प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २० वें.
राष्ट्रसंवर्धन राष्ट्रांतील चुरस व जगाची ओळख

स्वीडनचा उदय व –हास.- स्वीडन हें पूर्व युरोपांतील राज्य असून तें सतराव्या शतकांत पुढे आलें. स्वीडनच्या उदयाचें मुख्य कारण म्हणजे स्वीडनला गस्टाव्हस घराणें राज्य करण्यास मिळालें हें होय. तीस वर्षांच्या युद्धांत स्वीडननें चांगलाच नांवलौकिक कमावला. या वेळेस स्वीडननें प्रोटेस्टंट पंथाचें रक्षण केलें. वेस्टफालियाच्या तहानें स्वीडनला बरेच फायदे झाले. स्वीडनचें राज्य वाढून तें यूरोपांत एक प्रमुख राष्ट्र होऊन बसलें. पुढें स्वीडनचा राजा १२ वा चार्लस यानें पोलंड व डेन्मार्क यांचा पराभव करून इ. स. १३०८ या वर्षीं ऑलिव्हिया येथें झालेल्या तहानें पुष्कळ प्रदेश मिळविला. स्वीडन या वेळेस लहानसें राज्य राहिलें नसून त्याचा विस्तार फार मोठा झाला. तें आतां साम्राज्य झालें.

ज्याप्रमाणें हें फार लवकर उदयास आलें त्याप्रमाणेंच त्याचा -हासहि तसाच जलद झाला. त्याच्या -हासाचीं खालीलप्रमाणें कारणें देतां येतील.

  (१) स्वीडन हें लहानसें राज्य असल्यामुळें येवढें प्रचंड काम हातीं घेण्यापुरेशी स्वीडनची लोकसंख्या व संपत्ति विपुल नव्हती.
  (२) ख्रिश्चाना राणी फार उधळखोर निघाली.
  (३) बाराव्या चार्लसच्या अंगीं उपजतांच सेनापतीचे गुण असल्यामुळें तो मोठमोठ्या लढाया मारूं शकत होता. युद्धाच्या योगानें आपण वाटेल तें करूं शकुं, अशी त्यास धमक असल्यामुळें त्यानें स्वीडनला जरूर नसतां युद्धपरंपरेंत ढकलिलें. चार्लस हा मुत्सही नव्हता. त्यानें राजकारणांस फार मोठ्या चुका केल्या. आसपासच्या सर्व लहान राजांस आपलेसें करून घेण्याऐवजीं त्यानें सर्वांचें शत्रुत्व संपादिलें. यामुळें त्याच्या सबंध कारकीर्दींत स्वीडनला नेहमीं लढण्यास सज्ज रहावें लागलें. असें करणें मोठमोठ्या राष्ट्रांसहि फार दिवस शक्य नसतें. मग स्वीडनसारख्या चिमुकल्या राष्ट्राची गोष्टच विचारावयास नको. रशियाशीं झगडण्यांत स्वीडनचा पराभव होऊन एकदम स्वीडनची वाढलेली सत्ता नाहीशी झाली. तेव्हांपासून अजूनपर्यंत स्वीडन हें यूरोपांत एक लहानसें राष्ट्र असून राजकारणांत बरेंच मागें पडलें आहे.