प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन

हिरोडोटसचें हिंदुस्थानासंबंधीं ज्ञान - तथापि त्या काळचें परकीयांचें हिंदुस्थानासंबंधाचें ज्ञान बेताबाताचेंच होतें, हें हिरोडोटसच्या ग्रंथावरून दिसून येतें. हिरोडोटसनें हिंदूंसंबंधानें जी ''माहिती'' दिली आहे ती येथें उद्‍धृत करतों. हिंदूंबरोबर पक्थांचेहि उल्लेख दिले आहेत.

''हिंदुस्थानची लोकसंख्या सर्व राष्ट्रांपेक्षां जास्त आहे. हिंदुस्थान हें जगांतील पूर्वेकडचें अगदीं शेवटचें मनुष्यवस्तीचें ठिकाण आहे. या देशांतले घोड्याखेरीज सर्व पशुपक्षी इतर देशांतल्यापेक्षां फारच मोठे असतात. खणून काढलेलें, नदींतून वाहून आलेलें व मुंग्यांच्या वारुळापासून मिळविलेलें असें बरेंच सोनें या देशांत सांपडतें. येथें कांहीं रानटी झाडांनां फळांऐवजीं लोंकर येते; ती मेंढ्यापासून काढलेल्या लोंकरीपेक्षां जास्त चांगली व सफाईदार असते (हिरोडोटस ३. १०६).

''हिंदूंचीं अनेक राष्ट्रें आहेत; त्यांची भाषा एक नाहीं. कांहीं लोक भटके आहेत, तर कांहीं नदीच्या दलदलींत राहून कच्चे मासे खातात. हे वेताच्या होड्यांत बसून मासे धरावयास जातात. वेताच्या एका पेराची एक होडी तयार होते. हे लोक लव्हाळ्यापासून तयार केलेले कपडे वापरतात (३.९८).

''पॅडियन हिंदू भटके असून ते कच्चें मांस खातात. यांच्यांत अशी चाल आहे कीं, जर एखादा मनुष्य आजारी पडला तर त्याचे जवळचे संबंधी त्याचा जीव घेतात. याचें कारण असें दाखवितात कीं, रोगानें जर तो क्षीण झाला तर त्याचें मांस गोड लागणार नाहीं. आपण आजारी नाहीं असें त्या मारूं घातलेल्या माणसानें सांगितलें तरी त्याचें म्हणणें न ऐकतां त्याला मारून त्याच्या मांसावर ताव मारण्यांत येतो. कोणी म्हातारा झाला असला तर त्याला सुद्धां बळी देऊन त्याच्या मांसाची मेजवानी करितात; पण म्हातारपणापावेतों फारच थोडे लोक जगतात; कारण त्यापूर्वीच कांहींनांकांहीं आजार दाखवून त्यांचा मोक्ष करण्यांत येतो (३.९९).

''दुसर्‍या कांहीं हिंदूंत अशी चाल आहे कीं, ते कोणाहि जीवाची हत्या करीत नाहींत, किंवा जमिनींत कांहीं पेरून खात नाहींत, किंवा घरदार करूनहि रहात नाहींत. ते केवळ वनस्पतींवर आपली उपजीविका करतात. हे लोक जोंधळ्याएवढा दाणा असलेल्या शेंगा गोळा करून त्या उकडून टरफलासहित खातात. त्यांच्यापैकीं एखादा जर आजारी झाला तर तो अरण्यांत जाऊन पडतो. तेथें तो मेला कीं तसाच आजारी आहे याची कोणी कधीं चवकशीहि करीत नाहीं (३.१००).

'' या सर्व हिंदूंची संभोगक्रिया गुरांप्रमाणें उघड्यावर होते; व सर्वांचे वर्ण इथिओपिअन्सप्रमाणेंच काळे असतात. त्यांचें रेतहि त्यांच्या कातडीप्रमाणेंच काळें असतें; इतर लोकांच्या प्रमाणें पांढरें नसतें (३.१०१).

''कॅसपॅटिरस शहर आणि पॅक्टिशिया (पक्थ) देश यांच्या सरहद्दीवरचे हिंदू अगदीं उत्तरेकडे रहात असून, त्यांची रहाणी बॅक्ट्रियन लोकांप्रमाणें असते. सर्व हिंदूंत हे अतिशय लढवय्ये असतात. व म्हणूनच सोनें जमविण्याचें काम त्यांच्याकडे सोंपविण्यांत येतें. हिंदुस्थानचा पूर्वभाग वालूकामय आहे. या प्रदेशाजवळच वालुकारण्य असून त्यांत कुत्र्यापेक्षां लहान व कोल्ह्यापेक्षां मोठ्या आकाराच्या मुंग्या असतात. या जमिनींत राहतात, व त्यांच्या जागेवर वारुळें वाढलेलीं असतात. या मुंग्यांनीं जमीन पोंखरून बाहेर टाकलेल्या वाळूंत सोनें मिसळलेलें असतें. म्हणून ही वाळू मिळविण्याकरितां हे हिंदू तेथें जातात. प्रत्येक माणूस बरोबर तीन उंट घेतो व कडक उन्हाच्या वेळीं या मुंग्या जेव्हां निवार्‍याकरितां जमिनींत दडून बसतात, तेव्हां त्या ठिकाणची वाळू घाईघाईनें पोत्यांत भरून तातडीनें माघारा फिरतो. कारण मुंग्यांनां लवकरच यांचा वास लागून त्या या चोरांचा पाठलाग करतात व त्यांच्या तावडींत सांपडलेल्यास त्या जिवंत ठेवीत नाहींत. अशा रीतीनें हिंदू बरेंच सोनें मिळवितात; व थोडें फार खणूनहि काढतात (३.१०२-१०६).

'' पॅक्टिए (पक्थ) लोक अंगांत बकर्‍याच्या कातड्याचे झगे घालतात; त्यांचे धनुष्य एका विशिष्ट तर्‍हेचें असतें. ते लहान तरवारी वापरतात (७.६७).''

बौद्ध संप्रदायाची स्थापना होऊन त्याचा जगावर जो परिणाम झाला तो भारतीयांचें अतिभारतीयत्व वर्णन करतांना पहिल्या विभागांत अंशतः दाखविलाच आहे. बुद्धाचें चरित्र आणि त्याच्या संप्रदायाची स्थापना, त्या वेळेची भारतीय स्थिति आणि बौद्ध वाङ्‌मय यांचा परामर्श याच भागांत पण पुढें सविस्तर येईल.

येथें एवढेंच सांगितलें पाहिजे कीं, बुद्धाचें महत्त्व इतके लवकर वाढलें कीं पारशी धर्मग्रंथांत देखील त्याचा उल्लेख झाला; आणि हिरोडोटसला देखील बुद्धाच्या परिणामाचा उल्लेख करावा लागला. पारशी ग्रंथांतील उल्लेख असा :

''त्यांच्या तेजाच्या व प्रभावाच्या योगानें असा मनुष्यजन्मास येतो कीं, त्यास सभांमध्यें व बैठकींमध्यें अग्रस्थान मिळतें. तो शास्त्राचें उत्तम अध्ययन करितो व ज्ञान संपादन करून पाखंडी गौतमाबरोबर वादविवादांत जय मिळवितो :- (फर्वर्दिन यस्न १०.१६)

बुद्ध आणि झरथुष्ट्र या दोहोंच्याहि संप्रदायांचा परिणाम ज्यावर झाला, व ज्याचा प्रसार यूरोपांतहि झाला त्या वर उल्लेखिलेल्या मणिसंप्रदायाची माहिती येथें देणें अवश्य आहे.

ख्रिस्ती संप्रदायांत आणि बौद्धकथांत जें सादृश्य वर्णिले तें बहुतेक अंशीं दोघांहि संस्थापकांच्या शिष्यमंडळाच्या कृतीचें वर्णन होय. त्यांत प्रत्यक्ष येशूचा बौद्ध संप्रदायाशीं संबंध दाखविला गेला नाहीं. परंतु मणिसंप्रदायाचें तसें नाहीं. तेथें प्रत्यक्ष कबूल केलेली सर्वसंग्राहकता आहे. तेव्हां आतां मणिसंप्रदायाकढे वळूं.