प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २० वें.
राष्ट्रसंवर्धन राष्ट्रांतील चुरस व जगाची ओळख

रोमन कॅथोलिक पंथाचे पुनरूज्जीवन व प्रॉटेस्टंट पंथाची पिच्छंहाट.- इसवी सनाच्या १६ व्या शतकाच्या मध्यापासून प्रॉटेस्टन्ट पंथाची पिछेहाट होण्यास प्रारंभ झाला. या काळाला सुधारणाविरोधी चळवळीचा काळ म्हणतात. ट्रेन्ट येथें भरलेली सभा, जेसूइट लोकांची संस्था, 'सांप्रदायिक न्यायसभा' यां तीन संस्थांमुळें प्रोटेस्टन्ट पंथाची बरीच पिछेहाट झाली. ट्रेस्ट येथे भरलेल्या सभेंत रोमनकॅथोलिक पंथाचीं सांप्रदायिक मतें जमवून त्यांनां एक निश्चित स्वरूप दिलें गेलें. याशिवाय धर्माध्यक्ष व संस्कर्ते यांच्यांतील अनीति व मी करण्याकरितां पुष्कळ नियम तयार करण्यांत आले. यामुळें रोमनकॅथोलिक संप्रदायाविरूद्ध असलेली ओरड बरीच बंद झाली. जेसूइट लोकांची संस्था ही पोपच्या आधिपत्याखालीं काम करीत असे. प्रॉटेस्टन्ट पंथाचा नाश व कॅथोलिक पंथाचा प्रसार करणें हे या संस्थेचे मुख्य हेतु होते. जेसूइट लोक यूरोपमधील सर्व देशांत जाऊन तेथील लोकांनीं फुकट शिक्षण, आजारीपणांत मदत वगैरे लोकोपयोगी कामे करीत. इ. स. च्या १६ व्या शतकांत युरोपांतील पुष्कळ देशांचें शिक्षण यांच्या हातांत असून त्याच्या द्वारें ते आपल्या मतांचा प्रसार फार लवकर करूं शकले. सांप्रदायिक न्यायसथा (इनक्विझिशन) ही प्रॉटेसटन्ट पंथाभिमान्यांची चवकशी करून त्यांनां शिक्षा देण्याकरितां स्थापन केलेली एक संस्था होती. या संस्थेनें हजारो प्रॉटेस्टन्ट लोकांनां शिक्षा देऊन फांसाला चढविलें. या वर सांगितलेल्या तीन गोष्टींनीं प्रॉटेस्टंन्ट पंथाची पिछेहाट होऊन कॅथोलिक पंथ कायम राहिला. इतकेंच नव्हे तर यूरोपांतील प्रमुख देशांत कॅथोलिक पंथाचा फारच जारीनें प्रचार होऊन, प्रॉटेस्टंट पंथ अजिबात नाहींसा होतो कीं काय अशी भीति पडली. पांचवा पायस (पोप) व स्पेनचा राजा दुसरा फिलीफ यांनीं या चळवळीत फार पुढाकार घेतला व फिलिफनें प्रॉटेसटन्ट राजांशीं युद्ध करून प्रॉटेस्टटन्ट पंथ नाहींसा करण्याचा जणूं काय विडाच उचलला. त्यानें नेदरलंड इंग्लंड व फ्रान्स हे देश जिंकून तेथें कॅथोलिक पंथाची स्थापना करण्याचा निश्चय केला. प्रथम त्याला आपल्या प्रयत्नांत बरेंच यश आलें. परंतु पुढें प्रॉटेस्टन्ट पंथांतहि कांहीं पराक्रमी पुरूष निर्माण झाल्यामुळें फिलिफचे सर्व प्रयत्न निष्फल झाले. जरी तो नेदरलंडचा दक्षिणभाग घेऊं शकला तरी त्यास उत्तरेकडील भाग घेतां आला नाहीं. तेथील लोकांनीं ऑरेन्जच्या वुइल्यमच्या आधिपत्याखालीं फिलिफचा पराभव करून हॉलंडचें डच प्रजासत्ताकराज्य स्थापिलें. त्याचप्रमाणें फिलिफ राजास इंग्लंड व फ्रान्स हे देशहि जिंकता आले नाहींत. इ. स. १५९८ यावर्षीं व्हरव्हिन्स येथें झालेल्या तहानें फिलिफला इंग्लंड व फ्रान्स हे देश घेण्याचे आपले प्रयत्न पूर्णपणें फसले ही गोष्ट कबूल करावी लागली. ही वेळ सोळाव्या शतकाच्या अखेरीची होय. या वेळेस पश्चिम यूरोपांत हॉलंडचें प्रजासत्ताकराज्य, फ्रान्स व इंग्लंड हे देश स्वतंत्र व प्रॉटेस्टन्ट पंथाभिमानी होते. फिलिफ राजाचे सर्व प्रयत्न निष्फळ झाले हें चांगल्या त-हेने सिद्ध झालें. कॅथोलिक पंथ जरी आतां विशेष प्रबळ राहिला नाहीं तरी त्याची शक्ति प्रॉटेस्टन्ट पंथाच्या बरोबरीची होती. सुधारणाविरोधी चळवळीनें हें आलेलें संकट नाहींसें होऊन प्रॉटेस्टन्ट पंथाच्या अस्तित्वाबद्दल आतां बिलकुल शंका राहिली नाहीं. परंतु इतकें झालें तरी या दोन पंथांतील वाद अझून मिटला नव्हता प्रॉटेसटन्ट लोक कॅथोलिक लोकास त्रास देत व कॅथोलिक प्रॉटेस्टन्ट लोकांवर जुलुम करीत व यांच्यामधील भांडण केव्हां कोणत्या थरास जाईलल याचा नियम राहिला नव्हता.

सतरावें शतक.- यूरोपखंडामध्यें सतराव्या शतकांत पुढील गोष्टी प्रामुख्यानें घडून आल्या.

  (१)  प्रॉटेस्टन्ट व कॅथॉलिक पंथाभिमान्यांतील तीस वर्षें चाललेलें द्वंद्व.
  (२) फ्रान्सची वाढती सत्ता.
  (३) स्वीडनचे उदय व नाश.
  (४) स्पेनचा -हास.
  (५)  इंग्लंडांतील राजसत्तेविरुद्ध तेथील प्रजेची सनदशीर चळवळ.