प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग (उत्तर भाग)
प्रकरण ६ वें
प्राचीन यूरोपीय संस्कृती.
अभिचार उर्फ जादू. - वस्तुगत दैवतपूजेचा पवित्र भावना उद्दीपित करण्याकडे उपयोग कदाचित् होत असेल, पण तिचा संबंध बहुतांश जादूटोणा इत्यादि प्रकाराशीं येतो. असले जादूटोण्याचें प्रकार हेलेन लोकांत होते याबद्दल शंका नाहीं. या प्रकारांबद्दल होमर काहीं बोलत नाहीं व त्यांचा उल्लेख होमरोपरकलीन वाङ्मयांतच आढळतो हें खरें असलें तरी मानुष्यक शास्त्रांतील सामान्य सिद्धांतांस अनुसरून असल्या गोष्टी ग्रीक लोकांत अत्यंत पुरातन काळापासून चालत होत्या असें मानणें भाग आहे. उदाहरणार्थ, थेस्मॉफॉरिया नामक धर्मविधीनें देवता संतुष्ट होते इतकेंच नव्हे तर त्याचा जादूसारखा कांहीं अद्भुत पण प्रत्यक्ष परिणाम होतो असें समजत असत. तसेंच थर्गेलिया नामक विघात मनुष्यानें केलेल्या पापांचा अध्यारोप एखाद्या बकऱ्यावर करून त्याला दूर हांकलून दिल्यानें पापमुक्ततां होते या गोष्टीचा संबंध धर्मापेक्षां जादूटोण्याशींच अधिक आहे असें दिसतें मंत्र म्हणून व बळी देऊन आकाशांत घडणाऱ्या भयंकर गोष्टी टाळणें किंवा वादळ बंद करणे हीं कृत्यें करण्याकरितां कित्येक स्वतंत्र धर्माधिकाऱ्यांची नेमणूक केलेली असे व अशा धर्माधिकाऱ्यांची नांवें अथेन्स येथील प्राचीन लेखांत आढळतात. दुसऱ्याचा घात करण्याचें जादूचे प्रकारहि कांहीं आढळतात. पण हे सर्व प्रकार मर्यादित असून त्यांच्यामुळें उच्च धार्मिक कल्पनाची होण्यास अडथळा झाला असल्याचें दिसत नाहीं.