प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २० वें.
राष्ट्रसंवर्धन राष्ट्रांतील चुरस व जगाची ओळख

कॅथोलिक वि­रूद्ध प्रॉटेस्टंट.- आम्ही मागें सांगितलेंच आहे कीं प्रॉटेस्टन्ट व कॅथोलिक पंथांतील भांडण केव्हां कोणत्या थरास जाईल याचा नियम राहिला नव्हता. पुढें होणा-या महान युद्धाची सामुग्री यावेळेस तयार होती. फक्त ठिणगी पडण्याचाच अवकाश होता. या शतकाच्या आरंभीं अशा पुष्कळ गोष्टी घडल्या कीं त्यायोगें सामान्य मनुष्यासहि या दोन पंथांत मोठें द्वंद्व माजणार असें वाटूं लागलें होतें. बव्हेरियाचा संस्थानिक मॅक्सिमिलीयन हा कॅथोलिकपंथाभिमानी असून जर्मनीतून प्रोटेस्टन्ट पंथ अजिबात नाहींसा करण्याचें त्याच्या मनानें घेतलें. इ. स. १६०७ या वर्षी त्यानें डोनॅवर्थ नांवाचें एक प्रोटेस्टन्ट पंथाभिमानी शहर जिंकून घेतलें. इकडे प्रोटेस्टन्ट पंथाभिमानी राजेहि स्वस्थ बसले नव्हते इ. स. १६०८ यावर्षीं त्यांनीं कॅथोलिक पंथाच्या चळवळीस विरोध करण्याकरितां एक प्रॉटेस्टंट राजाचा संघ (प्रॉटेस्टंट यूनियन) स्थापन केला. हें पाहून लागलींच कॅथोलिक राजेलोकांनींहि आपल्या संघाची (कॅथोलिक लीग) स्थापना केली.

इ. स. १६१८ यावर्षी, फेडरिक (पॅलाटिनेटचा संस्थानिक) नें बोहिमियाच्या राज्यपदाचा अंगीकार केला. फ्रेडरिक हा कालव्हिनिस्ट पंथानुयायी असल्यामुळें बोहिमियांचें राज्य त्याच्याकडे जावें हे रोमन कॅथोलिक राजांस आवडलें नाहीं. हेंच पुढें तीस वर्षे चाललेल्या युद्धाचें तात्कालिक कारण होय. प्रथम प्रॉटेस्टन्ट पंथ हा प्रबल नसून तत्पंथानुयायी राजे लोकांत अंतःकलह सुरू होते. इकडे कॅथोलिक पंथांत स्पेनचा दुसरा फिलीफ, जर्मनीचा सम्राट फरडिनान्ड, बव्हेरियाचा राजा मॅक्सिमिलियन् आदिकरून मोठमोठे प्रबल राजे असून प्रॉटेस्टन्ट पंथ जर्मनींतून अजिबात नाहींसा करण्याचा त्यांनीं निश्चिय केला होता. याशिवाय त्यांना वॉलेनस्टीन सारखा उत्तम सेनापति मिळाल्यामुळें त्यांचे काम सुकर झालें. डेन्मार्क, स्वीडन व नॉर्वे हे प्रांत जिंकून देण्याचें त्यानें सम्राटाला अभिवचन दिलें होतें. व त्यांस तें काम करणें कांहीच अशक्य नव्हतें. परंतु जर्मनीच्या कॅथॉलिक पंथानुयायी संस्थानिकांस त्याचा मत्सर वाटूं लागून ते त्यास मदत करीनातसे झाले. इतकेंच नव्हे तर ते त्याच्या मार्गांत हजारों अडचणी आणूं लागले. याशिवाय स्वीडनचा राजा गस्टावस अँडोल्फस हा प्रॉटेस्टंट पंथाला येऊन मिळाला. हा मोठा सेनापति असून त्याच्या आगमनानें प्रॉटेस्टन्ट पंथ बराच प्रबल झाला. या वरील दोन कारणांमुळें कॅथॉलिक पंथानुयायी लोकांचे सर्व प्रयत्न निष्फळ झाले. ब्रेटनफील्ड व लुटझेन या ठिकाणीं कॅथोलिक राजांचा पराभव होऊन प्रॉटेस्टन्ट पंथावरील मोठेंच संकट टळलें.

गस्टावस अडोल्फसच्या मृत्यूनंतर तीस वर्षांच्या युद्धाचें धार्मिक स्वरूप जाऊन त्यास राजकीय स्वरूप प्राप्त झालें; कारण यापुढें फ्रान्स या युद्धांत सामील झाला व यापुढील तीस वर्षांचें युद्ध म्हणजे मुख्यतः फ्रान्स व हॅप्सबर्ग घराणें यांतील भांडण हेंच होय. वर सांगितलेंच आहे कीं फरडिनान्ड बादशहहा व दुसरे कॅथॉलिक राजे यांचे सर्व जर्मनी कॅथॉलिक करून साम्राज्य सत्ता दृढ करण्याचे प्रयत्न निष्फळ झाले. पुढें लवकरच वालेन्स्टीन सेनापतीचा खून झाल्यामुळें कॅथॉलिक लोकांची बाजू बरीच  शक्तिहीन झाली. युद्धात सामील होण्याला फ्रान्सला ही चांगली संधी मिळाली. येथून पुढें इ. स. १६४८ पर्यंत फ्रान्स हा स्पेन व ऑस्ट्रिया यांच्याविरूद्ध लढत राहून शेवटीं त्यानें त्याची सत्ता धुळीस मिळविली.

(१) ऑस्ट्रिया इतक्या वर्षांच्या युद्धामुळें आधींच थकवा (२) स्पेनला उतरती कळा लागली, व (३) उत्तर जर्मनींतील कॅथॉलिक संस्थानिक हे प्रोटेसटन्ट मतानुयायी फ्रान्स व स्वीडन यांस मदत करण्यास तयार झाले. (४) व फ्रान्समधील अंतःकलह नाहींसें होऊन तो लढाईकडे पूर्ण लक्ष देऊं शकला- या चार कारणांमुळें तीस वर्षांच्या युद्धांत फ्रान्सला विजय मिळाला. शेवटी इ. स. १६४८ या वर्षीं वेस्टफालिया येथील तहानें हें युद्ध बंद झालें. येथून पुढें संप्रदायमूलक युद्धें बंद झालीं. त्याबरोबरच सर्व यूरोपांत आपली सत्ता प्रबल करण्याची हॅप्सबर्ग घराण्याची महत्त्वाकांक्षाहि नष्ट झाली. या तहानें जर्मनींतील संस्थानिक जवळ जवळ स्वतंत्रच झाले. विशिष्ट संस्थानांत विशिष्टच धर्मपंथ असावा हें ठरविण्याची सत्ता त्यांनां मिळाली. यामुळें कॅथालिक, प्रॉटेसटन्ट व कालव्हिनिस्ट पंथाभिमानी लोक जर्मनींतील निरनिराळ्या संस्थानांत आनंदानें राहूं लागले. लोकांत परमसहिष्णुता वाढूं लागली. जर्मनींतील संस्थानिक स्वतंत्र झाल्यामुळें साम्राज्यसत्तेचा -हास होऊन ती नामधारी राहिली. साम्राज्यसत्ता पुढें मागें नष्ट होणार अशीं पूर्वचिन्हें दिसूं लागलीं. जवळ जवळ एक हजार वर्षें ज्या संस्थेनें जर्मनीला ऐक्य दिलें ती संस्था लवकरच नष्ट होणार हें स्पष्ट दिसूं लागलें व या तीस वर्षांच्या युद्धानंतर जर्मनीमध्यें व सामान्यतः यूरोपच्या इतिहासांत नव्या युगास आरंभ झाला. पुनरुज्जीवनाची चळवळ, संप्रदांय-सुधारणा व तज्जन्य चळवळी या आतां मागें पडून यूरोपच्या इतिहासाला नवीनच वळण लागण्यास प्रारंभ झाला.