प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
सिल्यूकिडी अंमलाचा र्हास - तथापि यानंतर लवकरच या राजानें पांचव्या टॉलेमीवर स्वारी करून त्यावर जो विजय मिळविला त्यामुळें त्याचें रोमशीं युद्ध जुंपलें, व त्या युद्धांत सिल्यूकिडी राज्याचे तुकडे तुकडे झाले (ख्रि. पू. १९०) आणि आशिया मायनर प्रांत हातचा जाऊन अँटायोकसला बराच काळपर्यंत रोमला मोठी खंडणी भरावी लागली. हे पैसे मिळविण्याकरितां त्यांचें ईलाम देशांतील बेलचें देऊळ लुटल्यामुळें तेथील रहिवाशांनीं त्याला ठार केलें. साम्राज्य दुर्बल झालेलें पहातांच आर्मीनियाच्या सुभेदारांनीं स्वातंत्र्य पुकारलें. इतर जिल्ह्यांतहि अशींच बंडे होऊन पूर्वेस युथिडेमस व त्याचे वारस यांनीं सिंधुनदीचा प्रदेश व इराणी सरहद्दीवरील मुलूख जिंकण्यास आरंभ केला.
आपलें वैभव कायम राखण्याकरितां सिल्यूकिडी रांजे जिवावर उदार होऊन लढत होते. चौथ्या अँटायोकसनें (१७६-१६३) पूर्वेकडील प्रदेश व बाबिलोनियांतील शहरें एक वार परत मिळविलीं. पर्सिस व मीडिया हे देश अद्याप या राज्यांत होते, परंतु या राजाच्या मरणानंतर रोमन लोकांनीं सिल्यूकिडी राज्य नष्ट करण्याकरितां अंतस्थ तंटयांचा फायदा घेतला. त्यांनीं या राज्याचें सैन्य व आरमार कमी करून प्रत्येक बंडाला प्रोत्साहन दिलें. अशा बिकट परिस्थितींतहि पहिल्या डिमीट्रिअसनें (१६१-१५०) मीडिया बळकावून बसलेल्या बाबिलोनच्या सुभेदाराचें बंड मोडलें (१५९).