प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २० वें.
राष्ट्रसंवर्धन राष्ट्रांतील चुरस व जगाची ओळख
रशियाचा अभ्युदय.- जेथें आज आपण रशियाचें राज्य पाहात आहों तेथें १५ व्या शतकापूर्वीं लहान लहान स्वतंत्र संस्थानें होती. तीं लहान संस्थानें नाहींशी करून मस्कोव्हीचें राज्य स्थापण्याचें श्रेय इव्हानधी ग्रेट याकडे आहे. त्याचा मुलगा बेसील, व बेसीलचा मुलगा चवथा इव्हान व नातु इव्हान धी टेरिबल यानीं झारशाही स्वतंत्र करून तीची सत्ता पुष्कळ वाढवली. रशियाचा खरा अभ्युदय पीटर धी ग्रेट याच्या कारकीर्दीपासून सुरू होतो. पीटरनें रशियाच्या अंतर्व्यवस्थेत फेरफार करून परराष्ट्रीय धोरण बदललें. त्यानें रशियाच्या इतिहासाला एक निराळेंच वळण देऊन रशियाला सुधारलेल्या प्रमुख राष्ट्रांच्या पंक्तीत आणून बसविलें. पीटरनें मुख्यतः पुढें दिलेल्या सुधारणा केल्या.
[१] रशिया एक मोठें आरमारी राष्ट्र व्हावें अशी पीटरची महत्त्वाकांक्षा होती. त्याप्रमाणें त्यानें एक मोठें आरमार बांधवून त्याच्या मदतीनें तुर्कांचा पराभव केला व त्यांच्यापासून अझेव्ह जिंकून घेतलें. यामुळें त्याची सत्ता श्वेतसमुद्रावर प्रस्थापित झाली. परंतु श्वेतसमुद्र हा लहान असल्यामुळें केवळ तेथें सत्ता प्रस्थापित करून पीटरला समाधान झालें नाहीं. त्याला बाल्टीक समुद्रावर वर्चस्व स्थापित करावयाचें होतें. परंतु बाल्टीक समुद्राच्या जवळील प्रदेश हा स्वीडनच्या ताब्यांत होता. तथापि लवकरच त्याचा मनोदय सिद्ध होण्याची चिन्हें दिसूं लागली. कारण पोलन्ड व स्वीडन यांमध्ये वैर उद्भवून स्वीडनच्या विरूद्ध पोलन्डचा राजा ऑगस्टस यानें पीटरची मदत मागितली. त्याप्रमाणें स्वीडनबरोबर पोलंड व रशिया यांचें २० वर्षे युद्ध चालून शेवटीं स्वीडनचा पराभव झाला. या युद्धांत पीटरला इनग्रिया, कारेलिया, लिव्होनिया, एस्थोनिया व फिनलंडचा कांहीं भाग इतके प्रदेश मिळाले. येणेंप्रमाणें त्याची सत्ता बाल्टीक समुद्राच्या किना-यावर प्रस्थापित होऊन त्यास आपले आरमार वाढविण्याची इच्छा पूर्ण करून घेतां आली व आतां पूर्व यूरोपांत रशिया हे एक प्रमुख आरमारी राष्ट्र झालें. याशिवाय रशियाच्या राज्याचा विस्तारहि फार मोठा झाला.
(२) रशियाला सुधारलेला राष्ट्रांच्या पंक्तीत आणावयाचें हेंच एक ध्येय पीटरच्या मनांत नेहमीं वास्तव्य करीत होतें. त्यासाठीं रशियाला आरमारी राष्ट्र बनवून त्यानें रशियाचें राज्य वाढविलें. आतां त्यानें आपलें लक्ष रशियाच्या अंतर्व्यवस्थेकडे लाविलें.
पश्चिमयूरोपांत प्रवास करून तेथील संस्थांचा त्यानें चांगलाच अभ्यास केला होता. आपलें राष्ट्र पुढें यावयाचें असल्यास त्यानें सर्व बाबतींत पश्चिम यूरापचें अनुकरण केलें पाहिजे असें त्याचें ठाम मत झालें होतें. आपल्या सर्व परंपरा सोडून त्यानें रशियाला यूरोपीय बनविण्याचा प्रयत्न केला. हा त्याचा प्रयत्न कितपत योग्य होता व त्यानें रशियाला खरोखर किती फायदा झाला हा प्रश्न वादग्रस्त असून इतिहासकारांचेंहि या विषयावर ठाम मत झालें नाहीं. पीटरच्या या प्रयत्नाला फार विरोध झाला. पीटरला सर्व लोकांच्या मनःप्रवृत्ती बदलणें शक्य नव्हतें. त्यानें ज्या कांहीं सुधारणा केल्या त्या फक्त औपचारिक होत्या. त्यानें जुन्या सरदारांचा वर्ग मोडून नव्या पद्धतीवर फौज उभारली. राज्यकारभाराच्या सर्व खात्यांत यूरोपियन त-हेवर सुधारणा करून परराष्ट्रीय लोक मोठमोठ्या हुद्यावर नेमिले. भोजनपद्धति पोशाख वगैरे लहान सहान बाबतींत सुद्धां पश्चिमांचेंच अनुकरण झालें पाहिजे या हेतूनें त्यानें नवे कायदे केले. थोडक्याच वर्षांत रशियाचें स्वरूप बदलून निदान रशिया दिसण्यांत तरी पाश्चिम राष्ट्र बनला. पीटरने केलेल्या सुधारणांमुळें रशियावर ब-याच अंशीं यूरोपीय ठसा उमटला यांत शंका नाहीं. तरी एकदम कोणत्याहि राष्ट्राचें असें परिवर्तन होणें शक्य आहे कीं नाहीं, हा मोठा प्रश्न आहे. रशियांत अजून पुराणमताभिमानी पक्ष प्रबल होता. पीटरनें केलेल्या सुधारणा व त्यानें उचललेलें परराष्ट्रीय धोरण यांचा रशियावर कांहीहि परिणाम झाला असो, इतकें खरें कीं त्याचा परिणाम यूरोपच्या इतिहासावर फार झाला. आतां यापुढें रशियानें पश्चिम यूरोपच्या राजकारणांत आतां रशियाला वगळून चालेनासें झाले.