर्ष ग्रंथांतील वंशावळींचें महत्त्व - प्राचीन भारतीय कालखंडाची व्यवस्थित जुळणी करावयाची झाल्यास या आर्ष ग्रंथांतून आढळणा-या वंशावळयासंबंधाची अर्धवट ऐतिहासिक माहिती नीट तपासून तिचें वर्गीकरण केलें पाहिजे.पारगिटेरनें या प्रकारचा प्रयत्न केला आहे. त्याचें असें मत आहे की प्राचीन आर्षकलांत थोडी फार खरी इतिहासपरंपरा असून ती संशोधकास इतिहासार्थ तपासण्यास सर्वथैव योग्य आहे. सर्वच ठिकाणचा प्राचीन इतिहास नुसत्या बडया लोकांनीं आणि त्यांच्या वैयक्तिक कृत्यांनीं भरलेला असतो या नियमानुसार प्राचीन भारतीय इतिहास संस्कृत ग्रंथाधारें पाहूं लागल्यास, वरील गोष्टीच त्यांत आढळून येणार आहेत.
या देशांत प्राचीनकाळीं राजे व ब्राह्मण (ॠषि, आचार्य) असे दोन श्रेष्ठ लोकांचे वर्ग असत. या दोघांच्या वंशेतिहासांत बराच फरक दृष्टोत्पत्तीस येतो. राजाच्या जीवनक्रमाचें स्वरूप त्याचें कुटुंब, राज्य व राजधानी यांनी निश्चित होई पण ॠषीचा जीवितेतिहास स्वतंत्र असे. राजाला कुलमहत्त्व असून, पूर्वजांचा तो अभिमान बाळगी. तसें ॠषीचें नसें; त्याला गोत्रनामाखेरीज कुलपरंपरा फारशी माहीत नसे. राजाला आपले कुल व राज्य स्वपराक्रमानें वाढवून आपल्या पुत्राच्या हातीं देऊं अशी आशा बाळगण्याला जागा असे. ॠषि पवित्रज्ञान व तपःप्रभाव संपादन करून शिष्याला तें सर्व अर्पण करी. राजाला कुलाची फार महती वाटे; प्रत्येक राजा प्रादेशिक व वांशिक इतिहासशृंखलेचा स्वकुलांतील एक दुवा असे. ॠषीला पवित्र विद्येची महति वाटे या विद्येची परंपरा भरभराटीनें चालविण्याच्या कार्यांत प्रत्येक ॠषि अगर आचार्य एक दुवा असे. अशा त-हेचे स्वरूप आजच्या पुराणग्रंथांत सांपडतें.
क्षत्रियेतिहासांत वंशावळीची माहिती आणि राजांच्या पराक्रमांच्या गोष्टी वरील कारणांमुळें महत्त्वाच्या होऊन बसल्या; पण ब्राह्मणांत वंशावळींनां अर्थातच प्राधान्य मिळालें नाहीं. राजवंशावळीं अनेक इतिहासपुरांणांतून दिलेल्या आहेत. पण ब्राह्मणवंशावळींचा मात्र फारच क्वचित ठिकाणी मागमूस लागतो व तेथें गुरुशिष्यपरंपरेची महति असे. सूर्यवंश, सोमवंश, यादववंश यासारख्या वंशांच्या पन्नासाच्या वर पिढया अवगत आहेत. पण कोणत्याहि ॠषिकुलांतील पुरत्या पाच सहा लगतच्या पिढयांचीहि माहिती उपलब्ध नाहीं. राजवंशांची नोंद ॠषींच्याकडे नसून दरबारी भाटांकडे किंवा पुरोहितांकडे असावी. क्षत्रियवाङ्मय किंवा सूतवाङ्मय ब्राह्मणौवाङ्मयापासून अगदीं स्वतंत्र म्हणजे मंत्रवाङ्मयापासून वाढत गेले आणि जेव्हां ते अवाढव्य बनून लोकादरास पात्र झालें तेव्हां कोठें ब्राह्मणांनीं ज्ञानाची एक शाखा म्हणून त्याचें ग्रहण केलें व यज्ञसंस्थेतहि त्यास स्थान दिलें हें शांखायन ब्राह्मणांतील मागें दिलेल्या उता-यावरून लक्षांत येईल. सूतवाङ्मय ब्राह्मणांनीं ग्रहण करून ब्राह्मणी कल्पनेप्रमाणें त्यांची व्यवस्था लावून कथाप्रवचनानीं तें समृद्ध केलें.
आपली वंशावळ आणि विक्रम आपल्यामागेंहि लोकांच्या स्मरणांत राहावा ही राजाची इच्छा भाट व राजपुरोहित पुरी करीत असत. प्रसिद्ध राजांच्या कथा व कवनें यांची लोकांत विशेष आवड उत्पन्न होऊन समाजांतल्या एका वर्गानें जुन्या कथा व वंशावळी यांचा अभ्यस करण्याचा क्रम ठेवला. हे “पुराविद्” “पुराणज्ञ”, “पौराणिक”, “वंशविद्” “वंशपुराणज्ञ” या शब्दावरून उघड होतें. “द्विज” “विप्र” आणि “जन” हे असे शब्द वरील शब्दांनां जोडलेले आढळतात. यावरून या वर्गांत ब्राह्मण व ब्राह्मणेत्तर दोघेहि असावेत. “इत्यनुशुश्रुमः” “इतिश्रुतम्” “उदाहरन्ति” अशा वाक्यांतून हा वर्ग किंवा लौकिकपंरपरा उल्लेखिलेली दिसतें.
तेव्हां या वंशावळी व तदनुषंगिक कथा कल्पित म्हणून टाकाऊ आहेत. असेंच समजण्याचें कारण नाहीं. या कथांत बरीच खरी इतिहासपरंपरा आहे. क्षत्रियदृष्टीनें प्राचीन भरतखंडाकडे पाहण्यास हें महत्त्वाचें साधन आहे. त्या काळीं क्षत्रियवर्गानें फारच महत्त्वाची कामगिरी केली असल्यानें तज्जन्य वाङ्मयाकडे दुर्लक्ष करणें इतिसाच्या पूर्णज्ञानास कमीपणा आणील. प्राचीन भरतखंडांत इतिहासकल्पना नाही हा आक्षेप ब्राह्मणी वाङ्मयाबाबतींत सर्वथैव खरा नाहीं. त्याकाळाला अनुरूप अशी इतिहासदृष्टि क्षत्रियांनीं प्रकट केली आहे. बाबिलोन आणि इजिप्तप्रमाणें या ठिकाणीं त्यांचे शिलालेख किंवा मृण्मयफलक नसले तरी पुराणें आणि महाकाव्यें यांतून त्यांच्या कृती ग्रथित केल्या आहेत.
याखेरीज दुसरी एक लक्ष्यांत घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, ब्राह्मणी वाङ्मयांत ज्यांची प्रशंसा केलेली आढळते ते राजे क्षत्रिय वाङ्मयांत फारसे किंवा कांही ठिकाणीं मुळींच प्रशंसिले नाहीं. मान्धातृ (ॠ. १०. १३४ हें सूक्त याचे आहे. ) यौवनाश्व आणि कौरवपांडवामधील युद्धापूर्वी अजमासे एक शतक होऊन गेलेला देवापि यांच्यामधील काळांत ॠग्वेदसूक्ते तयार झाली. या मोठया काळांत अर्जुन, मरुत्त, सगर, भरत, भगीरथ, अंबरीष, दुसरा दिलीप आणि राम यांसारखे महान् विख्यात् व या शिवाय हरिश्चंद्र, अलर्क, अजमीढ, कुरू, ब्रह्मदत्त इत्यादि राजे होऊन गेले असतांना भरत (६.१४,४, अजमीढ (४.४४,६) व कदाचित राम (१.१३,१४) खेरीज करून वरील कोणत्याहि राजांचा उल्लेख ॠग्वेदसूक्तांत नाहीं. या राजांच्या वेळीं कोणीहि कवि नसेल असा तर्क करणे बरोबर नाहीं. आतां याच्या उलट पाहिलें असतां दिवोदास, सुदास यांच्यासारखे राजे व इतर राजे जे सूक्तांत प्रशंसिले आहेत. त्यांचें वर्णन सूतवाङ्मयांत आढळत नाहीं. यावरून पारगिटेर अशी कल्पना करतो की एकतर आपल्या स्वतःचा किंवा आपल्या मोठया सैन्याचा ज्यांनां पूर्ण भरंवसा असे अशा खरोखरीच विख्यात राजांनां ॠषींकडून
मिळणा-या ख-याखोटया दैवी मदतीची पर्वा नसावी, किंवा ब्राह्मणांचे यज्ञविधी त्यावेळी चांगल्या परिणत अवस्थेप्रत पोचले नसावेत; आणि दुसरें, भरतवंशातील राजे व सुदासदिवोदास हे राजे यासारख्या कमी बलिष्ठ पण धार्मिक मध्यदेशीय राजांतर्फे ॠषींनीं आपलें पारमार्थक वर्चस्व स्थापिलें असावें व म्हणून त्या प्रदेशाला विशेष पावित्र्य व महत्त्व दिले गेलें असावें.
वरील परिस्थितीचें स्पष्टीकरण पारगिटेरने केले आहे त्यापेक्षां आमचें स्पष्टीकरण निराळें आहे. ॠग्मंत्र आणि पुराणें ही एकाच उपसंस्कृतीची वाङ्मये न समजतां आम्ही दोन भिन्न संस्कृतीची समजतो. मांत्रसंस्कृतीच्या लोकांमध्यें सूतांचा वर्ग महत्त्वाचा नव्हता व देश्य आर्यन् संस्कृतीमध्यें यज्ञसंस्था मुळींच वाढली नव्हतीं आणि यज्ञविषयक स्तोत्रें व यजन करणारा वर्ग देश्य आर्यन् लोकांत नव्हता. तो त्यांत असता तर त्यांचे कांही विधी यज्ञसंस्थेत शिरले असते. पौराणिक राजांच्या अनुल्लेखाचें कारण असें होते कीं ज्या प्रसिद्ध राजांचीं नांवें पुराणांत आलीं आहेत त्यांची वैदिक कवींस माहितीच नव्हती. कारण गंगेच्या पूर्वेकडील प्रदेशातील जुन्या राजांचीं नांवे नुकत्याच पंजाबपर्यंत पोंचलेल्या मंत्रकर्त्यास कशी ठाऊक असणार. देश्य आणि मांत्रसंस्कृतीचें एकीकरण कुरुक्षेत्रांत झालें असावें. येथेंच, यज्ञ विकसित झालें; यज्ञसमर्थनार्थ पुराणांचा उपयोग होऊं लागला; देश्य लोकांचा जो एकंदर आयुष्यक्रम होता त्याची अंगें यज्ञसंस्थेंत शिरली? त्यामुळें यज्ञसंस्था एकदम मृत न होतां मरण्यापूर्वी बरीच मनोरम होऊं लागली होती.